आंबोलीतून पालीच्या नव्या प्रजातीचा उलगडा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jul-2019   
Total Views |


 


 ज्येष्ठ उभयसृपशास्त्रज्ञ डाॅ.वरद गिरी यांच्या नावाने पालीचे नामकरण


मुंबई (अक्षय मांडवकर) : उभयचरांच्या जैवविविधतेची खाण असणाऱ्या आंबोलीमधून पालीच्या नव्या प्रजातीचा शोध लागला आहे. राज्यातील तरुण उभयसृपशास्त्रज्ञांनी पालीच्या या नव्या प्रजातीचा उलगडा केला आहे. 'हेमिडॅक्टिलस' पोटजातीमधील या नव्या प्रजातीचे नामकरण ज्येष्ठ उभयसृपशास्त्रज्ञ डाॅ.वरद गिरी यांच्या नावाने 'हेमिडॅक्टिलस वरदगिरी' असे करण्यात आले आहे.

 
 
 
 

महाराष्ट्रातील पालींच्या जैवविविधतेत आणखी एका पालीच्या प्रजातीची भर पडली आहे. देशातील सरीसृपांचा विचार केल्यास आजही या वर्गाबाबत संशोधनाचे काम सुरू आहे. गेल्या दशकभरात उभचरांविषयी काम करणाऱ्या संशोधकांची फळी महाराष्ट्रात तयार झाली आहे. याच कामाअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटामधून पालीच्या एका नव्या प्रजातीचा शोध लावण्यात संशोधकांना यश मिळाले आहे. जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालेल्या पश्चिम घाटातील आंबोलीचा परिसर उभयचरांच्या जैवविविधेसाठी प्रसिद्ध आहे. बंगळूरु येथील 'नॅशनल सेन्टर फाॅर बायोलाॅजिकल सायन्स इन्सिट्यूट' या संस्थेत कार्यरत असणारे अक्षय खांडेकर, इशान अग्रवाल, अर्पणा लाझमी आणि संशोधक आर. चैतन्य यांनी या नव्या पालीचा उलगडा केला आहे. बुधवारी प्रसिद्ध झालेल्या 'झूटॅक्सा' या संशोधन पत्रिकेत या संशोधनाचे वृत्त प्रकाशित करण्यात आले. ही नवी प्रजात 'हेमिडॅक्टिलस' या पोटजातीमधील असून यामध्ये भारतात सुमारे ३५ प्रजातीच्या पाली सापडतात.

 
 
 
 

नव्याने सापडलेली ही प्रजात आंबोलीमध्ये सहजरित्या दिसून येत असल्याची माहिती संशोधक अक्षय खांडेकर यांनी दिली. नवी प्रजात 'हेमिडॅक्टिलस ब्रुकाय' या वर्गातील पालींशी साधर्म्य असणारी आहे, असे त्यांनी सांगितले. डिसेंबर, २०१८ मध्ये संसोधकांनी या पालीचे नमुने गोळा केले होते. 'हेमिडॅक्टिलस ब्रुकाय' या वर्गातील पालींशी साम्य असल्याने संशोधकांनी तिची आकारशास्त्राबरोबर गुुणसूत्रांच्या आधारे चाचणी केली. त्यावरून संशोधकांना ही नवी प्रजात असल्याचे लक्षात आले. ही पाल ५५ मि.मि आकाराची असून ती घराच्या भिंतीपासून आंबोलीतील सड्यांवरील खडकांखाली आढळत असल्याचे खांडेकर यांनी सांगितले. ज्येष्ठ उभयसृपशास्त्रज्ञ डाॅ. वरद गिरी यांचे भारताच्या उभयसृपशास्त्रातील योगदान लक्षात घेता पालीला त्यांचे नाव दिल्याचे, ते म्हणाले. डाॅ. गिरी हे भारतातील नामांकित उभयसृपशास्त्रज्ञ असून या क्षेत्रात काम करणाऱ्या तरूण संशोधकांचे मार्गदर्शक आहेत. यापूर्वी नव्याने सापडलेल्या पालींच्या दोन आणि सापाच्या एका प्रजातीला त्यांचे नाव देण्यात आले आहे.

 
 

वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा...

facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@