कागदी सीमारेषांचीही चिनी चीड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Mar-2019   
Total Views |


 


जगाचे बाकी काहीही होवो, ते काहीही विचार करो, आपला विचार, आपला देश, आपली जमीन हेच सर्वोच्च असा हा आत्मकेंद्री विचार. अजूनही चीन त्याच पुरातन भूमी पादाक्रांत करण्याच्या मानसिकतेत अडकलेला दिसतो.


चिनच्या धूर्तपणाविषयी कुणाच्याही मनात तीळमात्र शंका नसावीच. कारण, या देशाची एकूणच वागणूक कायमच संशयास्पद आणि बेभरवशाची राहिली आहे. त्यामुळे चीनचे आज जागतिक स्तरावरील मित्रत्व हे दिखाऊ आणि व्यापारी गरजांची पूर्तता करणारेच. पाकिस्तानही त्याला अपवाद नाही. एखाद्या देशाला मदत करा, त्यांची संसाधने वापरा आणि त्या देशाला भिकेला लावा, हीच चीनची व्यापारयुगातील रणनीती. त्याचबरोबर आपल्या आसपासच्या इतर देशांच्या जमिनी, समुद्र यांवरही मालकी हक्क मिरवण्यात चीन सदैव अग्रेसर. एकूण १४ देशांबरोबर चीनच्या सीमा लागून आहेत. पण, जवळपास या सगळ्याच देशांबरोबर इतर ४ अशा मिळून एकूण १८ देशांबरोबरही चीनचे काही ना काही सीमावाद आजही कायम आहेत. कारण, चीनलाही ते सोडवण्यात रस नाही, उलट या देशांनीच आपल्या मालकीची जमीन बळकावल्याचे, समुद्रावर कब्जा केल्याचे चीन उच्चरवाने सांगत असतो. भारत, तिबेट, भूतान बरोबरच जपान, उत्तर कोरिया, म्यानमार या देशांशीही चीनचे सीमावाद आहेतच. रशिया, नेपाळसारख्या देशांबरोबर असलेले सीमावाद चीनने करारान्वये मिटवल्याचे वरकरणी दाखविले असले तरी चिनी सीमेवर सर्व काही अजूनही आलबेल नाही. मंगोलिया, पाकिस्तानच्या सीमेवर सध्या इस्लामिक कट्टरवाद्यांनीही चीनविरोधात आघाडी उघडल्याचे चित्र आहे. पण, केवळ चिनी दडपशाहीमुळे या देशात नेमके चाललेय तरी काय, हे कळायचा मार्ग नाही.

 
जागतिक माहितीचा केंद्रबिंदू असलेल्या गुगलवर या देशात बंदी आहेच. त्यामुळे आपल्या सीमा, आपला भूप्रदेश हा चीनला त्यांच्या सार्वभौमत्वाचा प्रश्न वाटतो. भारताचे अरुणाचल प्रदेश या राज्याचे अस्तित्वच चीनला मान्य नाही. एवढेच काय, तर भारतीय पंतप्रधानांनी अरुणाचल प्रदेशला भेट दिल्याचेही चीनला रुचत नाही. याचीच प्रचिती देणारा आणखी एक प्रकार नुकताच उजेडात आलाचीनमधील अनहुई प्रांतात जगाचा नकाशा तयार करणाऱ्या कंपनीवरच छापेमारी करण्यात आली. कारण काय, तर या चिनी कंपनीने अरुणाचल प्रदेश भारतात दाखवला आणि तैवानही स्वतंत्र देश म्हणून अंकीत केला. तडकाफडकी जवळपास ३० हजारांवर इंग्रजी भाषेत छापलेले, निर्यात तसेच देशांतर्गत विक्रीसाठी तयार असलेले नकाशे चिनी सरकारच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले आणि त्यांची विल्हेवाट लावून टाकली. त्या कंपनीवर, त्या कंपनीच्या मालकावर काय संक्रांत ओढवली असेल, याची तर कल्पनाच न केलेली बरी. तिबेटही आपलाच मानणारा चीन अरुणाचल प्रदेशला South 'Tibet Autonomous Region' (TAR) म्हणून आपल्या अधिकृत नकाशावरही दाखवतो. त्याचबरोबर आगामी काळात तिबेटही चीनचाच भाग होईल, याबद्दलही चीन प्रचंड आशावादी आहेच. म्हणूनच, दलाई लामांची भारताशी जवळीक चीनच्या डोळ्यात खुपते. एवढेच काय, तर अरुणाचल प्रदेशमधील पाच ठिकाणांची चक्क नावे बदलण्याचा उद्दामपणाही मागे चीनने केला होता. तसेच अधूनमधून पर्वतीय क्षेत्रांतून घुसखोरी करणे, स्थानिकांना धमकावणे, अरुणाचलच्या सीमेपर्यंत रस्त्यांची निर्मिती करणे यांसारखे आगळिकीचे प्रकार चीनकडून वारंवार सुरूच असतात. भारतानेही चीनच्या या आडमुठ्या वागणुकीचा वेळोवेळी विरोध दर्शविला आहेच. पण, हा मुजोर चीन सुधारणाऱ्यांपैकी नाही.
 

चिनी सरकार त्यांच्या स्थानिक बाजारपेठांमध्ये वेळोवेळी अशा धाडी मारून हजारो नकाशे जप्त करते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर काडीमात्र फरक पडत नसला तरी चिनी विद्यार्थी, नागरिक यांच्या मनावर सातत्याने तिबेट असो तैवान अथवा अरुणाचल प्रदेश हे त्यांच्याच मालकीचे प्रदेश असल्याचा चुकीचा इतिहास बिंबवला जातो. साहजिकच, यामुळे दोन्ही देशांतील नागरिकांचे संबंधही खराब होऊ शकतात पण, चीनलाही या सगळ्याशी काहीही देणेघेणे नाही. उलट, सार्वभौमत्वाचा दाखला देत, चीनने आंतरराष्ट्रीय नकाशालाही न जुमानण्याचा खुजेपणा कित्येक वर्षांपासून दाखवला आहे. जगाचे बाकी काहीही होवो, ते काहीही विचार करो, आपला विचार, आपला देश, आपली जमीन हेच सर्वोच्च असा हा आत्मकेंद्री विचार. अजूनही चीन त्याच पुरातन भूमी पादाक्रांत करण्याच्या मानसिकतेत अडकलेला दिसतो. म्हणूनच, जे अस्तित्वात नाही, जे जमिनी सत्य नाही, ते नकाशातही खपविण्याचीही चीनची तयारी नाही. त्यामुळे चीनचे असे हे द्वेषमूलक वागणे भविष्यातही बदलण्याची शक्यता तशी धूसरच असली तरी भारताने या पूर्वेच्या शत्रूपासूनही सावध राहायलाच हवे!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@