प्रशांत पाटील : एक निर्मळ कार्यकर्ता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Oct-2020
Total Views |

Prashant Patil_1 &nb
 


प्रशांत भालचंद्र पाटील (वनवासी कल्याण आश्रम, नाशिक जिल्हा कार्यकर्ते व रा. स्व. संघ माजी नाशिक शहर सहकार्यवाह) यांचे शनिवार, दि. १० ऑक्टोबर रोजी दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या आठवणींना उजाळा देणारा हा लेख...
 
 
प्रशांतजींनी जपलेला निर्लेपपणा, पारदर्शकता कार्यकर्त्याच्या देवपणाच्या गुणांची साक्ष देणारा आहे. काल अचानक बातमी कानावर आली. स्वयंसेवक कार्यकर्ते प्रशांतजी पाटील गेल्याची. शहराचे सहकार्यवाह असताना आम्ही बरोबर होतो. क्षणभर कळलेच नाही. स्वयंसेवक कार्यकर्ता आपल्यात नाही, याची खंत सतत मनात वारंवार जाणवत होती. आजच्या आधुनिक पद्धतीने भावपूर्ण श्रद्धांजली सोशल मीडियावरती व्यक्त होऊन क्षणभरासाठी आपण संवेदना व्यक्त करतो. पण प्रशांतजी यांची बातमी माझ्या मनाला चटका लावून गेली. शहराच्या संघाच्या समुदायामध्ये काही वर्षे आम्ही एकत्र काम केलेलं होतं. वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्यालयात वारंवार काही कामामुळे आम्ही भेटत होतो. हे सगळे क्षण माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले. प्रशांतजी यांची मला हाक मारण्याची पद्धत, सतत हसतमुखाने संवाद साधण्याची कला मनावर कायमस्वरूपी कोरली गेली. अनेक दिवस न भेटतासुद्धा आपल्या भेटीत खूप अंतर आहे, असं कधी जाणवायचं नाही. मुळातच कार्यकर्त्यांची एकमेकांविषयीची आत्मीयता अशी याची जोडणी असते. संघकामाच्या कामाचा म्हणून हा एक भाग आहे. फोनवरसुद्धा प्रशांतजी यांच्या बोलण्यात एक अनोखी मृदुता, समोरच्या कार्यकर्त्याविषयी असलेला आदर त्यांच्या आवाजातही जाणवायचा. कार्यकर्त्याचे वागणं, बोलणं, चालणं अनेक अर्थाने कळत-नकळत संस्कार करत जाते. माणूस हयात असताना अनेक गोष्टी कदाचित आपल्याला जाणवत नाही. कार्यकर्त्याचा सहवास नावाची गोष्ट सहजपणाने अनेक गोष्टी पेरून जाते. या बैठकीतून त्या बैठकीत, पाठपुरावा, योजना, संपर्क यातून कार्यकर्ता भेटत असतो. संघ स्वयंसेवक हा अनेक अर्थाने माणसांच्या मनाशी जोडलेला असतो. त्यात प्रशांतजी यांसारखे अनेक कार्यकर्ते सातत्याने रोज दैनंदिन काम करत असतात. त्यातला समर्पण भावही इतका बेमालूम असतो, त्या व्यवहाराने आयुष्याला तो अर्थ प्राप्त करून देत असतो. कुठल्याही प्रकारच्या प्रसिद्धी नावाच्या झोतात न येता वर्षानुवर्षे काम करत राहणे हे अद्भुत आहे, मी नेहमी मानतो. लौकिकार्थाने शिक्षण काही झालं असेल तरी जीवनाचे अनेक सकारात्मक पैलू मी स्वयंसेवक, कार्यकर्ते यांच्या सहवासात सातत्याने अनुभवत राहिलो आहे. प्रशांतजी यांच्या आजारपणाची मला कल्पना नव्हती. का कुणास ठाऊक त्यांनी आपल्या बोलण्यातसुद्धा कधी जाणवून दिली नाही. हातात एक छोटीशी पिशवी, वेळेवर बैठकीत पोहोचण्यासाठीचा आग्रह, बैठकांचे काटेकोर पूर्वनियोजन, बैठकीचे संचालन करताना सगळयांना बरोबर घेऊन जाण्याची किमया इतके पैलू प्रशांतजी यांच्या सहवासात पाहायला मिळाले. हे मोठे देणे आहे. सहकारी स्वयंसेवक कार्यकर्त्याचा उत्साह माझ्यासारख्या कार्यकर्त्याला काम करायला भाग पडतो. कामात असे नाते तयार होत जाते. सगळेजण सहजपणे एखाद्या कुटुंबाचे भाग होत जातात. कार्यकर्ता समजून घेणं एक प्रशांतजी यांचं आगळंवेगळं विशेष म्हणता येईल. क्षेत्र बदलत राहते, कामाचे स्वरूप बदलत राहते. पण, संघटनात्मक कामाचा स्वभाव म्हणून सगळे धागेदोरे, संपर्क अखंड सांभाळणे कार्यकर्त्याची कामाच्या दृष्टीने एक मोठी पुंजी असते. शेवटच्या आठवणींच्या काही दिवसात कल्याण आश्रमाच्या कामाशी तरुण विद्यार्थी जोडला जावा, याची एक सविस्तर चर्चा मीआणि प्रशांतजी यांच्या बोलण्यात झाली होती. त्यांच्या मनात त्यासाठी द्यावा लागणारा वेळ, संपर्क, बैठका कार्यक्रमाची आखणी याचे एक स्वरूप मनात तयार होत होते.
 
