आव्हानांना आवतण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Nov-2019
Total Views |




आपण आयुष्यातील आव्हानांकडे पाहताना अनेक गोष्टी घडत असतात. कितीतरी मर्यादांची जाणीव आपल्याला होत असते. कितीतरी अशा गोष्टी जगात आहेत की, ज्या खरेतर आपली ताकद असतात. पण, तरीही त्याचा अनुभव आपल्याला आव्हानात्मक परिस्थितीतच येतो. आपण रोजच्या जीवनात एक गोष्ट शास्त्रीयदृष्ट्या पाहिली आहे.

 

ती म्हणजे स्नायू सक्षम करताना स्नायूंना जेवढे आकुंचित करता येते, म्हणजे त्यांचा जेवढा विरोध करता येतो, तितके ते मजबूत होतात. सामर्थ्यवान होतात. स्नायूंना मजबूत बनविण्याची ही प्रक्रिया माणसाला जाणीवपूर्वक करावी लागते. तुम्ही जितकी जास्त मेहनत घ्याल, तितके जास्त स्नायू मजबूत होणार! म्हणजे स्नायूंना बलवान बनविण्यासाठी त्यांना सातत्याने वाढत्या प्रतिकाराला सामोरे जाणे गरजेचे आहे. ज्याक्षणी तुम्ही प्रतिकार कमी कराल, त्याक्षणी ते स्नायू पुन्हा अवनत होणार, दुर्बल होणार!

 

आपल्या आयुष्यातसुद्धा हे तत्त्व काम करते म्हणूनच आपल्याला अनेक आव्हानांची गरज आहे. हे आव्हान नुसते शारीरिक नाही, तर खर्‍या अर्थाने ते बौद्धिक, मानसिक व सामाजिक असायला लागते. आयुष्यातील आव्हानात्मक प्रसंग हे खरे तर खूप आकर्षक असतात, रोमँटिक असतात, पण 'आव्हानांचा रोमँटिसिझम' कसा समजायचा हे कळले तरच... आव्हान जितके मजबूत तितके ते आपल्याकडून आपली पूर्ण ऊर्जा एकवटायला सुरुवात करते. त्या आव्हानांची झेप जितकी जबरदस्त तितकी त्यात भावूकतेने भरलेल्या मनाची गुंफण जास्त.

 

अशा आव्हानांसाठी झटण्यात एक जबरदस्त अतूट आकर्षण असते. काहीही झाले, कितीही अवघड प्रसंग आले, तरी प्रयत्नांची पराकाष्ठा करून अशा आव्हानांची आग पेटती ठेवण्यात एक 'रोमँटिक प्रेरणा' दिसून येते. जे काही तुमच्या मनात आहे, जे तुम्हाला म्हणायचे आहे वा करायचे आहे ते या आव्हानाला वास्तवात आणण्यासाठी असते. 'जब प्यार किया तो डरना क्या' अशा प्रकारची निर्भीड वृत्ती आव्हाने पेलताना अंगी बाणत जाते.

 

ज्या क्षणी आपण 'आव्हान' ही संकल्पना डोळ्यासमोर आणतो त्याक्षणी आपल्या आत्मविश्वासाची साथ आपल्याला लाभलेली असते. आत्मविश्वासाचा अभाव असलेल्या व्यक्तीला 'आव्हान' हा शब्द कशासी खातात हेसुद्धा कळत नाही. ज्या ज्या लोकांनी अचाट कर्तृत्व आत्मसात केले आहे, त्यांच्या जीवनात आत्मविश्वासाची महती अमूल्य आहे. शिवाय आव्हानात्मक स्थिती जेव्हा आयुष्यात प्रवेश करते, तेव्हा आपल्या मनाचे स्थित्यंतर घडते आणि जगाकडे पाहाण्याचा आपला दृष्टिकोन फैलावतो. आपल्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट बदलायला लागते.

 

आव्हान खरेतर अचानक मानसिक अपघात घडविते, भीती घालते, असुरक्षितता निर्माण करते, अनेक प्रश्न निर्माण करते. पण, या सर्व अवघड स्थितीतसुद्धा आव्हान आपल्याला सुखासीन जगण्यातून वा 'कर्म्फट झोन'मधून बाहेर काढून आपल्याला उत्तम ऊर्जा मोकळी करते. ही निद्रित ऊर्जा आता आव्हानांसमोर जागृत होत आपल्याला आपल्या सुप्तशक्तीचा एक पुरावाच जणू देते. हा पुरावा आपल्या मनात एक भक्कम संदेश देतो.

 

तो म्हणजे, तुमच्या मनात जे काही आहे ते तुम्ही वास्तवात आणू शकता. अर्थात, आव्हानांना ऐहिक मर्यादा केव्हा येते, तर जेव्हा आपण त्यांचे अस्तित्व नाकारतो तेव्हा. पण, आव्हान स्वीकारून ते झेलायचे वा पेलायचे ठरविले, तरच आपल्याला आकाशाला गवसणी घालता येईल. आव्हानांना पेलताना एक आंतरिक स्वातंत्र्य व्यक्तीला मिळते. खरे तर आंतरिक स्वातंत्र्याला सामर्थ्य देण्याचे काम आव्हाने करतात. म्हणून तर कसलीही मर्यादा नसलेली स्वप्ने पाहणे व अमर्यादा कल्पना करणे हे पृथ्वीवरच्या पामरांना शक्य आहे.


- डॉ. शुभांगी पारकर 

@@AUTHORINFO_V1@@