मुंबई : प्रदूषणाची समस्या गंभीर असून जल आणि वायु प्रदूषणाची समस्या आमच्या सरकारसमोरील मोठे आव्हान असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी केले. गडकरी यांच्या हस्ते शुक्रवारी राज्याच्या कांदळवन संरक्षण विभागाकडून (मँग्रोव्ह सेल) बोरिवलीच्या गोराई खाडीत उभारण्यात येणार्या कांदळवन उद्यानाचे भूमिपूजन पार पडले. यावेळी त्यांनी देशातील प्रदूषणाच्या समस्येबाबत भाष्य करत मुंबई प्रदूषणमुक्त करण्याची गरज व्यक्त केली. यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन मुंबई महानगरपालिकेच्या ५८ हजार कोटी रुपयांच्या राखीव निधीचा वापर करून तंत्रज्ञानाची कास धरत प्रदूषणावर मात करणार्या योजना राबविणे आवश्यक असल्याचे गडकरी म्हणाले.
Water & air pollution are grave challenges in the world today. Contributing to the ecological conservatory efforts, the ‘Borivali-Gorai Mangroves Park’ is conceived with an aim to raise the ecological awareness and create a platform for eco-friendly lifestyle. #Borivalishines pic.twitter.com/lphL93Hb4U
— Vinod Tawde (@TawdeVinod) August 16, 2019
वनविभागाच्या मँग्रोव्ह सेलअंतर्गत निसर्ग पर्यटनाला चालना देण्यासाठी बोरिवलीच्या गोराई खाडी परिसरात अद्यावत कांदळवन उद्यान बांधण्यात येणार आहे. या उद्यानाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम शुक्रवारी दुपारी बोरिवलीच्या अटल स्मृती उद्यानात पार पडला. यावेळी नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून तर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर, खा. गोपाळ शेट्टी, आ. विजय गिरकर, मनिषा चौधरी, प्रविण दरेकर, मुंबई उपनगराचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
@nitin_gadkari यांच्या हस्ते राज्याच्या कांदळवन संरक्षण विभागाकडून (मँग्रोव्ह सेल) बोरिवलीच्या गोराई खाडीत उभारण्यात येणाऱ्या कांदळवन उद्यानाचे भूमिपूजन पार पडले. pic.twitter.com/SzWMnFe3a6
— महा MTB (@TheMahaMTB) August 16, 2019
वनविभागाकडून अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (आयटी) एम.के.राव, ठाण्याचे मुख्य वनसंरक्षक नरेश झुरमुरे, ठाण्याच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या वनसंरक्षिका ज्योती बॅनर्जी आणि मँग्रोव्ह सेलच्या उपवनसंरक्षिका निनू सोमराज या देखील उपस्थित होत्या. यावेळी डिजिटल माध्यमाद्वारे उद्यानाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. या उद्यानाची संकल्पना विनोद तावडे यांची असून गेल्या दोन वर्षांपासून ते यासाठी सातत्याने पाठपुरावा करत होते. यावेळी तावडे म्हणाले की, “केरळ राज्यामध्ये सुरू असलेल्या खाडी पर्यटनाच्या धर्तीवर मुंबईमध्ये कांदळवन उद्यानाची निर्मिती करण्यात येत आहे. या माध्यमातून निर्माण होणार्या रोजगाराच्या संधीसाठी स्थानिकांना प्राधान्य देण्यात येईल. यासाठी उद्यानाचा बांधकाम खर्च जिल्हाविकास निधीच्या माध्यमातून करण्यात येणार असून माहूल आणि दहिसर येथेही अशा पद्धतीचे उद्यान उभारण्याचा प्रस्ताव आहे.
गोराई खाडीतील ८ हेक्टर क्षेत्रावर हे उद्यान उभारण्यात येणार आहे. यामध्ये उन्नत स्वरूपाचे कांदळवन माहिती केंद्र, कांदळवनांमध्ये फिरण्यासाठी लाकडी पायवाट, पक्षी निरीक्षणाकरिता उंच मनोरा असणार आहे. हे सर्व बांधकाम पर्यावरणपूरक सामुग्रीने करण्यात येईल.” उद्यानामध्ये सौरउर्जेचा वापर करण्यात येणार असून काम करणार्या कर्मचार्यांच्या भरतीमध्ये ८० टक्के स्थानिकांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे तावडे म्हणाले. या उद्यानाचे काम ऑक्टोबर २०१९ पूर्ण करण्याचा कांदळवन कक्षाचा मानस आहे,” असे ते म्हणाले.
याप्रसंगी गडकरी यांनी प्रदूषणाच्या समस्येवर भाष्य केले. आमच्या सरकारसमोर जल आणि वायु प्रदूषणाचे आव्हान असून पुढील पाच वर्षांमध्ये त्यासंबंधी योजना राबविणे आवश्यक आहे. नागरिकांना प्रदूषणमुक्त जीवनशैली निर्माण करून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मी दिल्लीत गेल्यापासून तेथील वायु आणि यमुनेच्या जलप्रदूषणासाठी ५५ हजार कोटी रुपयांच्या योजना राबविल्या. त्यामुळे दिल्लीचे प्रदूषण २९ टक्क्यांनी घटल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच मुंबईच्या प्रदूषणमुक्तीसाठी लोकप्रतिनिधी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे गडकरी म्हणाले. “तंत्रज्ञानाची कास धरून महापालिकेच्या राखीव निधीचा वापर केल्यास मुंबई नक्की प्रदूषणमुक्त होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आम्ही नागपूरमध्ये प्रसाधनगृहातील पाण्याच्या आधारे वीजनिर्मिती, त्या पाण्यातील मिथेनचे विलगीकरण करून इंधननिर्मिती, मासळी व भाजी बाजारातून निघणार्या कचर्याच्या आधारे बायो सीएनजी, अशा विविध योजना राबवित आहोत. पुढील दोन वर्षांमध्ये याचे परिणाम दिसून येणार असल्याचे गडकरींनी सांगितले.