आपत्ती व्यवस्थापन व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप बनला संकटकालीन देवदूत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Nov-2019
Total Views |



शहापूर (प्रशांत गडगे) : कसाऱ्यातील सर्वसामान्य कुटुंबातील व वयाची पस्तिशी पार केलेले शाम धुमाळ हे अतिशय वेगळे रसायन आहे. वयाच्या दहाव्या वर्षापासूनच फुलविक्री, वृत्तपत्रविक्री, फ्लॉवर्स डेकोरेशनचा व्यवसाय करताना व त्यानंतर गेल्या १५ वर्षांपासून कसाऱ्यासारख्या अतिसंवेदनशील भागात दर्जेदारवृत्तपत्रात पत्रकारिता करताना त्यांच्या अंगात आणि डोक्यात आपत्कालीन स्थितीत मदतीचे भूत स्वार झाले ते अजूनही उतरलेले नाही.

 

मुंबई-नाशिक द्रुतगती महामार्गासह नाशिक ते पडघा यादरम्यान कोणत्याही प्रकारचा अपघात असो दरडी कोसळलेल्या असो, रेल्वे अपघाताची घटना असो त्याचप्रमाणे कसाऱ्यासह गाव-पाड्यात शहापूर तालुक्यातील कोणत्याही कंपनीत, कोणत्याही गावात व कानाकोपऱ्यात अपघात किंवा दुर्घटना घडली की, मदतीसाठी पोहोचणारा पहिला माणूस शाम धुमाळ व त्यांची टीम असणार हे आता पक्के झाले आहे.

 

सुरुवातीला शाम धुमाळ हे काम एकटेच करायचे. मात्र, त्यांचा आदर्श घेत टप्प्याटप्प्याने या मोहिमेत अनेक तरुण सामील झाले. तीन वर्षांपासून या मोहिमेला चळवळीचे स्वरूप मिळाले. त्यासाठी शाम धुमाळ यांनी 'आपत्ती व्यवस्थापन टीम शहापूर' असा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केला व समाजसेवा तीही जीव धोक्यात घालून करण्याची हिंमत व मानसिकता ज्यांची आहे, असे जवळपास २५० हून अधिक सक्रिय सदस्य या ग्रुपच्या माध्यमातून मोहिमेत जोडले गेले आहेत.

 

ग्रुपमध्ये पोहण्यात तरबेज असणारे, सर्प पकडणारे सर्पमित्र, खोल पाण्यात जाऊन शोध घेणारे स्कुबाडायव्हर, अवघड डोंगरावर ट्रेकिंग करणारे तरुण, कोणतेही वाहन चालविणारे वाहनचालक, प्रथमोपचार करणारे प्रशिक्षित फर्स्टएडर्स, परिचारक, पोलीस यंत्रणा प्रतिनिधी, महसूल यंत्रणा प्रतिनिधी असे विविध क्षेत्रातील तरबेज तरुण कार्यरत आहेत. या ग्रुपचे एकच ध्येय आहे-कोणत्याही वेळी कोणत्याही ठिकाणी तुम्ही आहात, तेथे आपत्तीग्रस्तांच्या मदतीला धावून जायचे.

 

दरम्यान, ग्रुपच्या माध्यमातून आजपर्यंत ७० पेक्षा अधिक अपघातग्रस्तांना जीवदान दिले असून शेकडो जणांना रुग्णालयात नेऊन उपचार केले आहेत. तसेच या पावसाळ्यात वासिंद येथे भातसा नदीला आलेल्या पुरात अडकलेल्या ३५ नागरिकांची सुटका करण्यात या व्हॉट्सअॅप ग्रुपचा मोठा सहभाग होता. तसेच सांगली-कोल्हापूर येथील पूरस्थितीत सहकार्य करण्यासाठी टीमचे योगदान मोठे आहे.

@@AUTHORINFO_V1@@