भारतीय शस्त्रास्त्रांचा इतिहास सातासमुद्रापार नेणारी संशोधिका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Oct-2020
Total Views |

girija dudhat_1 &nbs


आज दसरा. शस्त्रास्त्रांचे पूजन करण्याचा दिवस. फार पूर्वीपासून चालत आलेली ही एक भारतीय परंपरा. तसेच आजच्या दिवशी शस्त्रधारिणी दुर्गामातेने महिषासुराचा वध करुन ती ‘महिषासुरमर्दिनी’ झाली, तर विजयादशमीच्याच दिवशी रामानेे रावणाचा वध करुन धर्माचे राज्य प्रस्थापित केले. तेव्हा, शस्त्रांचे महत्त्व अगदी पौराणिक काळापासून ते आज आधुनिक शस्त्रास्त्रांपर्यंत फार मोठे आहे. परंतु, दुर्देवाने या शस्त्रास्त्रांवर भारतात फक्त हाताच्या बोटावर मोेजण्याइतपतच संशोधन झालेले आढळते. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन, पुरातत्त्वशास्त्राची विद्यार्थिनी असलेल्या गिरिजा दुधाट या तरुणीने ‘भारतीय शस्त्रे’ हा विषय संशोधनासाठी निवडला. एवढेच नाही, तर ‘शस्त्रवेध : मध्ययुगीन भारताचे शस्त्रपर्व’ हे तिचे पुस्कतही प्रसिद्ध झाले आहे. नुकताच गिरिजाचा ऐतिहासिक भारतीय तलवारींवरील एक शोधनिबंध युक्रेन येथे नोव्हेंबरमध्ये होणार्‍या ‘Historical weapons conference' साठी निवडला गेला आहे. यानिमित्ताने भारतीय शस्त्रे जवळपास ३० वर्षांनंतर एका भारतीयाकडून आंतरराष्ट्रीय परिषदेत मांडली जाणार आहेत. त्यानिमित्ताने आज दसर्‍याच्या शुभदिनी गिरिजाने शस्त्रास्त्र संशोधनातील तिचा प्रवास आणि एकूणच या क्षेत्रातील संशोधनाची निकड याविषयी केलेला हा ऊहापोह...



मी मूळची पुरातत्त्वशास्त्राची विद्यार्थिनी. दहावीनंतर ‘पुरातत्त्वशास्त्र’ हे वेगळ्या वाटेवरचे करियर निवडायचे असे ठरवले आणि एक वेगळाच प्रवास सुरु झाला. इथे स्वतःच्या संशोधनाची सुरुवात शक्य तितक्या लवकर झाली पाहिजे, हे जाणवल्याने पाच वर्षांपूर्वी माझी विषयाची शोधाशोध सुरु झाली आणि डोळ्यासमोर आली ‘शस्त्रे.’ लहानपणापासून संग्रहालयांमधून, ऐतिहासिक ठिकाणी फिरताना असंख्य शस्त्रे पाहिलेली, त्यामुळे या विषयावर भरपूर माहिती मिळेल असे मला वाटले होते. पण, प्रत्यक्षात मात्र ‘भारतीय शस्त्रे’ या विषयावर मला माहितीच काय, तर भारतीयांनी लिहिलेली फारशी पुस्तकेही सापडली नाहीत, मिळाले ते केवळ परकियांनी केलेले थोडेफार काम! इतक्या प्रकारची, इतक्या ठिकाणची इतकी वैविध्यपूर्ण शस्त्रे आपल्याकडे असताना त्याच्या अभ्यासासाठी मात्र आपल्याला परकियांची मदत घ्यावी लागावी याचे फार वाईट वाटले. इतिहास क्षेत्रात काम करताना घडलेला इतिहास अभ्यासण्याच्या अनेक शाखा आणि स्रोत असतात.


