शेवटचा प्रयास...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Apr-2018   
Total Views |
 

आजवरचा संघर्ष आणि हा संघर्ष यामध्ये एक मूलभूत फरक आहे, हे हिंदुत्ववादी शक्तींनी लक्षात घेणे आवश्यक आहे. कठुआच्या घटनेनंतर तेथील आंदोलकांनी स्वतःच्या हाताने प्रचाराचे कोलीत अशा लोकांच्या हाती दिले. वास्तविक पाहता, या घटनेला कोण जबाबदार आहे, याचा निर्णय आंदोलनातूनही होणार नाही वा प्रसारमाध्यमांतूनही होणार नाही. तो निर्णय न्यायालयातच होईलच...
 
गेले काही दिवस कठुआ येथील बलात्काराच्या प्रसंगानंतर ‘डाव्या लिबरल’ समजल्या जाणार्‍या लेखनिक आणि प्रसारमाध्यमांचा गदारोळ सुरू झाला आहे आणि हिंदुत्ववादाबद्दल राळ उठवली जात आहे. कठुआ येथील एका बालिकेच्या हत्येची आणि तिच्यावर झालेल्या बलात्काराची कथा मन सुन्न करून टाकणारी आहे. या घटनेला जे कारणीभूत असतील त्यांना लवकरात लवकर आणि अधिकाधिक कठोर शासन झाले पाहिजे. परंतु, ही प्रक्रिया घडत असताना त्या आधारे प्रचाराचे जे रान उठविले जात आहे आणि जणू काही अशा घटना या हिंदू समाजाच्या नेहमीच्या व्यवहाराचा भाग आहेत, असे चित्र निर्माण केले जात आहे. त्यामागची कारणमीमांसा तपासून घेण्याची गरज आहे. वास्तविकरित्या, कायद्याच्या दृष्टीने बलात्कारित पीडितेचे नाव आणि फोटो देण्यास बंदी आहे. परंतु, त्या नावाचा आणि चेहर्‍याचा उपयोग करून जी प्रचाराची मोहीम चालवली जात आहे, ती अत्यंत तिरस्करणीय आहे. असे असेल तर आजवर झालेल्या बलात्कारित स्त्रियांचा धर्म कोणता होता आणि बलात्कार करणार्‍यांचा धर्म कोणता होता, याची यादी घेऊन हिशोब मांडावा लागेल. हिंदू धर्मसंकल्पनांमध्ये आणि मुस्लीम धर्मसंकल्पनेतील दोन मूलभूत फरक लक्षात घेतले पाहिजे. बलात्कार आदी गोष्टी हिंदू धर्मसंकल्पनेच्या कधीही भाग नव्हत्या. परंतु, इस्लामी धार्मिक संकल्पनांमध्ये इस्लामेतर लोकांना जगण्याचा अधिकार नाही. त्यामुळे अशा काफर लोकांवर केलेले कोणतेही अत्याचार हे अत्याचार ठरत नाहीत. आज मध्य पूर्वेतील देशांत मुस्लीम यादवीने जे थैमान मांडले आहे, त्यात मानवी हत्याकांड आणि बलात्कारासारख्या घटना या नेहमीच्या बाबी बनल्या आहेत आणि त्या बाबी जिहादचा एक भाग म्हणून केल्या जात आहेत. अजूनही शरीयतनुसार महिलांना दगडाने ठेचून मारण्याचे प्रकार काही मुस्लीम देशांत घडत आहेत आणि त्याला धार्मिक समर्थन आहे. यातील दुसरा भाग असा की, जातीभेद, समाजातील उच्च-नीच भाव हा हिंदू धर्म परंपरेचा एक भाग इतिहासात होता. परंतु, त्यात परिवर्तन घडवून आणण्याचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून अशा चालीरितींना विरोध करणारा मोठा वर्ग हिंदू समाजात निर्माण झाला आहे. परंतु तलाक, बहुपत्नीत्व अशासारख्या स्त्रियांना अन्यायकारक असणार्‍या परंपरामध्ये बदल घडवून आणण्याचा जेव्हा प्रयत्न केला जातो, तेव्हा धर्माच्या आधारावर त्याला विरोध केला जातो. त्यावरून मुस्लीम मानसिकतेवर अजूनही कट्टर धार्मिकतेचा किती प्रभाव आहे, हे लक्षात येते. परंतु, हा समाज उदारमतवादी लोकशाहीमध्ये मुख्य प्रवाहात सामील व्हावा, यादृष्टीने स्वतःला ‘लिबरल’ समजणारे हे घटक कोणताही प्रयत्न करीत नाहीत; उलट जे असे करण्याचा प्रयत्न करतील, त्यांना हिंदू जातीय वादाच्या गटात टाकून मोकळे होतात.
 
