जम्मू काश्मीर : वैष्णोदेवी धाममधील नैसर्गिक गुहेच्या प्रवेशद्वाराजवळ एक भव्य सुवर्णद्वाराची रचना पूर्ण झाली आहे. लवकरच भाविकांना सोन्याचा हा भव्य दरवाजा पाहता येणार आहे. हे आता कायमस्वरुपी गेट आहे, जे सध्याच्या मार्बलच्या गेटची जागा घेईल. हे काम तीन महिन्यांपूर्वीच सुरू झाले होते, जे आता पूर्णत्वास येत आहे. दरवाजा चांदीचा बनवलेला आहे, ज्यावर सोन्याचा मुलामा दिला आहे. हे काम पूर्णत्वास नेण्यासाठी २० हून अधिक शिल्पकार चोवीस तास काम करत आहेत.
वैष्णोदेवी बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिमरनदीप सिंह यांनी सांगितले की, हे गेट सुमारे ११०० किलो चांदीचे असून १० किलो सोन्याचा यावर मुलामा देण्यात आला आहे. वैष्णो देवी, महागौरी, सिद्धीत्री, कालरात्री यासह देवींचे वेगवेगळी रूपे या गेटवर कोरली आहेत. दरवाजाच्या वर एक खास छत्रीही बनविण्यात आली आहे. दरवाजाच्या उजवीकडे देवी लक्ष्मीची ६ फूट उंच मूर्ती कोरलेली आहे. ज्यासाठी याठिकाणी विशेष पूजास्थानही बनविण्यात आले आहे.