कर्मासाठी जन्म आपुला...!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jan-2020
Total Views |
karma_1  H x W:


आत्मशक्ती ही अनेक संकटांवर मात करून मानवाला विजयी बनवितो. आत्मिक बळाने परिपूर्ण माणूस सार्‍या जगाचा नेता बनतो. जग त्याच्या मागोमाग धावू लागते. आत्मबलिष्ठ महामानवाचे शब्द जनसमूहासाठी प्रमाण बनतात. याच आत्मशक्तीच्या सामर्थ्यामुळे प्रबळ शत्रूवर मात करता येते.


य: प्रथम: कर्मकृत्याय जज्ञे,
यस्य वीर्यं प्रथमस्यानुबुद्धम्।
येनोद्यतो वज्रोऽभ्यायताहिं,
स नो मुत्र्चत्वंहस:॥
(अथर्ववेद-४.२४.६)


अन्वयार्थ

(य: प्रथम:) जो श्रेष्ठ, पहिला आत्मा (कर्मकृत्याय) कर्म करण्यासाठी (जज्ञे) जन्म घेतो, शरीर धारण करतो. (यस्य प्रथमस्य) ज्या सर्वोत्तम-प्रथम आत्म्याचे (वीर्यम्) बळ व शक्ती हे (अनुबुद्धम्) सर्वांनाच ज्ञात आहे. (येन) ज्या कारणामुळे, ज्यासाठी (उद्यत:) उचललेले (वज्र:) वज्र-शस्त्र (अहिम्) पापाला (अभ्यायत) नाहीसे करते. (स:) तो आत्मा (न:) आम्हा सर्वांना (अंहस:) पापापासून (मुत्र्चतु) दूर करो, सोडवो!


विवेचन

जन्म-जन्मांतरांची पुण्यकर्मे उदयास आल्याने आत्मा मानव देह धारण करतो. अनेक जन्म मन व इंद्रियांच्या दोषांमुळे व पापकर्मांमुळे या आत्म्यास पशुयोनीतून घालवावी लागतात. मानव अथवा पशू या दोन्हींपैकी कोणती योनी मिळवायची? हे आपल्या आत्म्याच्या अधिकारात आहे. श्रेष्ठ कर्मे कराल, तर मानव जन्म आणि वाईट कर्मे कराल तर पशुजन्म, हे ठरलेलेच आहे. ‘कर्मयोनी’ व ‘भोगयोनी’ हे दोन प्रकार! मानवजन्म हा कर्म व भोग या दोन्हीकरिता आहे. मानव देहात येऊन आत्मा पूर्वजन्माच्या व या जन्माच्या केलेल्या कर्मांना भोगतो आणि नवीन कर्मेपण करू शकतो. मानवजन्मात भगवंताने कर्म करण्याचा जो अधिकार दिला आहे, तो मात्र पशूंना नाही. म्हणून पशूंची फक्त ‘भोगयोनी’च आहे. कारण, त्यांना कर्मे करता येत नाहीत. त्यांच्या माना नेहमी खाली जमिनीकडे झुकलेल्या असतात. म्हणून त्यांना ‘अधोमुखी’ म्हणतात. फक्त पाहावयाचे व भोगावयाचे, पण काहीही (कर्म) करावयाचे नाही. ‘पश्यति इति पशु:।’ पण, मानव मात्र ‘ऊर्ध्वमुखी’ म्हणजेच वर, समोर पाहणारा आहे. पाहून विचार करणारा, चिंतन व मनन करणारा आहे. ‘मननात् मनुष्य:।’ निरुक्त शास्त्रात महर्षी यास्क मनुष्य शब्दाचे निर्वचन करताना म्हणतात- “मत्त्वा कर्माणि सीव्यति।” म्हणजेच जो विवेकशीलता व मननशक्तीने शुद्ध करून तो आपली कामे करतो तो ‘मनुष्य’ होय. या जगात कर्म करण्यात अग्रभागी असलेले लोक पुढे असतात. याउलट कर्महीन व भोगणारे हे मात्र नेहमी मागेच राहतात. म्हणूनच पशू हे मागे आणि मनुष्य ‘प्रथम:’ पहिल्यांदा अगोदर असतो. पण, त्याची ही अग्रभागिता ‘कर्मकृत्याय’ म्हणजेच कर्म करण्यासाठी आहे. आळशी बनून व्यर्थ जगण्यासवे कदापि नव्हे! कर्मयोगाची महती रेखाटताना श्रीमद्भगवद्गीतेत योगेश्वरांनी वेदोक्त विचारांचा धागा पकडत म्हटले आहे- नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मण:। शरीरयात्रापि च ते न प्रसिद्ध्येदकर्मण:॥ हे मानवा! तू शास्त्रांनी प्रतिपादित केलेल्या कर्तव्यकर्मांचे पालन कर. कारण, कर्म न करण्यापेक्षा काही तरी कर्म करणे हेच सर्वोत्त्म आहे. आपल्या शरीराची वाटचालदेखील कर्माशिवाय यशस्वी होऊ शकत नाही.


