विषातून अमृत, मातीतून मोती...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |


grafite_1  H x


विषाचं अमृत होतं. अमृताचं विष होतं. माणूस घाम शिंपडून मातीतून मोती पिकतो. कधी कधी माणसाची पुढची पिढी माजोरीपणाने पुन्हा त्या मोत्यांची माती करते. आता 'ग्राफ्रिन' कशातूनही काहीही निर्माण करेल आणि पर्यावरणही बिघडू देणार नाही.


पॅसिफिक महासागर हा पृथ्वीवरचा सगळ्यात मोठा आणि सगळ्यात खोल असा महासागर. त्याचे कित्येक भाग इतके खोल आहेत की, तेथील पाण्यात सूर्यप्रकाश कधीच पोहोचत नाही. त्या पाण्यात प्राणवायू नाही. सूर्यप्रकाश आणि प्राणवायू या कोणत्याही सजीव वस्तूला अत्यावश्यक गोष्टी तिथे नाहीत. सजीव वनस्पती सूर्यप्रकाशातून फोटोसिंथेसिस (प्रकाश संश्लेषण) क्रियेने आपले अन्न तयार करतात. या सजीव वनस्पती आणि प्राणवायू यामुळे सजीव प्राणी मग ते मासे असोत किंवा अन्य जीव असतो, जीवंत राहू शकतात. पॅसिफिक महासागरात अनेक ठिकाणी, अतिखोल भागात, सूर्यप्रकाश आणि प्राणवायू नसल्यामुळे कोणत्याच प्रकारची सजीवसृष्टी तिथे नाही. शिवाय त्या पाण्यात इतक्या प्रचंड प्रमाणात कार्बन आहे की, कोणताही सजीव तिथे निर्माणच होणार नाही. अशी कालपर्यंत वैज्ञानिकांची समजूत होती. पण, त्याच पाण्यात आता त्यांना काही सजीवांचे नमुने सापडले. इतक्या कमाल कार्बनयुक्त पाण्यात हे सजीव टिकले कसे, याचा शोध घेता असे आढळले की, इतर सजीवांसाठी विषमय असणारे ते कार्बनयुक्त पाणी हे त्या सजीवांसाठी जीवन आहे. ते सजीव त्याच पाण्यात जगू शकतात. त्या खोलीवरून ते जर सूर्यप्रकाश आणि प्राणवायूयुक्त पाण्यात आले, तर ते ताबडतोब मरतील, म्हणजेच जे सर्वसामान्य सजीवांसाठी विष आहे, ते या विशिष्ट सजीवांसाठी अमृत आहे. तुम्ही 'योगिकथामृत' हे अद्भुत आत्मचरित्र वाचलं आहे का? मुकुंदलाल घोष म्हणजेच संन्यास घेतल्यावरचे परमहंस योगानंद यांनी लिहिलेली ही आत्मकथा म्हणजे एक रोमांचक, चित्रचक्षुचमत्कारिक असा वाचनानुभव आहे. स्वामी योगानंद हे बरद्वान येथील स्वामी विशुद्धानंद उर्फ गंधबाबा यांना भेटले होते. गंधबाबा समोरचा माणूस म्हणेल तो सुगंध किंवा म्हणेल ती वस्तू नुसत्या इच्छेने निर्माण करीत असत. योगानंदांना (त्यावेळेचे मुकुंदलाल) त्यांनी गुलाब आणि चमेलीचे सुगंध निर्माण करून दाखवले, तर त्यांचे मित्र अलकनंद यांच्या इच्छेखातर समोर ठेवलेल्या चपालांची मोसंबे करून दाखवली. अलकनंदांनी भीतभीतच ती मोसंबी खाल्ली, पण ती स्वादिष्ट लागली.

 

