मुंबई : मराठी तसेच हिंदी कलाक्षेत्रातील एक समजूतदार, निष्ठावान आणि गुणी कलाकार म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं आज मुंबईत निधन झालं. त्यांनी १९ जून रोजी आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतल्याची बातमी समोर येताच, संपूर्ण मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांच्या पार्थिवावर २० जून रोजी सकाळी ११ वाजता, अंधेरीतील ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या जाण्याने रंगभूमी आणि छोट्या पडद्यावरच्या संवेदनशील अभिनयाचा एक अत्यंत महत्वाचा अध्याय संपला आहे, असं मानलं जात आहे.
विवेक लागू यांनी अनेक दशके रंगभूमी, चित्रपट आणि टेलिव्हिजन या तिन्ही माध्यमांत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. मराठीतच नव्हे, तर हिंदी भाषेतही त्यांनी अनेक महत्त्वाच्या भूमिका साकारल्या.
‘चार दिवस सासूचे’, ‘हे मन बावरे’ यांसारख्या मालिकांनी त्यांना घराघरांत पोहोचवलं. त्याचप्रमाणे ‘गोदावरीने काय केले’ (2008), अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘अग्ली’ (2013), ‘व्हॉट अबाउट सावरकर’ (2015), आणि ‘31 दिवस’ (2018) यांसारख्या चित्रपटांमधून त्यांचा प्रगल्भ अभिनय प्रेक्षकांना अनुभवता आला.
विवेक लागू यांचा विवाह अभिनेत्री रीमा लागू यांच्याशी झाला होता. त्या काळी नयन बडबडे या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रीमा यांची आणि विवेक यांची ओळख बँकांमध्ये होणाऱ्या नाट्यस्पर्धांच्या माध्यमातून झाली. तेव्हा विवेक 23 तर रीमा 18 वर्षांच्या होत्या. प्रेमसंबंधानंतर 1978 साली त्यांनी विवाह केला. मात्र काही वर्षांनंतर त्यांच्या वैवाहिक नात्यात मतभेद निर्माण झाले आणि त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
घटस्फोटानंतरही त्यांच्यामध्ये परस्पर सन्मानाचं नातं कायम राहिलं. रीमा लागू यांचं 2017 साली निधन झालं, तोपर्यंत दोघंही वेगळी वाट चालले होते, पण त्यांनी एकमेकांविषयी आदर कायम राखला होता. विवेक लागू आणि रीमा लागू यांची कन्या मृण्मयी लागू-वायकुळ ही एक यशस्वी लेखिका आणि अभिनेत्री आहे. तिने ‘थप्पड’, ‘स्कूप’ यांसारख्या गाजलेल्या प्रकल्पांची पटकथा लिहिली आहे. तिने अभिनय केलेला ‘मुक्काम पोस्ट लंडन’ हा चित्रपटही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.
विवेक लागू यांच्या जाण्याने फक्त एक कलाकार गमावला नाही, तर रंगभूमीवरचा एक अभ्यासू, संस्कारी आणि माणुसकीच्या नात्यांना समजून घेणारा संवेदनशील अभिनेता हरपला आहे. त्यांच्या शांतस्वभावी व्यक्तिमत्त्वाने आणि विचारमग्न अभिनयशैलीने त्यांनी नाट्यप्रेमींमध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं. त्यानंतरच्या पिढ्यांना त्यांनी दिलेलं योगदान प्रेरणादायी आहे आणि त्यांच्या स्मृती नाटक, चित्रपट आणि टेलिव्हिजन माध्यमांत कायम जिवंत राहतील.