 
 
सहजपणातसुद्धा खंबीरपणा असतो. देहबोलीतसुद्धा आपल्या आजुबाजुच्या वातावरणात सुगंध पसरवण्याची किमया असते. नुसती डोळ्यांची नजरानजरसुद्धा इतकी बोलकी असते. माणसे जोडली जातात. हे प्रशांतजी आहेत. फार मोठ्या तात्त्विक, चिंतनाच्या किंवा विचारांच्या चर्चेत फारशे कधी पडले नाही. मी लिहिलेलं आवर्जून वाचणारे, प्रतिक्रिया देणारे. आपण आपल्या आयुष्यात कार्यकर्ता अनुभवतो, पाहतो, शिकत राहतो. रोजचे भांडे घासण्यासारखे कार्यकर्ता व्यवहार कार्यकर्ता विकास आणि कार्यपद्धती याच्या पायर्‍या ओलांडत असतो. पण, तो अशा काही गोष्टी समाजजीवनात शिल्लक ठेवून जातो, त्याचा साधा उल्लेख कदाचित फारसा कुठेही होणार नसतो. पण, कार्यकर्त्यांच्या मनात त्याची नेमकी जाणीव शिल्लक राहते. कदाचित ‘कार्यालय’ नावाच्या वास्तूला कार्यकर्त्याचे पैलू अधिक जाणवत असावेत. प्रशांतजींनी जपलेला निर्लेपपणा, संबंधातील पारदर्शकता कार्यकर्त्याच्या देवपणाची गुणांची साक्ष देणारे आहे. मी त्यांना कधीच त्रासात संवाद साधताना पाहिले नाही.चालते, बोलते, हसते आणि खेळकर मनस्थितीत संवाद साधताना पाहिले आहे. शेवटच्या काळात वनवासी कल्याण आश्रमाच्या साप्ताहिक बैठकांचे संचालन करताना मी त्यांना पाहिले आहे. माझ्या दृष्टीने कुठलेही एमबीए नावाची गोष्ट न करता नुसते बैठकांचे संचालन पाठपुरावा योजना आणि कार्यवाही यासाठी प्रशांतजींनी जपलेला आग्रह हा एक उत्तम व्यवस्थापनशास्राचा अनुभव आहे. न उलगडलेलं उलगडून दाखवण्याची किमया अशा संचालनात असते. त्याचा सुरुवात, मध्य आणि शेवट याची पुरेपूर काळजी घेणारे प्रशांतजी होते. मला नेहमी वयाने लहान असून ‘संजयराव’ संबोधायचे. कार्यकर्ता जाणं समाजाचे दुःख असते. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आपल्या घरातील माणूस नाही, असा व्यवहार जपणारे प्रशांतजी आज आपल्यात नाही. त्यांना मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली.
 
