'ड्रॅगनफ्लाय' डाऊन!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jul-2019   
Total Views |


 

चीनमध्ये तर मार्च २०१० पासून 'गुगल'ला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. गुगलच्या हातून चीनसारखी तब्बल ८०० दशलक्ष इंटरनेट वापरकर्त्यांची मोठी बाजारपेठ कायमची हातातून निसटली आहे.


माहितीच्या महाजालात आपला २४X७ सखासोबती म्हणजे गुगल. या गुगलशिवाय आज लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकांचं पानही हलत नाही. गुगल अवघ्या काही मिनिटांसाठी जरी तांत्रिक कारणास्तव क्रॅश झाले, तरी त्याची 'ब्रेकिंग बातमी' होते. त्यामुळे दैनंदिन आयुष्यात गुगल एक मार्गदर्शक, एक सोबती म्हणून टप्प्याटप्प्यावर मानवी जीवनाचा अविभाज्य भाग ठरला आहे. म्हणूनच गुगलशिवाय इंटरनेटची साधी कल्पनाही अगदी न रुचणारी. पण, चीन आणि काही आखाती देशांमध्ये गुगल आणि गुगलशी संबंधित समाजमाध्यमांवर पूर्णत: बंदी आहे.

 

चीनमध्ये तर मार्च २०१० पासून 'गुगल'ला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यानंतर गुगलने 'ड्रॅगनफ्लाय' नावाखाली चिनी सरकारशी सेन्सॉरशिपच्या नियमांसमोर मान तुकवत प्रायोगिक तत्वावर एक स्वतंत्र सर्च इंजिनही डिझाईन केले. पण, आता तो प्रयोग संपुष्टात आल्याचे अधिकृतरित्या गुगलनेच जाहीर केल्यामुळे गुगलच्या हातून चीनसारखी तब्बल ८०० दशलक्ष इंटरनेट वापरकर्त्यांची मोठी बाजारपेठ कायमची हातातून निसटली आहे.

 

चीनसारख्या एकपक्षवादी आणि कम्युनिस्ट देशात अभिव्यक्तिस्वातंत्र्याला अजिबात थारा नाही. सरकारविरोधात, नेतेमंडळींबद्दल, मानवी अधिकारांचे हनन वगैरे विषय तर अगदी वर्ज्य. सरकारविरोधात कंठ फुटण्यापूर्वीच तुमची रवानगी तुरुंगात झालीच म्हणून समजा. म्हणूनच, गुगलने खास चिनी इंटरनेट वापरकर्त्यांसाठी सुरु केलेल्या 'google.cn' या सर्च इंजिनलाही अवघ्या काही वर्षांत आपला गाशा चीनमधून गुंडाळावा लागला. कारण, २०१० साली याच चिनी गुगलचा वापर करुन चिनी हॅकर्सने अनेक अमेरिकन कंपन्या तसेच मानवाधिकार कार्यकर्त्यांचे डेटा, माहितीवर हल्ला चढवला. त्यानंतर चिनी गुगलचे दरवाजे बंद झाले आणि चिनी इंटरनेट वापरकर्त्यांना सेन्सॉरशीप नसलेल्या 'google.hk' वर (हाँगकाँगचे गुगल) वेबट्राफिक वळवण्यात आले. ही परिस्थिती आजतागायत कायम आहे. खरं तर चिनी इंटरनेट वापरकर्त्यांचे गुगलवाचून काही एक काम अडत नाही.

 

कारण, बायडू, सोगोऊ, बिंग आणि अशी इतर अनेक सर्च इंजिन चीनमध्ये प्रसिद्ध आहेत. पण, तरीही चीनची दिवसेंदिवस विस्तारणारी इंटरनेटवापरकर्त्यांची संख्या गुगलला खुणावत होतीच. म्हणूनच २०१७ साली गुगलने अगदी गुप्तता पाळत चीनसाठी 'ड्रॅगनफ्लाय'वर १०० जणांच्या टीमसोबत कामही सुरु झाले. परंतु, २०१८ साली 'द इंटरसेप्ट'च्या हवाल्याने गुगलच्याच एका अधिकार्‍याने 'ड्रॅगनफ्लाय'च्या संकल्पनेचा पदार्फाश केला. कारण, 'ड्रॅगनफ्लाय'साठी गुगलने चीन सरकारच्या सर्व अटीशर्ती मान्य केल्या होत्या. त्यानुसार विकिपीडिया तसेच चीनला अमान्य असलेला, चीनविरोधी कुठलाही संवेदनशील मजकूर 'ड्रॅगनफ्लाय'वरुन वापरकर्त्यांना सर्चही करता येणार नाही.

 

एवढेच नाही, तर त्यांचे वैयक्तिक दूरध्वनी क्रमांकही त्यांच्या 'सर्च'शी लिंक केले जातील. जेणेकरुन कोणी, कधी, काय सर्च करण्याचा प्रयत्न केला, यावरही चिनी सरकारचे नियंत्रण राहील. तरीही सुंदर पिचाई यांच्यासह गुगलला पूर्ण विश्वास होता की, इतर चिनी सर्च इंजिन्सपेक्षा 'ड्रॅगनफ्लाय' सरस ठरेल आणि चिनी इंटरनेट वापरकर्त्यांचा विश्वासही संपादित करेल. पण, गुगलअंतर्गतच कर्मचारीवर्गाचा वाढता विरोध, चिनी सेन्सॉरशीप पुढे झुकणारे अभिव्यक्तिस्वातंत्र्य विरोधातील धोरण याची दखल घेत अखेरीस 'ड्रॅगनफ्लाय'वरील काम गुगलला बंद करणे भाग पडले.

 

त्यामुळे आजच्या बाजारीकरणाच्या युगात, गुगलसारखी कंपनीही केवळ नफ्यासाठी आपलीच ध्येय-धोरणे पायदळी तुडवू शकते, याची प्रचिती या प्रकरणावरुन पुनश्च आली. त्यातच गुगल अमेरिकन कंपनी असल्यामुळे 'अमेरिका विरुद्ध चीन' अशा आंतरराष्ट्रीय संघर्षाचीही किनार 'ड्रॅगनफ्लाय'च्या मानगुटीवर होतीच. पण, 'ड्रॅगनफ्लाय' उडण्यापूर्वीच त्याचे पंख छाटले गेले आणि गुगलवर टीकेचा भडिमार झाला.

 

आजचे युग हे डेटाचे. या डेटाला आता सोन्यापेक्षाही जास्त किंमत. म्हणूनच, गुगल असो किंवा इतर आयटी कंपन्या त्यांनी वापरकर्त्यांचा हा डेटा विकून त्यांच्या खाजगीकरणाचा भंग करणे कदापि स्वीकार्ह नाही. कारण, आपण सर्च केलेली, सेव्ह केलेली माहिती ही सर्वोपरी सुरक्षित आहे, असे इंटरनेट वापरकर्त्यांना वाटत असते. पण, प्रत्यक्षात त्या माहितीचा कोणी गैरवापर करणार नाही, याची शाश्वती आज कुणीही देऊ शकत नाही. त्यामुळे संवेदनशील, खाजगी माहितीची देवाणघेवाण करण्यापूर्वी आज इंटरनेट वापरकर्त्यांनीही कंपनीची 'प्रायव्हसी पॉलिसी' ध्यानात घेण्याची नितांत गरज आहे. तसेच, अशाप्रकारे बेकायदेशीरपणे, नकळत वापरकर्त्यांची माहिती लिक करणार्‍या देशी-विदेशी कंपन्यांना कायद्याच्या कक्षेत आणलेच पाहिजे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@