तीक्ष्ण नजरेचा भारत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Dec-2019   
Total Views |




भारताने ‘कार्टोसेट-३’ (CARTOSAT) हा आपला उपग्रह अवकाशात सोडून आपले स्थान बळकट केले आहे. या उपग्रहामुळे आता भारत हा जगात सर्वात जास्त तीक्ष्ण नजर असणारा देश ठरला आहे. आतापर्यंत अमेरिकेच्या माध्यमातून सोडण्यात आलेला ‘वर्ल्ड व्ह्यू-३’ हा उपग्रह सर्वात तीक्ष्ण नजर असलेला उपग्रह म्हणून गणला जात होता.



आपल्या देशाचे सार्वभौमत्व अबाधित राखायचे असेल
, तर आजच्या काळात देशाने सजग राहणे नक्कीच आवश्यक आहे. राष्ट्राचे संरक्षण करत असताना अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, नीडर सैनिक, कुशल आणि कर्तबगार अधिकारी यांसारख्या बाबींची आवश्यकता असतेच. मात्र, या बरोबरीला आवश्यक असते, ती दुसर्‍या देशाची विशेषत: शत्रुराष्ट्राच्या हालचालींची माहिती प्राप्त होणार्‍या साधनांची. जगाच्या पाठीवर कोणताही देश हा दुसर्‍या देशाची माहिती जाणून घेण्यात कायमच आपला रस दाखवत असतो. त्यासाठी हेरगिरी तंत्राचा वापर केला जातो. असा वापर इतिहास काळापासून सुरूच आहे. या तंत्रात आजवर मानवी पद्धतीचा वापर होत असे. कालांतराने ड्रोन, रोबोटसारखी साधने ही वापरत येऊ लागली. मात्र, त्यास दृष्टीक्षमतेच्या मर्यादा असत. या सर्वच्या पुढे जात आता भारताने ‘कार्टोसेट-३’ (CARTOSET) हा आपला उपग्रह अवकाशात सोडून आपले स्थान बळकट केले आहे. या उपग्रहामुळे आता भारत हा जगात सर्वात जास्त तीक्ष्ण नजर असणारा देश ठरला आहे. आतापर्यंत अमेरिकेच्या माध्यमातून सोडण्यात आलेला ‘वर्ल्ड व्ह्यू-३’ हा उपग्रह सर्वात तीक्ष्ण नजर असलेला उपग्रह म्हणून गणला जात होता.



भारताच्या माध्यमातून अवकाशात सोडण्यात आलेल्या
‘कार्टोसेट-३’ हा उपग्रह जमिनीवरील २५ सेमीपर्यंतच्या वस्तूचे छायाचित्र घेऊ शकणार आहे. यापूर्वी अमेरिकेच्या माध्यमातून सोडण्यात आलेल्या ‘वर्ल्ड व्ह्यू -३’च्या माध्यमातून ३१ सेमीपर्यंतच्या वस्तूंचे छायाचित्र घेतले जात होते. भारतामार्फत सोडण्यात आलेल्या ‘कार्टोसेट-३’ या उपग्रहाच्या माध्यमातून रस्त्यावर धावणार्‍या गाडीचा क्रमांक, हातातील मोबाईल, शस्त्र हे अगदी स्पष्टपणे आणि सहज पहाणे शक्य होणार आहे. यामुळे भारतासारख्या खंडप्राय देशात आणि लोकसंख्येचे प्रमाण जास्त असणार्‍या देशात हा ‘कार्टोसेट-३’ उपग्रह निश्चितच फलदायी ठरणारा आहे. भारतात यापूर्वी ‘२६/११’ सारख्या घटना घडल्या आहेत.




दुर्दैवाने आता पुन्हा असे काही घडले तर या उपग्रहाच्या माध्यमातून अचूक माहिती संकलित करणे आपल्या संरक्षण विभागास आता सहज शक्य होणार आहे
. तसेच, भारतीय सैन्यासदेखील या उपग्रहाचा मोठा फायदा होणार आहे. यामुळे सीमेपलीकडील अतिशय सूक्ष्म अशा सर्वच घटनांची छायाचित्रे उपलब्ध होण्यास नक्कीच मदत होईल. चीन आणि पाकिस्तानसारखे उपद्रवी शेजारी असताना न केवळ सीमेवर, तर सीमेपलीकडेदेखील आपली नजर ठेवणे भारतासाठी आवश्यक आहेच. त्यामुळे आंतराष्ट्रीय नियमावलीचे उल्लंघन न करता आपल्याच सीमेत राहून भारताला आता उपद्रवी शेजार्यांवर लक्ष ठेवणे सहज शक्य होईल. याशिवाय या उपग्रहाच्या माध्यमातून पृथ्वीवर होणारे नैसर्गिक आणि मानवी बदलदेखील टिपता येणे सहज शक्य आहे. त्यामुळे भारतास नद्यांच्या प्रवाहाच्या बदलणार्‍या दिशा, विविध भौगोलिक व भूअंतर्गत घटनांमुळे नवीन भूरूपे उदयास येणे किंवा जे आहेत त्यांच्यात काही बदल घडत असेल तर तो टिपता येणे सहज शक्य होणार आहे. त्याचबरोबर भूकंप, बांधकाम कोसळणे, इतर मोठी दुर्घटना घडल्यास त्याबाबत माहिती संकलित करून तेथे मदत पोहोचविणे आदी कार्य करण्यात ‘कार्टोसेट-३’ मुळे आगामी काळात भारतास निश्चितच सुलभता प्राप्त होण्याची दाट शक्यता आहे.




भारत हा कृषिप्रधान देश आहे
. तसेच, मान्सूनवर अवलंबून असणारी शेती आणि लहरी हवमान यामुळे भारतात जलसंधारण हा महत्त्वाचा घटक ठरत असतो. त्यामुळे या जलसंधारण आणि वितरणाचे व्यवस्थापन करणे ‘कार्टोसेट-३’ मुळे आगामी काळात सहज शक्य होणार आहे. विविधतेने नटलेला भारत अवकाश तंत्रज्ञान आणि संशोधन यात घेत असलेली भरारी ही निश्चितच कौतुकास्पद अशीच आहे. ‘कार्टोसेट-३’ च्या रूपाने भारताने महासत्तेच्या पुढे एक पाऊल टाकत आपली क्षमता सिद्ध केली आहे. तसेच, केवळ सीमा बळकट करण्यावर भर न देता आपली प्रगती आणि त्याचवेळी शेजारील राष्ट्रांवर वचक निर्माण करण्याचे महत्त्वाचे कार्य ‘कार्टोसेट-३’ च्या रूपाने भारताने केले आहे. यामुळे संरक्षणदृष्ट्या आता भारत स्वयंसिद्ध होत असल्याचेच हे द्योतक आहे. असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

@@AUTHORINFO_V1@@