पुरातत्त्वशास्त्र, स्थापत्त्यशास्त्र, नाणकशास्त्र, भूगोल, मानववंशशास्त्र इ. या काही शाखा, तर ऐतिहासिक अवशेष, वास्तू, वस्तू, नाणी, शिलालेख, पत्रे, चित्रे इ. हे अनेक स्रोतांपैकी काही महत्त्वाचे स्रोत. पण, या सर्वांबरोबरच या स्रोतांइतकाच महत्त्वाचा तरीही आजवर दुर्लक्षित राहिलेला स्रोत म्हणजे ‘शस्त्रे’! खरे पाहता ‘शस्त्रे’ माणसाच्या उत्क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यावरील साथीदार आणि साक्षीदार! माणसाची पहिली निर्मिती हीदेखील ‘शस्त्रे’च. परंतु, दुर्दैवाने ज्याप्रमाणे कालौघात अनेक कला, शास्त्रे लुप्त होतात, त्याचप्रमाणे भारतामध्येही एकेकाळी वैभवाच्या शिखरावर असणारी शस्त्रविद्या आज मात्र लयास गेली आहे. या विषयावर ससंदर्भ भारतीय लिखाण हवेच, या विचाराने मला अकरावीमध्ये असताना झपाटले. त्यापुढची तीन वर्ष भारतभर फिरून अनेक संग्रहालयांना, शस्त्रसंग्राहकांना भेटी, काही संग्रहालयांमध्ये स्वतः काम करणे अशा अनेक खटपटी करून मी संदर्भांचा आणि शस्त्रांचा अभ्यास केला. त्या अभ्यासातून मी ‘शस्त्रवेध : मध्ययुगीन भारताचे शस्त्रपर्व हे पुस्तक लिहिले, मागील वर्षी त्याचे प्रकाशनही झाले! शस्त्रांचा अभ्यास ते भारतीय शस्त्रांवर पुस्तकाचे लिखाण, हा चार वर्षांचा प्रवास ‘शस्त्राभ्यास’ या क्षेत्राबद्दलची जाणीव आणि व्याप्ती आमूलाग्र बदलवणारा होता.


या अभ्यासामध्ये सुरुवातीलाच मला जाणवले की, भारतामध्ये शस्त्रांना इतिहास अभ्यासात ‘स्रोत’ म्हणून स्वतंत्र अस्तित्त्व नाही, नाणकशास्त्र, स्थापत्यशास्त्र, मूर्तिशास्त्र यांप्रमाणे शस्त्रांच्या अभ्यासासाठी स्वतंत्र, आधुनिक ‘शस्त्रशास्त्र’ अस्तित्त्वात नाही. परिणामी, शस्त्रांचा अभ्यास करायचा म्हणजे नेमके काय करायचे, याबाबत संभ्रमावस्था आहे. ‘लष्करी इतिहास’ ही शाखा आपल्याकडे आधीपासून उपेक्षित! त्यामुळे लष्करी व्यवस्थेचा कणा असलेली शस्त्रे संशोधनामध्ये दुर्लक्षित राहिली यात नवल नाही. शस्त्रांच्या अभ्यासातून केवळ विशिष्ट प्रदेशाच्या किंवा देशाच्या लष्करी व्यवस्थाच नाही तर, एखाद्या प्रदेशातील लोकांची शारीरिक ठेवण, विशिष्ट कालखंडातील धातूशास्त्राची प्रगती, तात्कालीन कलाप्रकार, आंतरराष्ट्रीय व्यापार, प्रदेशातीत बदलत्या युद्धकला अशा अनेक बाबी अभ्यासता येतात. परंतु, लोकांमध्ये जागरूकता नाही. त्यामुळे शस्त्राभ्यास क्षेत्रात अभ्यासक नाहीत. त्यामुळे क्षेत्र दुर्लक्षित अशी परिस्थिती आहे. भारतातील अनेक संग्रहालयांमध्ये त्यांचाकडे असलेल्या शस्त्रांच्या शास्त्रशुद्ध शस्त्रसूची केलेल्या नाहीत. जिथे शस्त्रांची साधी मोजमापे आपल्याकडे उपलब्ध नाहीत, तिथे ससंदर्भ आणि शास्त्रीयदृष्ट्या संशोधन करणे सध्यातरी अवघड आहे. कुठलीही समस्या सोडवायची असेल तर त्यावर अधिकाधिक ससंदर्भ आणि विविधांगी दृष्टिकोनातून संतुलित लिखाण व्हायला हवे. हीच गोष्ट भारतीय शस्त्रांच्या अभ्यासालाही लागू होते.


