‘राफेल’वरून शेजार्‍यांचा पोटशूळ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Oct-2019   
Total Views |



राफेल खरेदीसाठी पैसे भारताने मोजले
, व्यवहाराची व्यूहरचना भारताने केली, अंतर्गत विरोधाचा सामनादेखील केला. असे सर्व असताना मात्र पोटशूळ भारताची शेजारी राष्ट्रे चीन आणि पाकिस्तानमध्ये उठलेला दिसतो. मुळात भारत हा संरक्षणसिद्ध होत आहे, आधुनिक होत आहे.


राष्ट्राची संरक्षण सिद्धता राखणे
, त्या दिशेने कार्य करणे, उपाययोजना करणे, आंतरराष्ट्रीय स्तरावर करार करणे हे जगाच्या पाठीवरील प्रत्येक राष्ट्राचे आद्य कर्तव्यच. भारतानेदेखील राफेल खरेदीच्या रूपाने आपले हे कर्तव्य पार पाडले. राफेल खरेदीसाठी पैसे भारताने मोजले, व्यवहाराची व्यूहरचना भारताने केली, अंतर्गत विरोधाचा सामनादेखील केला. असे सर्व असताना मात्र पोटशूळ भारताची शेजारी राष्ट्रे चीन आणि पाकिस्तानमध्ये उठलेला दिसतो. मुळात भारत हा संरक्षणसिद्ध होत आहे, आधुनिक होत आहे. हेच यामागील कारण असल्याचे दिसून येते. राफेल विमान भारताने खरेदी करू नये किंवा ते भारताला मिळू नये यासाठी या शेजारी राष्ट्रांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती.



यामागे कारणदेखील तसेच आहे
. भारत आजवर ‘सुखोई’ च्या मदतीने आपल्या सीमांचे रक्षण करत होता आणि कालपरत्वे ‘सुखोई’च्या मर्यादादेखील भारताला जाणवू लागल्या होत्या. याउलट त्यावेळी पाकिस्तानकडे ‘एफ-१६’ तर चीनकडे ‘जे-२०’ सारखी अत्याधुनिक विमाने होती. त्यामुळे भारताला वेळप्रसंगी कोंडीत पकडण्याची संपूर्ण तयारी या राष्ट्रांची होती. शेजारी असणार्‍या दोन शत्रू राष्ट्रांच्या या मनसुब्याला सुरूंग लावण्यासाठी भारतालादेखील त्यांच्या तोडीचे किंवा त्यांच्यापेक्षा जास्त सक्षम असे युद्धविमान बाळगणे आवश्यक होतेच. ते राफेल या रूपाने प्राप्त झाल्याने शेजारी राष्ट्रांना आता धडकी भरली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.




पाकिस्तानकडे असणारे
‘एफ-१६’ लढाऊ विमान व चीनकडे असणारे ‘जे-२०’ सारखे अत्याधुनिक विमान यांची आपण तांत्रिकदृष्ट्या तुलना केली तर, आपल्या सहज लक्षात येते की, एक राफेल विमान बरोबर दोन ‘एफ-१६’ विमानांची ताकद आहे. तसेच, राफेल विमान लांबी, आकार, वजन, शस्त्रास्त्रे वाहून नेण्याची क्षमता याबाबत ‘एफ-१६’ पेक्षा जास्त सरस आहे. त्यामुळे राफेलच्या समावेशाने भारत हवाई सुरक्षा आणि भारताच्या हवाई दलाचे झालेले सशक्तीकरण याची जाणीव पाक आणि चीनला झाली आहे. ‘मिग’ आणि ‘सुखोई’ नंतर आपण विमान खरेदी केलेली नाही. त्यामुळे बदलत्या काळानुसार आवश्यक असणारे अत्याधुनिक असे विमान भारताच्या ताफ्यात नव्हते. आधुनिक काळात युद्धात हवाई दल हे आपली महत्त्वाची भूमिका बजावत असते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे बालाकोट हवाई लक्ष्यभेदी कारवाई. आपण हे जाणल्याने राफेलचे वेगळे महत्त्व भारतासाठी असण्याबरोबरच जागतिक राजकारण्याच्या परिप्रेक्ष्यातदेखील या खरेदीचे वेगळे स्थान आहे.



हवाई दलाच्या अतुलनीय कामगिरीमुळेच भारत
-पाकच्या १९७१ च्या युद्धात बांगलादेशची निर्मिती झाली. तसेच, कारगिल संघर्षावेळीदेखील हवाई दलाने आपले अतुलनीय शौर्य दाखविल्याने पाकच्या ताब्यात असणारी शिखरे पुन्हा प्राप्त करण्यात भारताला यश आले. हा पूर्वेतिहास लक्षात घेता, राफेल नसताना भारत जे कार्य करू शकतो, त्यापेक्षा अधिक उत्तम कार्य आता राफेल असताना संघर्षावेळी भारत करू शकेल, याची जाणीव पाकिस्तानला झाली असणार. त्यामुळे राफेल खरेदीनंतर पोटशूळ उठणे स्वाभाविक आहे.



पाकच्या खांद्यावर आपली बंदूक ठेऊन आपला कार्यभाग साधणार्‍या चीनसाठी देखील राफेल हे धोकदायक आहेच
. कारण चीनच्या अत्याधुनिक विमानापेक्षा राफेल हे अधिक सक्षम आहे. या विमानावर ‘स्काल्प’ नावाचे क्षेपणास्त्र बसवलेले आहे. त्याची मारक कक्षा ३०० किलोमीटर आहे. त्यामुळे यापुढे दोन्ही शेजारी राष्ट्रांनी काही आगळीक केल्यास भारत आपल्या सीमेतूनच चोख प्रतिउत्तर देऊ शकेल. त्यामुळे बालाकोटवेळी भारताला जशी सीमा ओलांडून कारवाई करावी लागली, तशी गरज भविष्यात भासणार नाही, याची जाणीव एव्हाना पाकिस्तानला झाली असल्याने पाकपुरस्कृत दहशतवादी कारखान्यांना आता पळता भुई थोडी झाली आहे. तसेच, राफेलमध्ये हवेतून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्र असल्याने भारताची मारकक्षमतादेखील वधारली आहे. राफेल अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता बाळगणारे लढाऊ विमान असल्याने पाकिस्तानच्या भीतीत त्यामुळे अजूनच भर पडली आहे. अशा सर्वच कारणांमुळे भारताची राफेल खरेदी ही पाक व चीनसाठी पोटशूळ उठवणारी ठरली आहे.

@@AUTHORINFO_V1@@