
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : अहमदाबाद येथील भीषण विमान अपघातात २४६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांना श्रद्धांजली म्हणून व जखमींची प्रकृती लवकरात लवकर ठीक व्हावी, याकरिता नवी दिल्लीतील संत नगर येथील आर्य समाज मंदिरात विश्व हिंदू परिषदेच्या वतीने शांती यज्ञ आयोजित करण्यात आला होता. विहिंपचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी याविषयी माहिती दिली.
ते म्हणाले, केवळ भारतच नाही तर संपूर्ण जगाला या विमान अपघाताने धक्का बसला आहे. अशा प्रकारचा अपघात ही कदाचित जगाच्या इतिहासातील दुर्मिळ अपघातांपैकी एक आहे. या क्षेत्रातील लोकांनी हे समजून घेण्यासारखे आणि गांभीर्याने तपासण्याचे काम केले पाहिजे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषदेच्या आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक समुदाय, सरकारी प्रशासन आणि एनडीआरएफ टीमच्या समन्वयाने ज्या पद्धतीने कोणताही विलंब न करता मदत आणि बचाव कार्य हाती घेतले त्यामुळे अनेक लोकांना वाचविण्यात मदत झाली.
विमानातील ब्लॅक बॉक्ससारखे महत्त्वाचे भाग सुरक्षित सापडले आहेत. यामुळे जगभरातील तपासकर्त्यांना अपघाताचे कारण काय होते आणि भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी कोणते उपाय करता येतील, हे शोधणे शक्य होऊ शकते. आर्य समाज मंदिरातील शांती यज्ञात आर्य समाज मंदिर संत नगरचे खजिनदार वीरेंद्र सूद, विश्व हिंदू परिषद दक्षिण दिल्लीचे मंत्री राधा कृष्णा, समाजसेविका प्रोफेसर अंकुर राज, आदी मान्यवर उपस्थित होते.