स्वामी योगानंद या चमत्कारांचं शास्त्रीय विश्लेषणकरताना म्हणतात की, "कोणतीही वस्तू ही असंख्य सूक्ष्म अणूंची बनलेली असते. या अणूचे पुन्हा प्रोटॉन, इलेक्ट्रॉन इत्यादी सूक्ष्म भाग आहेत. या सूक्ष्मातिसूक्ष्म अणूंच्या रचनेतील फरकामुळे आपल्याला प्रत्येक वस्तू वेगळी दिसते. कळते, जाणवते. परंतु प्रयोगशाळेत दिसणाऱ्या या सूक्ष्मातिसूक्ष्म भागांपेक्षाही सूक्ष्म असा भाग म्हणजे त्या वस्तूच्या अणुतील प्राणशक्ती." योगानंद या प्राणशक्तीला 'लाईफट्रॉन' असा शब्द वापरतात. हे 'लाईफट्रॉन' पाच प्रकारचे असतात. गंधबाबा किंवा त्यांच्यासारखे सिद्धपुरुष आपल्या योगसामर्थ्याने कोणत्याही वस्तूला या 'लाईफट्रॉन'च्या स्पंदनांमध्ये बदल घडवून तिचे बाह्यरुपही बदलू शकतात. नवनाथांच्या कथांमध्ये एक गोष्ट आहे. एकदा सह्याद्री पर्वताच्या परिसरात तीर्थयात्रा करीत असताना गुरू मच्छिंद्रनाथांना वाटलं की, इथे अमूक एक मोठा यज्ञ केला पाहिजे. त्यांनी पट्टशिष्य गोरक्षनाथांना तशी आज्ञा केली. गोरक्षांनी कमंडलूतील पाणी हातात घेतले नि 'जय अलख निरंजन' म्हणून समोरच्या डोंगरावर शिंपडले. संपूर्ण डोंगर सोन्याचा झाला. त्या सोन्याचा वापर करून मच्छिद्रांचा यज्ञ पूर्ण झाला. लाखो लोकांना अन्नदान करण्यात आले. सगळे तृप्त झाल्यावर गोरक्षांनी पुन्हा डोंगरावर अभिमंत्रित पाणी शिंपडले डोंगर पूर्ववत दगडमातीचा झाला. गुरुशिष्य पुढील प्रवासाला निघून गेले. (मी ट्रेकिंगला वगैरे गेलो की, हा डोंगर सापडतो का ते पाहत असतो. तुम्हीही शोधा.) असो. तर भारतीय सिद्धयोग्यांच्या या योगसिद्धी सामर्थ्याचा सामान्य माणसाला त्यांच्या दैनंदिन समस्यांसाठी तसा उपयोग काहीच नाही. एका नामवंत मराठी लेखकाने एक स्वानुभव लिहिला आहे. बऱ्याच वर्षांनंतर लेखक स्वत:च्या गावी गेला. गावाच्या सुरुवातीलाच त्याच्या एका बालमित्राचं घर होतं. मूळ घर साधं मातीचं होतं, पण आता लेखक पाहतो, तर मित्राने मातीच्या घराच्या ठिकाणी सिमेंटचं स्लॅबचं आधुनिक घर बांधलं होतं. उन्हाळ्याचे दिवस होते. लेखक घरात शिरला. जुन्या मित्रांची कडकडून गळाभेट झाली. गप्पा, चहापाणी झालं. नव्या घराबद्दल बोलताना मित्र म्हणाला, "सगळ्या शहरी सुखसोयी करून घेतल्या खऱ्या, पण एक मिनीट पंख्याशिवाय राहवत नाही. मातीच्या घरात बाहेर कितीही उन्हाळाअसला तरी आत गारवा वाटायचा. शिमिटाच्या घरात दिवसा काय रात्रीसुद्धा भयंकर उडकतं."

 

आपल्याकडेच नव्हे, तर सर्व जगभर घरबांधणी ही विटा, लाकूड, चुना, रेती, वाळू माती यांच्यापासूनच होत असे. प्राचीन काळी एकदा ग्रीक लोकांनी ज्वालामुखीमधील राख वापरून पाहिली. त्या राख, खडी, माती यांच्या एकत्रिकीकरणाला त्यांनी शब्द वापरला 'सिमेंटम्.' त्यावरूनच आधुनिक बांधकाम साहित्याचं 'सिमेंट' हे नाव प्रचलित झालं. हा नवा पदार्थ तसा एकोणिसाव्या शतकातच प्रथम ब्रिटनमध्ये आणि नंतर अमेरिकेत उत्पादित होऊ लागला. भारतालासुद्धा १९१४ साली पोरबंदर या ठिकाणी पहिला सिमेंट कारखाना निघाला. पण, भारतीय काय किंवा कुठल्याच गवंडी लोकांना घर बांधायला हा पदार्थ अजिबात पसंत पडला नाही. पूल, धरणं, कारखाने वगरे मोठमोठ्या बांधकामात मात्र सिमेंटचा उपयोग वाढू लागला. मग १९३९ साली दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि सिमेंटची खरी उपयुक्तता लोकांना कळली. एकदा हा पदार्थ भिजला की, तो इतका कठीण बनतो की त्याच्यावर बॉम्ब पडला तरी तो तुटत-फुटत नाही. हे लक्षात येताच युद्ध साहित्यामध्ये सिमेंटचा तडाखेबंद वापर सुरू झाला. युद्धात युरोपातलेसगळेच देश आणि त्यांची महत्त्वाची शहरं जवळपासपूर्ण उद्ध्वस्त झाली. युद्धानंतर त्यांची पुनर्बांधणी करण्यास 'सिमेंट' हा तुलनेत स्वस्त आणि कारखान्यांमधून यंत्राद्वारे 'मास प्रॉडक्शन' होऊ शकणारा पदार्थ हाताशी आला. मग काय? जगभर सर्वत्र गृहबांधणीची जुनी पद्धत मागे पडून दणादण सिमेंटची घरं बांधली जाऊ लागली. आता ७५ वर्षांनंतर त्याचे दुष्परिणाम जाणवत आहेत. सिमेंट उत्पादन होत असताना आणि वापरल्यावरही त्याच्यामधून फार मोठ्या प्रमाणावर कार्बन उत्सर्जन होतं. त्यामुळे वातावरणातलीउष्णता वाढते. ही कार्बनप्रेरित उष्णता आता इतकी टोकाला जाऊन पोहोचली आहे की, उत्तर धु्रवावरचे हिमनद वितळू लागले आहेत.संपूर्ण मानवजात पर्यावरणविनाशाच्या अंतिम टप्प्यावर उभी आहे. मग यावर उपाय काय? माणसाने पुन्हा मातीची घरं बांधून त्यात राहावं का? कार्बन उत्सर्जन करणाऱ्या मोटारी टाकून बैलगाड्या नि घोडागाड्या वापराव्यात का? नाही कालचक्र उलटं फिरवता येणार नाही.

