पाकसाठी उघूर मुस्लीम ‘नापाक’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Oct-2020   
Total Views |
China_1  H x W:

 
 
भारतात मुस्लीम समुदायावर मोठ्या प्रमाणात अत्याचार केले जातात, काश्मीरमध्ये तर मुस्लीम समुदाय जीव मुठीत धरूनच जगत असतो, भारतात सत्ताधारी भाजप मुस्लिमांना दुय्यम दर्जाचे नागरिक मानतात, त्यांच्या हक्कांवर गदा आणली जाते, अशा प्रकारचे फुकाचे आरोप पाकिस्तानकडून नेहमीच होत असतात.
 
 
केवळ भारत नव्हे, तर जगातील मुस्लिमांची आपल्यालाच कशी काळजी आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न पाकिस्तान अगदी १९४७ पासूनच करीत आला आहे. त्यासाठी आपल्या नावात ‘इस्लामिक रिपब्लिक’ हे अगदी अभिमानाने पाक मिरवतो. ‘पॅन इस्लामचे पालन पाक करतो’, असेही सातत्याने भासविले जाते. मात्र, भारतातील मुस्लिमांचे खोटे दावे करणार्‍या पाकचे लक्ष, शेजारीच असलेल्या चीनमधल्या उघूर मुस्लिमांकडे जात नाही, तेव्हा त्यांना ‘पॅन इस्लाम’ या तत्त्वाचा सोयीस्कर विसर पडतो.
 
 
पाकसाठी उघूर मुस्लीम हे ‘नापाक’ आहेत, हे पुन्हा एकदा सिद्ध करणारी घटना संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नुकतीच घडली. तर झाले असे की, संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार समितीच्या बैठकीत जवळपास ३९ देशांनी चीन-तिबेट, शिनजियांग प्रांत आणि हाँगकाँगमध्ये करीत असलेल्या अत्याचाराचा पाढा वाचला. चीनच्या मुजोरीमुळे मानवाधिकारांना काही अर्थच उरला नसल्याचा सूर या देशांनी लावला. त्यातही तिबेट आणि शिनजियांगमधील उघूर मुस्लिमांवर होणारे अत्याचार, त्यांचा वंशविच्छेद यावर सर्वच देशांनी अतिशय संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
 
 
चीनने संयुक्त राष्ट्र मानवाधिकार समितीचे प्रमुख आणि स्वतंत्र पर्यवेक्षकांना शिनजियांगमध्ये जाण्याची परवानगी द्यावी, जेणेकरून तेथील मुस्लीम समुदायाचे प्राण वाचू शकतील. कारण, चीनने उघूर मुस्लिमांचा चालविलेला वंशविच्छेद हा अतिशय भयावह आहे. या ३९ देशांचे हे संयुक्त निवेदन जर्मनीच्या राजदूतांनी वाचून दाखविले. त्यामुळे संयुक्त राष्ट्रामध्ये आता पाश्चिमात्य देशांनी चीनविरोधात उघडलेली आघाडी आता आणखी सक्रिय झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
 
अर्थात, चीन अशा प्रकारची मागणी मान्य करण्याची अजिबातच शक्यता नाही. कारण, मानवाधिकार असे काही नसतेच ही कम्युनिस्ट चीनने माओची कथित सांस्कृतिक क्रांती, तियानमेन चौक प्रकरण, या ज्ञात आणि अनेक अज्ञात घटनांनी सिद्ध केले आहे. दुसरीकडे जगभरातल्या अनेक देशांना कर्ज देऊन त्यांना आपल्या अंगणात बांधण्याचे काम चीनने चालविले आहे. त्यामुळे असे जवळपास ५५ देश चीनच्या तत्काळ मदतीला आले. त्यामुळे चीनच्या कर्जात रुतलेल्या आणि चीनची एक वसाहतच झालेल्या पाकिस्तानने चीनच्या बचावासाठी अगदी उत्साहाने पुढाकार घेतला.
 
 
त्यामध्ये उघूर मुस्लिमांच्या वंशविच्छेदाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून हाँगकाँगमध्ये आंतरराष्ट्रीय समुदायाने हस्तक्षेप करणे कसे चुकीचे आहे, हे पाकने अगदी घरचेच कार्य असल्यासारखे सांगितले. त्यानंतर क्युबाने आपल्या मालकाची तळी उचलून धरताना शिनजियांगमध्ये दहशतवाद आणि कट्टरतावादाविरोधात चीनने जी काही कारवाई चालविली आहे, ती कशी आवश्यक आहे हे सांगितले.
 
 
एकूणच चीनने आपल्या बाजूने बोलणार्‍यांची जी काही फौज निर्माण केली आहे, त्याचे नेतृत्व पाकिस्तान करीत असल्याचे दिसते. त्यामुळेच उघूर मुस्लिमांच्या होणार्‍या कत्तलींवर गप्प बसणे पाकला भाग आहे; अन्यथा गाळात गेलेल्या पाकला एक छदामही चीन देणार नाही. त्यामुळे इस्लामी देशांचे नेतृत्व करण्याचे स्वप्न पाहणार्‍या पाकला आपल्या मुस्लीम बांधवांच्या कत्तलींचे समर्थन करण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे, एरवी गुरगुरणारे पाकमधले मुल्ला-मौलवीसुद्धा त्याकडे दुर्लक्ष करत आहेत.
 
 
चीनचे अत्याचार यावेळी ‘ऑस्ट्रेलियन स्ट्रॅटेजिक पॉलिसी इन्स्टिट्यूट’च्या ‘इंटरनॅशनल सायबर सेंटर’मधले अभ्यासक नेथन रुजर यांनी एका छायाचित्राद्वारे समोर आणले आहेत. यामध्ये तीन किलोमीटर पसरलेल्या डिटेंशन सेंटरचे उपग्रहाद्वारे टिपलेले छायाचित्र त्यांनी जगासमोर मांडले आहे. त्यामध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक गुन्हेगारांच्या नावाखाली उघूर मुस्लिमांचा वंशविच्छेद बिनबोभाट सुरू असल्याचा दावा रुजर यांनी केला आहे. त्याचा विस्तार पाहता, त्यामध्ये तीन डिस्नेलँड मावतील, एवढ्या मोठ्या आकाराचे बडे डिटेंशन सेंटर आहे; अर्थात असे असले तरी चीनला त्याचा फरक पडणार नाही. मात्र, त्यामुळे पाकसह अन्य इस्लामी देशांची केविलवाणी स्थिती वारंवार अधोरेखित होत आहे.




@@AUTHORINFO_V1@@