जन्माचे कारणच कर्मासाठी व तेही सत्कार्यासाठी आहे! सत्कर्मांची वेल सतत हिरवीगार ठेवावी व ती वाढवावी. हे केले नाही तर पुन्हा पशुजीवनच मिळणार! मग काय भोगत राहावीत दु:खेच दु:खे! हे टाळावयाचे असेल तर सत्कर्म करण्यात खंड पडता नये. जितके होईल तितके व जेवढे जमेल तेवढे शुभकर्म करावे. पण, जीवात्म्याला भगवंताने स्वातंत्र्य बहाल केले आहे. त्याकरिता मुनी पाणिनीने आत्म्यासाठी ‘स्वतंत्रकर्त्ता’ हे सूत्र निर्मिले. पण, कर्म करण्याची मुभा, स्वतंत्रता असली, तरी फळे भोगण्यात मात्र तो परतंत्र आहे. कर्माप्रमाणे फळे मिळणारच, मग ती चांगली असो की वाईट!


वेद मानवाला ईश्वरास साक्षीभूत मानून कर्म करण्याची प्रेरणा देतात. त्या दिव्य महानतम अशा सर्वव्यापक ईश्वरीय शक्तीला आपल्या अतिनिकट मानून जो कर्मे करीत राहतो, तो कदापिही अनिष्ट कर्माकडे वळणार नाही. कर्तव्यकर्मे ही नित्य, नैमित्तिक, प्रायश्चित व उपासना अशी चार प्रकारची असल्याचे शास्त्रकार सांगतात. ईश्वराची भक्ती, संध्या, चिंतन, मनन आणि योगसाधना (ध्यान) हे नित्यकर्म, प्रसंगोचित समारंभ, उत्सव, लोकव्यवहार हे नैमित्तिक कर्म, पापकर्मे झाल्यानंतर भविष्यात ती होऊ नयेत, याकरिता त्यांपासून परावृत्त होण्यासाठी स्वेच्छेने ‘चांद्रायणव्रत’, ‘मौनव्रत’ इत्यादींसारख्या तपांचे अनुष्ठान म्हणजे प्रायश्चित कर्म आणि बुद्धी व ज्ञानपूर्वक परमेश्वराच्या ठायी आपले ध्यान केंद्रित करणे, म्हणजे /‘उपासना कर्म’ होय..! याउलट जी अज्ञान, अविद्या किंवा इंद्रियविषयांतून उदयास आलेली किंवा काम-क्रोध, लोभ, मोह, इर्ष्या, मद-मत्सर या षड्रिपूंतून उदयास आलेली असतात, ती सर्व निषिद्ध कर्मे होत. या निषिद्ध कर्मांपासून दूर राहत वरील चार कर्मे आणि वेदोक्त पवित्र, शुद्ध व विवेकयुक्त पवित्र (यज्ञ) कर्मे असतात, त्यांचे पालन करण्याकरिताच आत्मा मानव जन्मात येतो.


