वेबसीरिजचे मायाजाल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Oct-2020
Total Views |

webseries_1  H



‘नेटफ्लिक्स’, ‘अ‍ॅमेझॉन प्राईम’, ‘एमएक्स प्लेअर’, ‘झी-५’, ‘वुट’, ‘हॉटस्टार’ या मंचांवरुन वेबसीरिजचा भडिमार सुरु आहे. पण, या वेबसीरिजचा विचार गंभीरतेने करायला हवा. यातील सुप्त आणि गुप्त धोका आपण ओळखायलाच हवा.



देशभरात गेल्या सहा महिन्यांपासून ‘लॉकडाऊन’ आहे. टीव्ही मालिका आणि चित्रपटांचे चित्रीकरण पूर्णपणे बंद आहे. नवीन मालिका दिसत नाहीत आणि चित्रपटगृहे बंद असल्यामुळे नवे चित्रपट पाहता येत नाहीत. या परिस्थितीत घरी बसलेले प्रेक्षक मनोरंजनासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मकडे मोठ्या प्रमाणात वळले आहेत. त्यामुळे ‘नेटफ्लिक्स’, ‘अ‍ॅमेझॉन प्राईम’, ‘एमएक्स प्लेअर’, ‘झी-५’, ‘वुट’, ‘हॉटस्टार’ या मंचांवरुन वेबसीरिजचा भडिमार सुरु आहे. पण, या वेबसीरिजचा विचार गंभीरतेने करायला हवा. यातील सुप्त आणि गुप्त धोका आपण ओळखायलाच हवा. अलीकडच्या काळातील टीव्हीवरील त्याच त्याच विषयांवरील सांस-बहू मालिकांना तरुण वर्ग कंटाळला होता. त्याला वेबसीरिजच्या रुपाने एक पर्याय मिळाला. सध्या वेबसीरिज पाहणार्‍यांची संख्या ३५ कोटी असून ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आगामी काळात वेबसीरिज टेलिव्हीजनला पर्याय ठरेल की काय, अशी भीतीही रसिक प्रेक्षकांना वाटत आहे.वेबसीरिज युवकांपर्यंत लवकरात लवकर पोहोचणारे मोठे माध्यम म्हणून जगासमोर आले. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे रोज जास्तीत जास्त डेटा देणार्‍या सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्या जगभरात डेटा स्वस्त देणार्‍या कंपन्या होत्या, पण भारत अजूनही कमी डेटा महाग दरात देत होता.


त्यामुळे व्हिडिओ ऑन डिमांडवर आधारित कंपन्यांना रिलायन्स कंपनीने ‘जिओ’ या डेटा सर्व्हिसचे उद्घाटन करुन नेट प्रोव्हायडिंग जगतात धुमाकूळ घातला आणि स्वस्तात स्वस्त व काही महिने तर चक्क मोफत डेटा द्यायला सुरुवात केली आणि भारतातील वेबसीरिजचे भाग्य फळफळले. त्यामुळे वाढत्या वेबसीरिजच्या प्रभावामागे नेट डेटा प्रोव्हायडरचासुद्धा सहभाग आहे, हे लक्षात घ्यायला हवे. अलीकडे एकत्र कार्यक्रम बघणार्‍यांपेक्षा व्यक्तिगत कार्यक्रम बघणार्‍या दर्शकांची संख्या झपाट्याने वाढली. सध्या प्रदर्शित होणार्‍या वेबसीरिज कमी वेळच्या असल्यामुळे त्या प्रवासात, कार्यालयात कुठेही बघता येतात. त्यांचे कंटेट तरुणांना आकर्षित करणारे आणि भाषा हिंदी-इंग्रजी मिश्रित असल्यामुळे आजच्या तरुणाईला ती भुरळ पाडते. यातील अनेक मालिकांमध्ये परिणीती चोप्रा, बिपाशा बासू यांच्यासारखे नावाजलेले कलाकार असल्यामुळेही तरुणाई आकर्षित होत आहे.


सुरुवातीच्या काळात या क्षेत्रातील नावाजलेल्या जागतिक कंपन्यांनी काही दर्जेदार आणि आशयघन वेबसीरिज बनविल्या. ‘नेटफ्लिक्स’ ही वेबसीरिज बनविणारी एक जागतिक कंपनी असून तिने बनविलेल्या ‘नार्कोस’ या वेबसीरिजाला प्रचंड यश मिळाले. चित्रपटाच्या दुनियेत गुन्हेगारीवर आधारित एखाद्या सर्वोत्तम चित्रपटाचे नाव घ्यायचं झालं तर अगदी सहजतेने ‘गॉडफादर’च नाव घ्यावं लागेल आणि वेबसीरिजच्या दुनियेतलं असं नाव घ्यायचं झालं तर ते ‘नार्कोस’च असेल.पारंपरिक सिनेमाध्यमांना आपला मजकूर मान्य करुन घेण्यासाठी सेन्सॉर बोर्डाची परवानगी लागते. परंतु, वेबसीरिज या कायद्याच्या कचाट्यात येत नाहीत. त्यामुळे शिव्या, हिंसा, व्यसन हे खुलेआम दाखविण्याचे स्वातंत्र्य त्यांना मिळाले. परिणामी, वेबसीरिजच्या माध्यमातून अश्लीलता बोकाळली, स्वातंत्र्य आणि स्वैराचार यांची सीमारेषा समाप्त झाली आणि गत काही महिन्यांपासून अशा वेबसीरिज सादर करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये हिंदू धर्म, हिंदू देवी देवता, साधुसंत, आपले राष्ट्रपुरुष, एवढेच नव्हे तर भारतीय सेनेला अतिशय विकृत पद्धतीने दर्शविण्यात आले आहे.