कोणत्याही नव्या विषयावरील संशोधन स्थानिक नंतर राज्य, राष्ट्रीय आणि शेवटी आंतरराष्ट्रीय पातळी असा प्रवास करत असते. भारतीय शस्त्रांवर शास्त्रशुद्ध संशोधन करायचे असल्यास आपल्याला सर्वप्रथम स्थानिक आणि राज्य पातळीवर एका सशक्त व्यासपीठाची आज गरज आहे. केवळ महाराष्ट्रातातच नाही, तर देशभरामध्ये इतिहासाच्या विविध शाखांसाठी अभ्यास करणार्‍या अनेक संस्था, परिषदा आहेत. वर्षातून अनेकदा या व्यासपीठांवरून संबंधित क्षेत्रातील नवे विचार, प्रवाह यांचे आदानप्रदान होते. मात्र, ‘शस्त्र’ या विषयावर कोणी संशोधन केले असल्यास ते मांडायचे कुठे, असा प्रश्न आम्हाला पडतो. इतिहासाच्या अन्य शाखांप्रमाणे शस्त्राभ्यास क्षेत्रालाही हक्काचे व्यासपीठ मिळायला हवे. शस्त्राभ्यासाबद्दल सार्वत्रिक औदासिन्य, दस्ताऐवजीकरणातील दौर्बल्य, अभ्यासकांना योग्य मार्गदर्शन नाही, नव्या संशोधनाची, विचारांची चर्चा नाही परिणामी दखलपात्र शस्त्र संशोधन नाही अशा दुष्टचक्रात भारतीय शस्त्रांचा अभ्यास भरडला जात आहे. शस्त्रांवरील संशोधनाला आज भारतामध्ये व्यासपीठ नसले तरी भारताबाहेरील अनेक देशांमध्ये ‘शस्त्र’ विषयावर विविध अंगांनी संशोधन होत आहे. जागतिक व्यासपीठांवर भारतीय शस्त्रांबद्दल औत्सुक्य असले तरी पुरेसे संदर्भ नसल्याने आंतरराष्ट्रीय शस्त्राभ्यासात भारतीय शस्त्रांना अद्याप स्वतंत्र स्थान मिळालेले नाही. चार वर्षे केलेला अभ्यास मांडण्यासाठी मी योग्य व्यासपीठाच्या बरेच दिवस शोधात होते. इंटरनेटवर शोधाशोध करताना युक्रेन येथील शस्त्र परिषदेची माहिती मिळाली. तेथील संबंधितांशी संपर्क केला असता, शोधनिबंध सादर करण्यासाठी मुदत अगदीच कमी राहिली होती.



girija dudhat_1 &nbs
या पार्श्वभूमीवर भारतीय शस्त्रांची एका वेगळ्या दृष्टिकोनातून विदेशामध्ये ओळख करून देण्याच्या हेतूने मी या वर्षी युक्रेनमधील कीव येथे होणार्‍या 'IV International Conference 2020: History of Arms and Armour' या आंतरराष्ट्रीय शस्त्र परिषदेमध्ये मध्ययुगीन भारतीय तलवारींवर शोधनिबंध पाठवण्याचा निर्णय घेतला. परिषदेच्या अध्यक्षांशी प्राथमिक चर्चा झाल्यावर माझ्या लक्षात आले की, यापूर्वी ’भारतीय शस्त्र’ हा विषय परिषदेमध्ये कधी मांडला गेलेला नाही. भारतीय शस्त्रांची तोंडओळखच जर तिथे नसेल, तर त्यासंबंधी सखोलपणे मांडलेला एखादा विषय योग्य पद्धतीने अभ्यासकांपर्यंत पोहोचणारच नाही, हे ओळखून पहिल्या वेळेस मी ‘भारतीय तलवारी’ या विषयाची ओळख करून देणारा शोधनिबंध पाठवण्याचा निर्णय घेतला. भारतीय शस्त्रांच्या इतिहासात मध्ययुगीन भारताचा कालखंड (इ.स. १२ वे ते इ.स. १८ वे शतक) हा सुवर्णकाळ मानला जातो. म्हणूनच मध्ययुगीन कालखंडातील भारतीय तलवारींच्या स्वरूपाबद्दल लिहिण्याचा निर्णय घेतला. या शोधनिबंधाचे मी भारतीय तलवारीचा इतिहास, कालानुरूप तिच्यामध्ये होत गेलेल्या तांत्रिक सुधारणा, तलवारीचे भाग व त्यांची रचना आणि महत्त्व, भारतामधील प्रचलित तलवारींचे प्रकार, तलवारी बनवण्याच्या पद्धती असे स्वरूप ठरवले. भारतीय तलवारींचे धातुशास्त्र व त्यांचा प्रत्यक्ष वापर ही दोन्ही खरेतर शस्त्रांच्या अभ्यासातील महत्त्वाची अंगे, परंतु तरीही या शोधनिबंधामध्ये मी त्याचा समावेश केला नाही. याबद्दल ठामपणे लिहिण्यासाठी शस्त्रांच्या धातुशास्त्राबद्दल आपल्याकडे पुरेसे संशोधन झालेले नाही.

