लोकमान्य टिळक आणि सार्वजनिक गणेशोत्सव भाग-६

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Dec-2019
Total Views |


saf_1  H x W: 0


क्वेट्टा ते कोचीन आणि कलकत्ता ते कराची अशी या उत्सवाची व्याप्ती वाढली, त्याला जबाबदार होते ते फक्त टिळक! आज टिळकांचा हा उत्सव जगभर पसरला असे आपण म्हणतो. पण, त्याचा प्रसार होण्याची सुरुवात तेव्हापासूनच झाली होती याचीही अनेक उदाहरणे सापडतात. अरबस्तानच्या टोकावर असेलल्या एडनपासून तर पूर्व आफ्रिकेतल्या नौरोबी शहरापर्यंत हा उत्सव त्याच काळात पोहोचला होता. कराची, लाहोर, रावळपिंडी आणि क्केट्टा याही शहरात पूर्वी गणेशोत्सव होत असे. टिळकांनी आपल्या संघटन कौशल्यावर त्याची व्याप्ती वाढवून गणेशोत्सव 'राष्ट्रीय' केला. मात्र, आज आपण पुन्हा तो उत्सव त्याच जुन्या वळणावर, म्हणजेच फक्त सार्वजनिक स्तरावर आणून ठेवला आहे. त्याला पुन्हा राष्ट्रीय विचारांचे, देशभक्तीचे, स्वरूप देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत का?


गणेशोत्सव कुणी सुरु केला, या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण गणेशोत्सवाच्या एका प्रदीर्घ प्रवासाचा वेध घेतला. भाऊ रंगारी आणि लोकमान्य टिळक हा वाद आता अगदी काल-परवा सुरू झालेला आहे, तो पुन्हा उकरून काढणार्‍यांचे आपापसातील हेतू काहीही असोत; पण इतिहासाचा अभ्यास करताना मात्र एक गोष्ट लक्षात घ्यायला लागते की, टिळक आणि भाऊ रंगारी दोघेही एकमेकांना समकालीन होते. त्यांच्यापैकी कुणीही 'गणेशोत्सवाचा जनक मी आहे' असा चकार शब्दही काढला नाही. किंबहुना, 'माझे श्रेय तुम्ही घेत आहात,' असा दुर्विचार दोघांच्याही मनात आला नाही. उलट आपल्या संपत्तीची व्यवस्था लावण्यासाठी नेमलेल्या विश्वासू माणसात भाऊ रंगारी यांनी टिळकांचे नाव पहिल्या क्रमांकावर लिहिले होते आणि भाऊ रंगारी गेल्यानंतर टिळकांनी त्यांच्या वृत्तपत्रातून जाहीरपणे खेदही व्यक्त केला होता. त्या दोघांचेही संबंध इतके दृढ होते. त्यांच्या एकमेकांवरच्या निष्ठा अपार होत्या, हे ज्याला समजते, त्याने अकारण वाद माजवू नयेत. टिळकांनी हा गणेशोत्सव राष्ट्रीय पातळीवर नेला हे जगजाहीर आहे. त्याबद्दल अनेकांनी जाहीरपणे लिहूनही ठेवले आहे. 'टिळक हे आपले पहिल्या क्रमांकाचे शत्रू आहेत,' असे ज्या चिरोल साहेबाने मानले, त्यानेही कुचकटपणाने का होईना, या उत्सवाचे श्रेय टिळकांना दिले आहे. देशभक्त खानखोजे यांच्या काही आठवणी पूर्वी 'केसरी' पत्रात प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यात ते लिहितात, "पुण्याकडे रा. टिळकांच्या नेतृत्वाने गणपती उत्सव देशभक्तीच्या प्रचारार्थ 'राष्ट्रीय उत्सव' झाला होता. त्याला राष्ट्रधर्माचे स्वरूप मिळाले. पुण्याच्या धर्तीवर अमरावती, वर्धा नागपूर इत्यादी शहरात सार्वजनिक गणपती उत्सव सुरु झाले. 'गणानां त्वां गणपती हवामहे' या व्यापक दृष्टीने गणराज्य देणारा गणपती म्हणजे स्वातंत्र्यदेवता होय, असा प्रचार सुरू झाला. उत्तम वक्त्यांच्या आणि देशभक्त हरदासांच्या द्वारे गणपतीच्या आश्रयाने क्रांतिकारक एकत्र करण्याचे काम गणपती उत्सवाने सुलभ झाले. धार्मिक उत्सव असल्याने पोलीस ह्यात हात घालू शकत नव्हते."

