पाचशेवी स्मृतिशताब्दी लिओनार्दोची!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |




पाश्चिमात्य लोकांना काही व्यक्तींबद्दल सतत काहीतरी बोलणं, लिहिणं, संशोधन करणं याचं अक्षरशः वेड आहे. यात येशू ख्रिस्त, अलेक्झांडर, शेक्सपिअर, नेपोलियन यांच्या बरोबरच लिओनार्दोचंही नाव घ्यावं लागेल.

 

दि. २ मे, १५१९ या दिवशी लिओनार्दो-द-विंची हा महान कलावंत फ्रान्समध्ये अँबॉये या गावी वयाच्या ६७व्या वर्षी मरण पावला. म्हणजेच या वर्षी त्याच्या मृत्यूला ५०० वर्षं पूर्ण झाली. इटली या त्याच्या मायदेशाबरोबरच फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी ऑस्ट्रिया आणि अमेरिकेतही लिओनार्दोच्या पाचशेव्या स्मृतिशताब्दीनिमित्त नानाविविध प्रदर्शने, चर्चासत्रे, भाषणे, नवी संशोधने असे सगळे कार्यक्रम दरोबस्त सुरू आहेत. पाश्चिमात्य लोकांना काही व्यक्तींबद्दल सतत काहीतरी बोलणं, लिहिणं, संशोधन करणं याचं अक्षरशः वेड आहे. यात येशू ख्रिस्त, अलेक्झांडर, शेक्सपिअर, नेपोलियन यांच्या बरोबरच लिओनार्दोचंहीनाव घ्यावं लागेल.

 

यात अनेकदा विकृत गोष्टीही घुसत असतात किंवा योजनाबद्धपणे घुसवल्या जात असतात. गेली कित्येक वर्षं विद्वान, अभ्यासक, संशोधक यांची अशी पद्धत होती की, या प्रसिद्ध व्यक्तींच्या गुणांबरोबरच त्यांच्या अवगुणांची वा उणिवांची पण चर्चा करायची. आपल्याकडचा खाक्या वेगळ्याच आहेत. एखादा चित्रकार आपल्या चरित्रनायकाची इतकी बेफाट स्तुती करीत सुटतो की, न दिसणार्‍या परमेश्वरानंतर हा चरित्रनायक हाच पृथ्वीवर अवतरलेला चालता-बोलता परमेश्वर असला पाहिजे, असं वाचकाला वाटू लागतं. पाश्चिमात्य चरित्रकारांना आपल्या चरित्रनायकाच्या अवगुणांपैकी, त्याची ‘बायकांची लफडी’ हा अवगुण चघळायला फार आवडतो. समजा, चरित्रविषय रशियन सम्राज्ञी ‘कॅथरिन-द-ग्रेट’ असेल किंवा ब्रिटिश सम्राज्ञी ‘पहिली एलिझाबेथ’ असेल, तर त्यांनी कसं अनेक पुरुषांना खेळवलं, याचं वर्णन ते अगदी मिटक्या मारीत करतात. अगदी तसंच ‘मोनालिसा’ या लिओनार्दोच्याचित्रातली स्त्री प्रत्यक्षात कोण होती, तिचे आणि लिओनार्दोचे काय संबंध होते वगैरे मांडणी करताना हे विद्वान अगदी तल्लीन होत होते. गंमत म्हणजे, ही सगळी अटकळबाजीच बरं का! प्रत्यक्ष पुरावा काहीच नाही.

 