मोजक्या संदर्भांच्या जोरावर, केवळ माहितीच्या आधारे भारतासारख्या शस्त्रसंपन्न देशाच्या धातुशास्त्राबद्दल सामान्यीकरणाचे निष्कर्ष काढणे मला धाडसाचे वाटले. या विषयांबद्दल नव्याने संशोधन करण्यासाठी उपलब्ध लिखित संदर्भांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रयोगांची जोड देणे आवश्यक आहे. (अर्थातच ज्यासाठी भक्कम आर्थिक पाठबळ आणि मनुष्यबळाची गरज आहे!). आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी शोधनिबंध तयार करण्याची माझी पहिलीच वेळ होती, त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया खूप काही शिकवणारी होती. मध्ययुगीन काळात भारतीय तलवारींचे असणारे स्थानिक, प्रांतीय वैविध्य, रचेनमधील प्रांतवार फरक, तलवारीच्या आकार व नक्षीकामाच्या विविध शैली हे सर्व मोजक्या पानांमध्ये बांधणे खरोखर आव्हानात्मक होते. मर्यादित संदर्भग्रंथ उपलब्ध असूनही यावर 40 पानी सविस्तर शोधनिबंध तयार करता आला याचा मनापासून आनंद आहे. पूर्ण झालेला शोधनिबंध युक्रेनमधील शस्त्र परिषदेच्या निवड समितीकडे पाठवला होता. आंतरराष्ट्रीय शोधनिबंधांच्या अत्यंत शिस्तबद्ध आणि काटेकोर नियमांच्या कसोटीला माझा शोधनिबंध पूर्णपणे उतरून त्याची निवड झाली, हा माझ्यासाठी सुखद धक्का होता. शोधनिबंध तयार करताना बडोद्यामधील आमच्या पुरातत्त्वविभागातील प्राध्यापक डॉ. ऊर्मी घोष-बिस्वास यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
या शोधनिबंधाच्या निमित्ताने भारतीय शस्त्रे जवळपास ३०वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर एका भारतीयाकडून पुढे येत आहेत. यापूर्वी ’भारतीय शस्त्रे’ या विषयावर डॉ. जी. एन. पंत यांच्या महत्त्वपूर्ण संशोधनाव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय पातळीवर नोंदनीय कार्य अद्याप झालेले नाही. भारतातील ऐतिहासिक शस्त्रांवर परकियांनी केलेले काम मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्या संशोधनातील काही निष्कर्ष पटत नसले, कामातील मर्यादा स्पष्ट होत असल्या तरीही त्याविरुद्ध आपल्याकडे सखोल संशोधनाअभावी सबळ पुरावे नसल्याने सध्यातरी दुर्दैवाने गप्प राहावे लागत आहे. यावरचा एकमेव उपाय म्हणजे इतिहास अभ्यासामध्ये रस घेणार्‍या तरुणाईने शास्त्रशुद्ध दृष्टिकोनातून ‘भारतीय शस्त्राभ्यास’ या विषयाकडे वळणे! बदलते आधुनिक तंत्रज्ञान, इंटरनेटच्या सोयीमुळे संदर्भशोधनासाठी असलेल्या विपुल संधी, विदेशातील संग्रहालये, शस्त्रसंग्राहक यांच्यापर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचण्याची साधने या सर्व सोयींचा शक्य तितका वापर करून खूप उत्तम प्रकारे संशोधन करता येऊ शकते. भारतीय शस्त्रांच्या दस्तावेजीकरणातील दौर्बल्य, शस्त्रसंवर्धनाच्या अभावी विविध ठिकाणच्या शस्त्रांची होत असलेली झीज, संशोधनाबद्दलची राजकीय उदासीनता अशा अनेक कारणांनी भारतीय शस्त्राभ्यासाची वाट सध्यातरी बिकट आहे. आज परिस्थिती विपरीत असली तरी शस्त्राभ्यास क्षेत्राला सहानुभूतीची नाही तर सहकार्याची गरज आहे!
या शस्त्र परिषदेमध्ये माझ्याकडून मांडला जाणारा भारतीय तलवारींचा विषय ही भविष्यातील भारतीय शस्त्राभ्यास अधिक सखोलपणे आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडण्याची पहिली पायरी आहे. या क्षेत्रातल्या माझ्या वाढत्या अभ्यासानुसार शोधनिबंधांचे आणि संशोधनाचे विषय अधिक विविधांगी व सखोल होत जातील याची मला खात्री आहे. कोणतेही संशोधन कधीही परिपूर्ण नसते. वाढत्या अभ्यासानुरूप, संदर्भानुरूप त्याचे क्षेत्र आणि स्वरूप जाते. म्हणूनच, नोव्हेंबरमध्ये होणार्‍या या शस्त्रपरिषदेत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून हा विषय मांडल्यावर त्यावर येणार्‍या प्रतिक्रिया, तज्ज्ञांच्या सूचना, संबंधित क्षेत्रातील अभ्यासक मंडळींच्या ओळखी यासाठी मी खूपच उत्सुक आहे. ‘कोविड-१९’चे सावट सर्व जगावर पसरलेले असताना सुरक्षिततेसाठी या वर्षी परिषदेचे आयोजन जागतिक पातळीवर ऑनलाईन स्वरूपाचे योजले आहे. एरवी समोरासमोर विषयाची मांडणी करण्याची सवय असणार्‍या आमच्यासारख्या अभ्यासकांना या वर्षी हादेखील एक वेगळा अनुभव मिळणार आहे. संघटित प्रयत्नांनी शक्य झाल्यास भविष्यात अशा प्रकारची परिषद भारतामध्ये सुरु करण्याचा मानस आहे. ‘भारतीय शस्त्रे’ या विषयाबद्दलच्या जागृतीसाठी इतिहास अभ्यासकांमध्ये तसेच राज्यातील, देशभरातील विविध संग्रहालयांमध्ये व्याखाने, कार्यशाळा सुरु करायच्या आहेत. वाढत्या अनुभवाबरोबर या गोष्टीदेखील नक्कीच शक्य होतील याची खात्री आहे.