 

तळागाळात हा गणपती पोहोचल्याने साहजिकच टिळकांची जागृतीची साधने खेड्यापाड्यांत पोहोचत होती. जिथे जिथे गणेशोत्सव जात होता, तिथे तिथे स्वदेशी, बहिष्कार, आणि राष्ट्रीय शिक्षण हे आपसूक जाणारचं हे नक्की होते. एखाद्या गावात, तेथील मंडळात गणेशोत्सव सुरू होणे म्हणजे टिळकांच्या चतु:सुत्रीचे बीजारोपण होणे असेच समजले जात असे. सध्या आपल्या राष्ट्राची स्थिती किती वाईट आहे, याची जाणीव याही काळात लोकांना करून द्यावी लागत असे. उत्सवाच्या निमित्ताने 'स्वदेशी माल वापरा' असे सांगितल्यावर परदेशी मालावर आपोआप बहिष्कार पडत असे, हे वेगळे सांगावयास नको आणि मग धार्मिक श्रद्धेला स्मरून गणपतीच्या समोर स्वदेशी माल वापरण्याच्या शपथाही लोकांना दिल्या जात. स्वराज्याची चळवळ गावागावांत आणि घराघरांत जावी यासाठी हा उत्सव महत्त्वाचा होता. म्हणूनच अत्यंत संयमाने, धोरणीपणाने टिळकांनी त्यांनी या उत्सवाला राष्ट्रीय स्वरूप दिले. हिंदूंमधील आपापसातील जाती एकत्र येऊन हा उत्सव साजरा करत असत. पण, त्याचबरोबर पर्वते यांनी लिहिलेल्या चरित्रात एक महत्त्वाचा उल्लेख केला आहे ते लिहितात, "People of even other communities like Parsees and Jews and Muslims have also seen their way to help its celebration as years rolled on! Even in the year 1896, that is to say only two or three years after it was started it had become a national festival" गणेशोत्सव सुरू होण्यास काहीशी मुस्लीम दंग्याची पार्श्वभूमी असली तरी तो राष्ट्रीय स्तरावर साजरा होऊ लागला तेव्हा हा भेद नाहीसा होऊन परधर्माचेही लोक यात सहभागी होऊ लागले, ही बाब ऐतिहासिकदृष्ट्या फार महत्त्वाची आहे. हिंदूंच्या गणेशोत्सवात अनेकदा मुस्लीम वक्त्यांना आमंत्रित केले जात असे, ही बाब निराळी एकजूट दाखवून देते, होय ना!

 

'क्वेट्टा ते कोचीन' आणि 'कलकत्ता ते कराची' अशी या उत्सवाची व्याप्ती वाढली आणि त्याला जबाबदार होते ते फक्त टिळक! टिळकांचा हा उत्सव जगभर पसरला असे आपण म्हणतो. पण, त्याचा प्रसार होण्याची सुरुवात तेव्हापासूनच झाली होती, याचीही अनेक उदाहरणे सापडतात. अरबस्तानच्या टोकावर असेलल्या एडनपासून तर पूर्व आफ्रिकेतल्या नौरोबी शहरापर्यंत हा उत्सव त्याच काळात पोहोचला होता. कराची, लाहोर, रावळपिंडी आणि क्केट्टा याही शहरात पूर्वी गणेशोत्सव होत असे. काळाच्या ओघात आपल्याकडूनच घडलेल्या काही चुकांमुळे ती शहरे आता पाकिस्तानात गेली आणि तेथील हिंदूंच्या वस्तीचे आता उच्चाटन झाले. आता पुन्हा त्या इतिहासाची पाने नुसती चाळली तरीसुद्धा मनात कालवाकालव झाल्यावाचून राहत नाही. टिळकांच्या काळातला उत्सव आजही तसाच राहावा, अशी अपेक्षा कुणी करू नयेच, काळाच्या ओघात बर्‍याच गोष्टींचे स्वरूप बदलते हे मान्य करायला हवे, त्याप्रमाणे भारताने स्वातंत्र्य मिळवल्यानंतर या उत्सवाचे स्वरूपही झपाट्याने बदलले. स्वातंत्र्य मिळवण्याच्या कार्यात एक महत्त्वाचा वाटा गणेशोत्सवाने उचलला. पण, स्वातंत्र्य मिळवले म्हणजे उद्दिष्ट पुरे झाले असे नाही. देशापुढे उभ्या असलेल्या कितीतरी समस्या अशा चुटकीसरशी नक्कीच सुटणार नव्हत्या, त्या सुटल्याही नाहीत आणि संपल्यासुद्धा नाहीत. 'सुराज्य' वगैरे कल्पना बोलण्यापुरत्या ठीक वाटतात; पण देश स्वतंत्र झाल्यावर गणेशोत्सवासारख्या राष्ट्रीय उत्सवाने ते 'सुराज्य' ध्येय राबवण्यासाठी किती झपाटून काम केले? स्वातंत्र्याच्या चळवळीतून घडलेल्या कार्यकर्त्यांची, त्यांच्या कामाची गती मंदावली. टिळकांच्या दूरदृष्टीतून सुरू झालेल्या एका राष्ट्रीय उत्सवाला शिथिलता आली आणि दुर्दैवाने आजही ती कायम आहे.