गेल्या २० वर्षांपासून हा विकृतीचा प्रवाह पण बदलतोय. हे सगळे महान लोक स्त्रीलंपट होते, असे संशोधन मांडण्यापेक्षा ते समलिंगी म्हणजे ‘गे’ होते, अशी संशोधनं अगदी धडाक्याने मांडण्यात येत आहेत. शेक्सपिअर आणि नेपोलियनला ‘गे’ ठरवून झालं. रॉबिन हूड आणि त्याचा जानी दोस्त जॉन लिट्न (मराठीत धाकला जॉन) यांना ‘गे’ ठरवून झालं. शेरलॉक होम्स आणि त्याचा दोस्त डॉ. वॉटसन ज्या काल्पनिक व्यक्ती आहेत, त्यांनासुद्धा ‘गे’ ठरवून झालं. ‘टाईम्स लिटररी रिव्ह्यू,’ ‘न्यूयॉर्कर’ वगैरे वृत्तपत्र वाचणार्या आपल्याकडच्या काही अचरट पत्रपंडितांनी यावरून प्रेरणा घेऊन आपल्या ‘शोले’मधल्या वीरू आणि जय यांनाही ‘गे’ ठरवून टाकलं होतं. असे लोक लिओनार्दोला कसा बरं सोडतील? सध्याचं त्यांचं ताजं संशोधन म्हणजे लिओनार्दो ‘गे’ होता आणि तो त्याच्या बापाला एक नोकराणीपासून झालेली अनौरस संतती होता. हा दुसरा मुद्दा खराच आहे. पृथ्वीच्या पाठीवर सदासर्वकाळ श्रीमंत, प्रतिष्ठित आणि सत्ताधारी पुरुष अंगवस्त्र’ बाळगत आलेले आहेत. आजचा काळही त्याला अपवाद नाही. फक्त आता चोरून ठेवतात. पूर्वी राजरोस ठेवायचे. किंबहुना, अंगवस्त्र असणं हेच एक प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जात असे. फक्त यातला महत्त्वाचा भाग असा की, पूर्वीचे लोक अंगवस्त्रांपासून झालेल्या संततीच्याही पोटापाण्याची काळजी घेत असत. त्यांना वार्‍यावर सोडत नसत.

 

असो. तर पूर्वी लिओनार्दो अनौरस होता, हे सत्य इतक्या गर्जून सांगितलं जात नसे. आता ते जोरात सांगणं हीच फॅशन झालीय आणि तो ‘गे’ होता याला सबळ पुरावा आहेत का? तर नाही. पण, एकंदर सर्व गोष्टी ध्यानात घेता आम्हाला तसं वाटतं, म्हणे! अतिशय योजनाबद्ध रीतीने समलिंगी विकृती समाजात सर्वत्र फैलावण्याचे हे उद्योग आहेत. ते कसंही असो, पाश्चिमात्य समाजातही चांगले लोक आहेत आणि ते निर्मळ, निरोगी मनाने लिओनार्दोच्या कलाकृतींचे, लेखनाचे, संशोधनाचे पुन्हा पुन्हा आकलन करीत आहेत. पुन्हा पुन्हा आश्चर्याने थक्क होत आहेत. मध्य इटलीतला टक्सनी प्रांत. फ्लोरेन्स हे प्रख्यात शहर ही त्याची राजधानी. फ्लोरेन्सजवळच्या विंची नावाच्या खेड्यात राहणारा पिएरो फ्रुओसिनो डि अँटोनिओ या धनाढ्य इसमाला कॅतरिना नामक नोकराणीपासून झालेला मुलगा म्हणजे लिओनार्दो. पण, हा पोरगा अलौकिक प्रतिभेचं लेणंच घेऊन आला होता. वयाच्या ऐन विशीत देखणा चेहरा आणि व्यायामाने कमावलेलं बांधेसूद शरीर यामुळे लिओनार्दो मर्दानी सौंदर्याचा आदर्श समजला जाई. पण, एवढ्यावर थांबायला तो काही कोणी हिंदी चित्रपटातला ‘खान’ नव्हता. त्याची ज्ञानलालसा अत्यंत तीव्र होती. सरणार्‍या प्रत्येक वर्षाबरोबर लिओनार्दो अधिकाधिक ज्ञानवंत होत गेला. त्याने मानवी शरीरशास्त्राचा कसून अभ्यास केला. तो उत्तम चित्रकार बनला, तो उत्तम मूर्तिकार बनला. तो एकाच वेळी उत्कृष्ट आर्किटेक्टही होता आणि इंजिनिअरही होता. तो संगीताचाही जाणकार होता की, गणिततज्ज्ञही होता. तो तरुण व्यायामपटूही होता आणि तज्ज्ञ निसर्ग अभ्यासकही होता. सुदैवाने त्याला आश्रयदातेही चांगले मिळाले. पहिल्यांदा मिलानचा ह्युक लॉरेंझो डि येडिसी आणि नंतर अखेरपर्यंत फ्रान्सचा सम्राट पहिला फ्रान्सिस या दोघा राजपुरुषांनी लिओनार्दोला आश्रय दिला. त्याला अत्यंत आदराने वागवलं. त्याच्या गुणांची कदर केली. त्याच्यावर अनेक कामं सोपवली.

