उपेक्षितांच्या दुःखावर मायेची फुंकर घालणारे बाबूभाई परमार...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Dec-2019
Total Views |

Ulhasnagar _1  

 


उल्हासनगर : सरकारी नोकरी, संसार सांभाळून एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गरजू, निराधार, अपंग, विधवा, वृद्ध, विद्यार्थी यांना गेल्या पंधरा वर्षांपासून अविरतपणे मदत करणारे उल्हासनगरमधील बाबूभाई परमार. बाबूभाई यांनी पंधरा वर्षांपूर्वी 'बाबा रामदेव' नावाची सामाजिक संस्था उल्हासनगरमध्ये स्थापन केली होती. पूर्वी यात बाबूभाई एकटेच काम करायचे, मात्र आज या संस्थेत तीन हजार स्वयंसेवक कार्यरत आहेत.

 

बाबूभाई यांचा जन्म गरीब कुटुंबातला. अत्यंत हलाखीची परिस्थिती असल्याने शिक्षण कमी झाले. पोटापाण्यासाठी त्यांना उल्हासनगरातील शासकीय दवाखान्यात चतुर्थ श्रेणी पदावर नोकरी मिळाली. रुग्णालयात नोकरी करत असताना बर्याच वेळा डॉक्टर काही रुग्णांवर उपचार न करताच मुंबई किंवा ठाणे येथे पाठवायचे. या रुग्णांवर येथेच उपचार करावे, असा आग्रह बाबूभाई करत. यामुळे त्यांना वरिष्ठांच्या रोषाचा सामना करावा लागे. दवाखान्यात शहरातील व विविध परिसरातील वनवासी बांधव उपचारासाठी दवाखान्यात येत. त्यांची परिस्थिती व राहणीमान बघून आपण यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे, असा निश्चय बाबूभाई यांनी केला आणि यातूनच या सामाजिक कामाला सुरुवात झाली. आज पंधरा वर्षांपासून ते अविरत जनसेवा करत आहेत.

 

संस्थेच्या माध्यमातून शासकीय, निमशासकीय नोकरीविषयक मार्गदर्शन करणे, विद्यार्थी योजनेअंतर्गत गरीब विद्यार्थ्यांची शाळेची फी व शैक्षणिक साहित्य, आरोग्य व नेत्र शिबीर, रक्तदान व क्षयरोग जनजागृती मोहीम राबवली जाते. स्त्रीभ्रूण हत्या थांबावी, यासाठी या संस्थेमार्फत जनजागृती केली जाते. संस्थेमार्फत रोजगार निर्मितीसाठी सुमारे दोनशे हातगाड्यांचे वाटप करण्यात आले आहे, तर विधवा, परितक्त्या व निराधार महिलांना मोफत शिलाई मशीनचे वाटप केले आहे.

 

अपंगांना शासकीय सवलती मिळवून देणे तसेच रोजगार मार्गदर्शन करून तसेच आर्थिक मदत देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यास संस्था नेहमीच पुढाकार घेते. बाबूभाई यांचे कार्यालय गरजूंसाठी खुले असते. युवकांनी व्यवसाय करावा व स्वावलंबी असावे, असा त्यांचा आग्रह आहे. त्यासाठी युवकांनी लघु उद्योग करावे म्हणून युवकांना लघु उद्योगासाठी अर्थसाहाय्य देण्यात येते. "भविष्यात आपण एक संस्कारी, गुरू-शिष्य परंपरा जपणारे विद्यालय निर्माण करू, आदर्श नागरिक तयार करणारे ते विद्यालय असेल. आपण निराधारांसाठी आश्रम काढणार आहोत, तसेच महिला, पुरुष, वृद्ध, अपंग या सर्वांना हक्काचे ठिकाण देणार आहोत. तसेच एक अद्ययावत कॅन्सर रुग्णालयही येथे सुरू करणार असल्याचे त्यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना सांगितले.

 
 
@@AUTHORINFO_V1@@