 

आधुनिक विज्ञान याच्या उत्तरादाखल 'ग्राफिन' या एका नव्याच पदार्थाकडे बोट दाखवत आहे. मुळात 'ग्राफ्रिन' हा पदार्थ 'ग्राफाईट' या मूलद्रव्यापासून बनवण्यात आला. पण, आता 'फ्लश ग्राफिन प्रोसेस' या प्रकियेद्वारे हा पदार्थ कोणत्याही टाकाऊ वस्तूपासून बनवण्याचा शोध लागला आहे. म्हणजे बघा, 'रिसायकल' न होऊ शकणारे प्लास्टिक पदार्थांच्या कचऱ्याचे डोंगर, इलेक्ट्रॉनिक कचऱ्याचे डोंगर, वापरून टाकून दिलेले वाहनांचे रबरी टायर या सगळ्यांचा उपयोग करून 'ग्राफिन' बनवता येईल. याबाबतीत वैज्ञानिकांनी अधोरेखित केलेली एक गोष्ट आपल्या भुवया उंचवायला लावणारीआहे. त्याच्या पाहणीनुसार, जगभरातले सर्व शहरी लोक खाण्यासाठी बनवलेल्या अन्नपदार्थांपैकी किमान ३० ते ४० टक्के अन्नपदार्थ शिळे झाले किंवा खराब झाले, म्हणून चक्क फेकून देतात. हा काही प्रमाणात माजोरीपणा आहे नि काही प्रमाणात नाईलाज आहे. गावात शिळे किंवा उष्टे खरकटे अन्न गुरेढोरे, कुत्री मांजरी तरी खातात, पण शहरात अनेकदा ते नाईलाजाने टाकूनच द्यावे लागते. अशा अन्नापासूनसुद्धा 'ग्राफ्रिन' बनू शकेल. आणि हा 'ग्राफ्रिन' सिमेंट किंवा अन्य कोणत्याही कार्बन उत्सर्गी पदार्थापासून कार्बनचा उत्सर्ग होण्याचे प्रमाणच कमी करून टाकेल. मात्र, हे करताना तो त्या पदार्थाचे बाह्यरूप बदलणार नाही. चपलांची मोसंबी झाली किंवा दगडाचं प्रथम सोनं आणि परत दगड बनले तसं न होता सिमेंट हे सिमेंटच राहील. मात्र, त्यातून होणारा कार्बन उत्सर्ग कमी होईल किंवा कदाचित अजिबात होणार नाही. विषाचं अमृत होतं. अमृताचं विष होतं. माणूस घाम शिंपडून मातीतून मोती पिकतो. कधी कधी माणसाची पुढची पिढी माजोरीपणाने पुन्हा त्या मोत्यांची माती करते. आता 'ग्राफ्रिन' कशातूनही काहीही निर्माण करेल आणि पर्यावरणही बिघडू देणार नाही. विज्ञान आणि अध्यात्म आणखी जवळ येत चालले आहे.

 
 
@@AUTHORINFO_V1@@