आत्मा हा काय साधारण थोडाच आहे? तो तर प्रचंड शक्तीचा! आत्म्यामध्ये जग जिंकण्याचे सामर्थ्य आहे. शरीराने कमजोर असलेला सामान्य माणूससुद्धा आत्मबळाने मोठ-मोठी असामान्य अशी क्रांतिकारी कामे करून अजरामर ठरतो. आत्मशक्तीच्या बळावर महापुरुषांनी सार्‍या जगाचे नेतृत्व केले. आत्मतेजाने चकाकणार्‍या असंख्य दिव्यात्म्यांनी सार्‍या विश्वाला दीपवून टाकल्याची उदाहरणे इतिहासाच्या पाना-पानांतून वाचावयास मिळतात. म्हणूनच तर वेदमंत्र सांगतो -‘यस्य वीर्यं प्रथमस्य अनुबुद्धम्।’ त्या श्रेष्ठ अशा आत्म्याचे बळ सर्वांना ज्ञात आहे. आत्मशक्ती ही अनेक संकटांवर मात करून मानवाला विजयी बनवितो. आत्मिक बळाने परिपूर्ण माणूस सार्‍या जगाचा नेता बनतो. जग त्याच्या मागोमाग धावू लागते. आत्मबलिष्ठ महामानवाचे शब्द जनसमूहासाठी प्रमाण बनतात. याच आत्मशक्तीच्या सामर्थ्यामुळे प्रबळ शत्रूवर मात करता येते. शत्रू हा आतला असो की बाहेरचा, आत्मा हा वज्राचे रूप धारण करून त्याला संपवून टाकतो. ईश्वराच्या सामर्थ्यानंतर आत्म्याचे सामर्थ्य सर्वोच्च मानले आहे. शारीरिक व मानसिक बळाबरोबरच आत्मिक बळ प्रभावी मानले जाते. कारण, आत्म्याच्या शक्तीवरच इतर सर्वांचे सामर्थ्य अवलंबून आहे. आत्मा हा सर्व जड तत्त्वांवर अधिराज्य करतो. ज्ञानबळ व कर्मबळ या दोन्हींच्या समन्वयाने आणि बुद्धीच्या पावित्र्याने आत्मा हा त्रैलोक्यास पादाक्रांत करू शकतो. पण, या सर्वांचा उद्देश सर्व प्रकारच्या अनिष्ट वृत्तींचा व पापांचा नायनाट करणे हा आहे. यालाच तर ‘सात्त्विक बळ’ असे म्हणतात.


आजची समाजव्यवस्था ‘आत्मनिष्ठ’ न बनता ‘इंद्रियनिष्ठ’ बनत चालली आहे. माणूस हा आत्मसाधनेने आंतरिक विषय शत्रूंशी न लढता बाह्य विषयांना बळी पडून शरीर, मन, बुद्धी व एकूण आपल्या समग्र जीवनाची अधोगती करून घेतो आहे. यामुळेच समाजात आज आत्महत्या, नैराश्य, बेचैनी, दु:ख-भय, चिंतेचे साम्राज्य पसरले आहे. आत्म्याचा शरीर धारण करण्याचा मुख्य उद्देश ज्ञानपूर्वक सत्कर्म करण्याकरिता आहे, याची जाणीव मानवाला राहिली नाही. आत्मविस्मृतीचा भयावह राग त्याला जडला आहे. म्हणूनच दु:खाचे जीणे जगतोय. याचकरिता वरील मंत्र सर्वांकरिता नवसंजीवनी देणारा ठरतो. याच मंत्रोक्त आशयाला अभिव्यक्त करणार्‍या कवी मनोहर कवीश्वर यांच्या प्रसिद्ध गीताच्या ओळी येथे प्रसंगोचित भासतात-
विमोह त्यागून कर्मफलांचा,
सिद्ध होई पार्था !
कर्तव्याने घडतो माणूस,
जाणून पुरुषार्था!!
- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य
@@AUTHORINFO_V1@@