 
- संजय साळवे
 
 
प्रशांत पाटील : एक समर्पित कार्यकर्ता
 
 
काल प्रशांत पाटील गेले. बहुधा ही बातमी वृत्तपत्रात नाही येणार. कारण, ते तुमच्या-माझ्या सारखे एक ‘सामान्य; माणूस होते. संघकार्यात अशी लक्षावधी सामान्य माणसे आहेत. लौकिकार्थानं प्रशांत यांना सामान्य म्हणायचं खरं, पण त्याची संघशरणता, परिपूर्ण समर्पण भाव, सहृदयता आणि संघ सांगेल ती भूमिका; असामान्य कार्यकर्त्यांमध्ये त्यांची गणना करायला भाग पाडते. सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेला प्रशांत गेली साडेतीन चार दशके सातत्याने संघ सांगेल ते काम करत होते. रा. स्व. संघ, भारतीय मजदूर संघ, वनवासी कल्याण आश्रम अशा विविध संस्थांमध्ये त्यांनी तितक्याच समरसतेने काम केले. कुटुंबाचा प्रत्येक घटक परिवारातल्या कोणत्या ना कोणत्या कामात! भाग्यश्री वहिनी व चिनू समितीत, बाबा तर आधीपासूनच कल्याण आश्रमाचं काम करायचे. असं आदर्श कार्यकर्त्याचं घर. येणार्‍या जाणार्‍याचं सदैव हसतमुख स्वागत. सात-आठ वर्षं तरी त्याच्या सोबत संघकाम करण्याची संधी मिळाली. सहजगत्या कोणतंही घर आपलसं करणारा, वयस्क स्वयंसेवकांच्या गरजेला धावून जाणारा, तरुणांच्या खांद्यावर हात टाकून ‘चल रे’ म्हणणारा, सर्वांचा योग्य आदर राखणारा, नेहमी उत्साही असणारा, सोबतच्या कार्यकर्त्याची मरगळ घालवणारा, सेवावस्तीत कसलाही अभिनिवेश न ठेवता अकृत्रिम संपर्क करणारा, गणपतीत घरोघरी सामूहिक आरत्यांचा कार्यक्रम घडवून आणणारा, त्या निमित्तानं सुंदर आरास करणारा, अशी प्रशांत यांची अनेक रुपं डोळ्यासमोर उभी राहतात.
 
कधी मी एकटा आहे, असं कळल्यावर ‘प्रकाश, आज संध्याकाळी ये’ असं सांगून भाग्यश्रीला माझ्या आवडीचं कांद्याचं थालीपीठ करायला सांगायचे. सार्‍यांविषयी निखळ आत्मीयता त्याच्या सगळ्या व्यवहारात प्रकट व्हायची. असा निर्मळपणा आपल्यात का नाही अशी खंत वाटायची. गेलं वर्षभर किंवा जास्तच, कर्करोगासोबत त्यांची लढाई चालू होती. पण स्वतःची दुःख सांगत सुटणे हा त्याचा स्वभावच नव्हता. त्यामुळे कधीही रडगाणे नाही. त्यामुळे कित्येकांना ते आजारी होते हेही माहीत नाही. संघकामात कुणाच्या जाण्याने पोकळी वगैरे निर्माण होत नाही. पण अनेकांच्या व्यक्तिगत आयुष्यावरचा त्याचा ठसा दीर्घकाळ राहील, आठवण त्यांची येत राहील, हे नक्की. सद्गतीवर त्यांचा हक्कच आहे. ईश्वर नक्कीच ती त्यांना देईल.
 
- प्रकाश भिडे, उद्योजक
 
@@AUTHORINFO_V1@@