काही उदाहरणे द्यायची झाली तर ‘नेटफ्लिक्स’च्या माध्यमातून प्रदर्शित झालेल्या ‘लैला’, ‘घौल’, ‘चिप्प’, ‘सॅक्रेड गेम्स’; ‘अ‍ॅमेझॉन’च्या माध्यमातून प्रदर्शित झालेल्या ‘पाताल लोक’, ‘द फॅमिली मॅन’, ‘बालाजी’च्या एकता कपूरने प्रदर्शित केलेली ‘एक्स एक्स एक्स-२’ अशा प्रकारच्या अनेक वेबसीरिजच्या माध्यमातून हिंदू संस्कृती, हिंदू देवीदेवता यांची यथेच्छ टिंगळटवाळी करण्यात आली आहे. एकता कपूरच्या ‘एक्स एक्स एक्स-२’ मध्ये सैन्य अधिकार्‍याची पत्नी आपल्या मित्राला घरी बोलावते आणि त्याला सैन्याचा गणवेश चढवून त्याच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवते अशा प्रकारचे सैन्याला आणि त्यांच्या कुटुंबीयांना बदनाम करण्याचे काम केले आहे. ‘नेटफ्लिक्स’ने प्रदर्शित केलेल्या ‘चिप्पा’ नावाच्या वेबसीरिजमध्ये हनुमानाला थप्पड मारण्याची गोष्ट आहे. अनेक वेबसीरिजमध्ये श्रीराम आणि कृष्णाला चारित्र्यहीन दाखविले आहे. सर्जनशील स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदू धर्माला, त्यातील आदरणीय विभूतींना लक्ष करण्याचे सुनियोजित कारस्थान सुरु असल्याचे दिसत आहे.

‘पाताललोक’ या वेबसीरिजमध्ये नेपाळी महिलेबद्दल आपत्तीजनक शब्द उच्चारले आहेत. बहुतांशी वेबसीरिजमध्ये सर्व व्हीलन हे हिंदूच कसे असतात? त्यांच्या कपाळावर आवर्जून टिळा असतो. ते गुंड, अल्पसंख्यविरोधी दाखविले जातात. ‘रक्तांचल’मध्ये साधू एक महिलेशी दुराचार करताना दाखविला आहे आणि त्यावेळी कॅमेर्‍याच्या फ्रेममध्ये भिंतीवरील ‘जय श्रीराम’ दाखविले जाते. ‘सॅक्रेड गेम्स’मध्ये ‘अहं ब्रह्मास्मि’ हा वेदातील मंत्र म्हणून गुरुजी विध्वंस करण्यासाठी पाठिंबा देत आहेत, असे दाखविण्यात आले आहे. यामध्ये अनेक दृष्यात गुरू-शिष्य परंपरेबद्दलची बदनामी करण्यात आली आहे. अशाच प्रकारे ‘स्टॅण्डअप कॉमेडी’च्या कलाकारांकडूनही हिंदूंची बदनामी करण्यात येत आहे. कुणाल कमरा, सुरीली कौर, हसन मिन्हास या कलाकारांना विनोदासाठी फक्त हिंदूच्या देवी देवताच मिळतात? हे मुस्लीम अथवा ख्रिश्चन धर्माबद्दल असे वक्तव्य करतील का? इस्लामी राष्ट्रात कुणी जर महंम्मद पैंगबर किंवा कुराण याचा अवमान केला तर त्याला थेट मृत्युदंडाची शिक्षा केली जाते. ख्रिस्ती राष्ट्रांत येशू किंवा बायबल यांचा अवमान केल्यास त्याला कठोरात कठोर शिक्षा होते.

याउलट आपल्या देशातव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली कुणीही उठसूट आपल्या देवी-देवता, साधू-संत, धर्मग्रंथ यांची टिंगलटवाळी करतो. हिंदू बहूल देशात हिंदूनाच अशा गोष्टींवर बंदी घालण्याची मागणी करण्याची वेळ येते, हे दुर्दैवी आहे. हिंदी चित्रपटांपेक्षाही भयानक असे चित्रण सध्याच्या वेबसीरीजच्या माध्यमातून होत आहे. एका विशिष्ट धर्माच्या भावना दुखावणार्‍या तसेच समाजात धार्मिक तेढ निर्माण करणार्‍या या वेबसीरीजना चाप लावण्याची गरज आहे. कोणतेही निर्बंध नसलेल्या ऑनलाईन वेबसीरीजवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र शासनाने स्वतंत्र यंत्रणा उभारायला हवी. मनोरंजनाच्या नावाखाली समाजाची नैतिकता नष्ट केली जात आहे. हे थांबविण्यासाठी समाजातील सज्जन शक्तीने एकत्र आले पाहिजे आणि याविरुद्ध आवाज उठवायला हवा. तसेच केंद्र शासनाने चित्रपटांच्या धर्तीवर वेबसीरीज साठीही परिनिरीक्षण यंत्रणा निर्माण करावी.

@@AUTHORINFO_V1@@