 

लिओनार्दोने या दोघांसाठी काही किल्ले-गढ्या उभारल्या. सैनिकी दृष्टीने त्यांचा उत्तम बंदोबस्त केला. अनेक राजवाडे उभारले. ते फारच उच्च कलेने सजवले. अनेक चौक, कारंजी, बगीचे उभारले. हे करताना बहुदा तब्येतीमुळे चित्रं काढायला त्याला वेळ मिळाला नसावा. कारण, त्याच्या पूर्ण चित्रांची संख्या २० देखील नाही. अपूर्ण चित्रं मात्र खूप आहेत. त्याच्या रेखाटनांची वही ही अद्भुत वस्तू आहे. त्यावरून असं दिसतं की, त्याला भौतिकशास्त्रातही जबरदस्त गती होती. त्याने कच्ची रेखाटनं केलेली अनेक यंत्रं नंतरच्या काळात संशोधित झाली. उदा. सायकल आणि विमान. लिओनार्दोला खगोलशास्त्रातही गती होती का? आणि पृथ्वी व इतर ग्रह स्थिर अशा सूर्याभोवती फिरतात, तसंच पृथ्वी चपटी नसून गोल आहे, हे त्याला माहिती होतं का? असावं. आता गंमत पाहा हं! लिओनार्दो १५१९ साली मरण पावला. त्यानंतर १५६४ साली इटलीतच गॅलिलिओ हा प्रख्यात शास्त्रज्ञ जन्मला. तो १६४२ साली मरण पावला. मृत्युपूर्वी काही वर्षे त्याने गणित आणि प्रत्यक्ष निरीक्षण यावर आधारित सिद्धांत मांडला. त्याचा आशय असा की, हे विश्व पृथ्वीकेंद्रित नसून सूर्यकेंद्रित आहे. सूर्य हा स्थिर असा तारा असून पृथ्वीसह अन्य ग्रह हे त्याच्याभोवती भ्रमण करतात. शिवाय पृथ्वी ही चपटी नसून गोल आहे. झालं! इटलीतले धर्ममार्तंड खवळले. कारण, गॅलिलिओचं हे संशोधन ख्रिश्चन धर्ममताविरुद्ध होतं. त्यावेळचा धर्मप्रमुख पोप उर्बान माढवा हा गॅलिलिओचा मित्र होता. पण, तोही भडकला. गॅलिलिओवर खटला भरण्यात आला. देहांत शासन होता होता तो थोडक्यात बचावला.

 

आपल्याकडचे विज्ञाननिष्ठ लोक अगदी गहिवरून ही गोष्ट सांगत असतात. पण, मग एकाएकी त्यांच्या लक्षात येतं की, या कथेतलं धर्ममार्तंड म्हणजे आळंदी, पैठण किंवा देहूचे सनातनी हिंदू धर्ममार्तंड नव्हेत. गाठ अत्यंत प्रबळ अशा ख्रिश्चन धर्मपीठाशी आहे. मग ते एकदम सौम्य बनतात. असो. तर गॅलिलिओच्या जन्मापूर्वी ६४ वर्षे अगोदर म्हणजे सन १५०० साली लिओनार्दोनेकाढलेलं ‘साल्वादोर मुंडी’ म्हणजे ‘पृथ्वीचा तारणहार’ या नावाचं एक चित्र अलीकडेच उजेडात आलं. १५ नोव्हेंबर, २०१७ या दिवशी ‘ख्रिस्टीज’ या जगप्रसिद्ध लिलावगृहाने न्यूयॉर्कमध्ये त्याचा लिलाव केला. ४५०.३ दशलक्ष डॉलर्स एवढ्या विक्रमी किंमतीला ते विकलं गेलं. त्या चित्रात लिओनार्दोने असं दाखवलंय की, ‘तारणहार’ म्हणजे अर्थातच येशू ख्रिस्त, त्याच्या डाव्या तळहातावर पृथ्वीचा पारदर्शक असा गोल आहे आणि उजवा हात उंचावून तो दोन बोटं म्हणजे असं समुद्र दाखवतो आहे. एकंदरीत लिओनार्दोला असंख्य विद्या, असंख्य शास्त्र अवगत होती, असंच म्हटलं पाहिजे. त्याच्या मृत्यूला ५०० वर्षे झाली तरी विद्वान त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध, शोध घेतच आहेत. आकलन आणि पुनर्मूल्यांकन करीतच आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@