सिंधुदुर्गात दुर्मीळ 'मायरिस्टिका स्वॅम्प'चे वन विभागाकडून संवर्धन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Oct-2019   
Total Views |

 

 
 
वन विभाग 'कम्युनिटी रिझर्व्ह'चा दर्जा देणार
 

मुंबई ( अक्षय मांडवकर) - भारतात केवळ तीन राज्यांमध्ये अस्तिवात असणारी 'मायरिस्टिका स्वॅम्प'' ही गोड्या पाण्यातील दलदलीच्या जंगलाची परिसंस्था सिंधदुर्ग जिल्ह्यातील हेवाळे गावात आढळून आली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ग्रामस्थांनी या परिसंस्थेला देवराईचे संरक्षण दिल्याने तिचे संवर्धन झाले. आता वन विभागाकडून या परिसंस्थेच्या परिसराला 'कम्युनिटी रिझर्व्ह'चा दर्जा देऊन कायदेशीर मान्यता देण्यात येणार आहे. भारतात मोजक्याच ठिकाणी ही परिसंस्था तग धरून राहिल्याने तिचे संर्वधन होणे आवश्यक आहे.

 

 


 
सिंधुदुर्गमधील दोडामार्ग तालुक्यात हेवाळे गावात 'मायरिस्टिका स्वॅम्प' ही जंगलाची दुर्मीळ अशी परिसंस्था आढळून आली आहे. उष्णकटिबंधीय क्षेत्रात गोड्या पाण्याच्या दलदलीच्या परिसरात 'मायरिस्टिका' प्रजातीच्या वृक्षांचे जंगल आढळते. पृथ्वीवरील सर्वात प्राचीन फुलझाडांमध्ये या वनस्पतीचा समावेश होतो. जायफळाच्या जातीमध्ये 'मायरिस्टिका' वृक्षांचा समावेश होत असून त्यांना 'आययूसीएन' या आंतरराष्ट्रीय संस्थेने जगातील 'धोकाग्रस्त' वृक्षांच्या यादीत स्थान दिले आहे. कांदळवनांसारखीच या वृक्षांची मुळे खोडापासून जमिनीच्या दिशेने विस्तारलेली असतात. सदाहरित असणाऱ्या या वृक्षांची घनदाट मुळे ओल्या गाळयुक्त काळ्या मातीत उभे राहण्याकरिता मदत करतात. हेवाळे गावात 'मायरिस्टिका स्वॅम्प'' जंगलाची परिसंस्था दोन एकरावर पसरली आहे. त्यामध्ये 'मायरिस्टिका'च्या तीन प्रजातींचे वृक्ष आढळून आली आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून येथील ग्रामस्थांनी या परिसंस्थेला देवराईचे संरक्षण दिले आहे. स्थानिक भाषेत तिला 'कानळाची राई' असे संबोधण्यात येते. 
 


( कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक डाॅ. क्लेमेंट बेन आणि सिंधुदुर्गचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी हेवाळे गावाला भटे देऊन 'मायरिस्टिका स्वॅम्प''ची पाहणी केली ) 

 
 
 
'मायरिस्टिका स्वॅम्प''ची ही परिसंस्था भारतात केवळ कनार्टकातील उत्तर कन्नडा जिल्ह्यात, केरळमधील दक्षिणेकडील भागात आणि गोव्यामध्ये काही ठिकाणी आढळून येते. त्यामुळे महाराष्ट्रात ही परिसंस्था आढळून येणे महत्त्वाचे असून तिचे संवर्धन करणे आवश्यक आहे. गेल्या आठवड्यात कोल्हापूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक डाॅ. क्लेमेंट बेन यांनी हेवाळे गावाला भेट देऊन या परिसंस्थेची पाहणी केली. वन विभागाकडून तयार करण्यात आलेल्या हेवाळे ग्रामस्थांच्या 'जाॅईन्ट फाॅरेस्ट मॅनेजमेंट कमिटी'च्या माध्यमातून मायरिस्टिका स्वाॅमचे संरक्षण आणि संवर्धन करण्यात येत असल्याची माहिती सिंधुदुर्गचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी दिली. वन विभागाकडून या परिसंस्थेला 'कम्यनिटी रिझर्व्ह'चा दर्जा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. 'कम्युनिटी रिझर्व्ह'मधील जागा ही खासगी किंवा एखाद्या समूहाच्या मालकीची असते. त्यावर लोकांचा एक गट संवर्धनाचे काम करत असतो, ज्याला शासनाकडून कायदेशीर मान्यता देण्यात येेते.
 

हेवाळे गावात आढळलेली 'मायरिस्टिका स्वॅम्प'ची परिसंस्था भारतात केवळ दोन ठिकाणीच आढळून येते. त्यामुळे तिचे संवर्धन होणे गरजेच आहे. यासाठी वन विभागाकडून हा परिसर 'कम्युनिटी रिझर्व्ह' म्हणून घोषित करण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. जेणेकरून या परिसराचे सर्वांगीण संवर्धन होईल. - डाॅ. क्लेमेंट बेन, मुख्य वनसंरक्षक, कोल्हापूर

@@AUTHORINFO_V1@@