- गिरिजा दुधाट


गिरिजा दुधाट यांचा अल्पपरिचय
शिक्षण : पुरातत्त्वशास्त्र (पदवी), महाराजा सयाजीराव विश्वविद्यालय, बडोदा, गुजरात
लेखन व संशोधन कार्य
- ‘शस्त्रवेध : मध्ययुगीन भारताचे शस्त्रपर्व’ या भारतीय शस्त्रांवरील पुस्तकाचे लेखन
- राष्ट्रीय संग्रहालय, नवी दिल्ली येथील शस्त्रविभागामध्ये 2018 साली प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनी म्हणून कार्यरत
- अहमदनगर वस्तुसंग्रहालय व संशोधन केंद्र येथे ‘हस्तलिखित जतन’ विभागात काही काळ कार्यरत
- राष्ट्रीय संग्रहालय (नवी दिल्ली), सालारजंग संग्रहालय (हैदराबाद), निझाम वस्तुसंग्रहालय (हैदराबाद) तसेच काही वैयक्तिक शस्त्रसंग्रहांसाठी शस्त्रसंवर्धन करण्याचा प्रत्यक्ष अनुभव
- २०१८ साली ‘चापानेर’ या जागतिक वारसास्थळी युनेस्को व पुरातत्त्वविभाग च.ड. M.S. University Baroda यांच्याकडून झालेल्या उत्खननामध्ये सक्रिय सहभाग
- ‘ऐतिहासिक वारसा जतन व संवर्धन’ या विषयावर मराठी वृत्तपत्रांमधून लेखन
- ‘भारतीय शस्त्रे’ या विषयावर अनेक ठिकाणी व्याख्याने
@@AUTHORINFO_V1@@