 

गणेशोत्सवाचं स्वरूप बदललं, त्याचं रुपडं कमालीचं पालटलं. 'राष्ट्रभक्ती', 'राष्ट्रनिष्ठा' हे शब्द काळाच्या ओघात जुने ठरतात की काय, असे वाटू लागले. या शब्दांना पूर्वी सच्चेपणा आणि निष्ठेची सावली होती, ती आताशा पार मावळली. गणपतीच्या मिरवणुकीत उधळला जाणारा गुलाल आमच्या डोळ्यात इतका गेला की त्याने सगळी दृष्टीच बदलली आणि राष्ट्र स्वातंत्र्याचा, मूर्तींचा ढिग केविलवाणेपणाने आमच्याकडे पाहत असतो, तेव्हा मनात काहीच वाटत नाही का? पत्त्यांचे डाव रंगू लागले. कार्यकर्त्यांच्या तोंडातला मद्याचा वास वातावरण दूषित करू लागला. जुने सारे संपले... मेळे गेले मवाली आले. गणेशोत्सवाच्या एका राष्ट्रीय उत्सवाच्या आत्म्याची पुरती धूळधाण झाली. टिळकांच्या काळात सगळं अगदी अस्सल खरंखुर, आणि निष्ठापूर्वक होत असे, असं माझं अजिबात म्हणणं नाही, त्यातही दोष असतीलच. किंबहुना, कुठलीचं व्यवस्था आदर्श नसते, तिच्यात थोडे बहुत दोष असतातच. पण, टिळकांच्या काळात जर कुणाकडून गणपतीच्या उत्सवासंदर्भात असे गैरप्रकार झाले, तर आपल्याला जाब विचारणारी जबाबदार माणसे आहेत, याची जाणीव लोकांमध्ये होती. कार्यकर्त्यांना टिळकांसारखे नि:स्पृह नेते लाभले होते, ज्यांचा धाक वाटावा. काही गैरप्रकार आढळले तर टिळक स्वतः त्यांच्या 'केसरी'तून अशावर टीका करत, लोकांची कानउघडणी करत. 'केसरी'च्या सिंहगर्जनेचा दरारा लोकांना आपल्या कर्तव्याची जरातरी जाणीव करून देत असे? आताशा अशी माध्यमे आपल्याकडे आहेत का? आपण नेमके देशासमोर काय मांडायचे आहे, याचे भान आजच्या माध्यमांना राहिले आहे काय? मग भरवसा ठेवावा कुणावर? टिळकांचा गणेशोत्सव राजकीय होता. पण, आता 'राजकारण' या शब्दाभोवतीचं सवंगतेचा दर्प जाणवतो. पूर्वीच्या काळी स्पृश्यास्पृश्यता यामुळे गणपतीला, त्या उत्सवाला कधी विटाळ झाला नाही. पण, राजकीय नेत्यांच्या आश्रयावर मंडळे गेल्यामुळे गणपती बराचसा विटाळला. आधी धार्मिक स्तरावर, नंतर सार्वजनिक पातळीवर सुरु असलेला गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला होता. त्यांनी या उत्सवाला 'राष्ट्रीय' बनवले होते. दुर्दैवाने आज आपण मात्र पुन्हा एकदा हा उत्सव 'राष्ट्रीय' पातळीवरून खाली आणत आणत 'सार्वजनिक' आणि 'धार्मिक' बाबींवर आणून सोडला आहे. देशासमोर हे असे ज्वलंत प्रश्न जागे असताना, त्याकडे संपूर्णपणे आणि जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून आम्ही मात्र पुन्हा एकदा नव्याने जमीन उकरून हा उत्सव कुणी सुरू केला? ह्याने की त्याने? यावरच वाद घालणार आहोत का? त्याला पुन्हा पूर्वीच्या उंचीवर नेण्यासाठी आपण प्रयत्न करावेत, असे आम्हाला स्वतःला वाटणार आहे की कुणीतरी पुढे येईल, पुढाकार घेईल, याचीचं अजूनही आम्ही वाट पाहणार आहोत?

 

(क्रमशः)

- पार्थ बावस्कर

@@AUTHORINFO_V1@@