कठुआ येथे झालेला जो घटनाक्रम प्रसिद्ध झाला आहे, त्यानुसार स्थानिक पोलीस अधिकार्‍यांनी याची चौकशी दाबण्याचा प्रयत्न केल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी याची चौकशी करीत असताना या घटनेशी संबंध नसणार्‍या अनेक तरुणांना कैद करण्यात आले आणि त्या भागात पोलिसी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. त्याचा परिणाम म्हणून ही चौकशी सीबीआयमार्फत करावी, अशी मागणी सुरू झाली आणि त्याचा परिणाम निदर्शनांत आणि तेथील वकिलांच्या आंदोलनात झाला. या दोन्ही घटनांमुळे या घटनेला वेगळी दिशा देण्याचा स्वतःला ‘डावे लिबरल’ म्हणणार्‍या घटकांनी प्रयत्न सुरू केला. पोलिसांच्या दहशतवादाविरुद्ध आणि चौकशी सीबीआयकडे सोपवावी, या मागणीसाठी झालेले आंदोलन बलात्काराच्या व खुनातील आरोपीच्या समर्थनासाठी आहे, असे चित्र निर्माण केले गेले आणि जणूकाही देशभरातील वाढत्या हिंदुत्वाच्या प्रभावामुळेच हे घडत आहे, असा प्रचार-प्रसार माध्यमांतून देशात आणि विदेशात केला गेला. हे करीत असताना सामान्य सभ्यता आणि सुसंस्कृततेच्या मर्यादाही ओलांडल्या गेल्या. त्याची तीव्र प्रतिक्रिया हिंदू समाजमनात खदखदत आहे. दुसर्‍या बाजूला पाकिस्तान व काश्मीरमधील फुटीरतावादी शक्ती याचा फायदा घेऊन काश्मीरमधील वातावरण अधिक कसे बिघडविता येईल, याचा प्रयत्न करीत आहेत.
 
चाललेले हे सर्व प्रकार हे हिंदुत्ववादी शक्तींना बदनाम करण्यासाठी आजवर चाललेल्या प्रयत्नांचा एक भाग आहेत. १९४८ साली महात्मा गांधींची हत्या झाली. या हत्येमध्ये अनेक घटक काम करीत होते, हे आता नवनव्या संशोधनांवरून स्पष्ट होत आहे. परंतु, या हत्येशी सुतरामसंबंध नसतानाही संघावर बंदी आणण्यात आली. यावेळचा प्रचार एवढा जबरदस्त होता की, राजसत्तेबरोबर सामाजिक वातावरणही संघाच्या विरोधात गेले होते. परंतु, त्यातूनही संघ बाहेर पडला आणि विस्तारू लागला. १९७३ पासून इंदिरा गांधींच्या विरोधात वातावरण तापायला सुरुवात झाली आणि त्यातून जयप्रकाश नारायण यांच्या ’संपूर्ण क्रांती’ आंदोलनाला सुरुवात झाली. हे आंदोलन निपटता न आल्याने इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली आणि त्यानंतर संघावर बंदी आणली. त्यावेळी राजसत्ता संघाच्या विरोधात असली तरी सर्व विरोधी पक्ष आणीबाणीच्या विरोधात संघाबरोबर होते आणि नंतर त्यांना लोकांनीही साथ दिली. या सर्व संघर्षात संघाची प्रतिमा अधिक उजळून निघाली आणि संघाचा प्रभाव पुढच्या काळात अधिक वाढला. बाबरी ढांचा उद्ध्वस्त झाल्यानंतर संघावर आणखी एकदा बंदी आली. ही बंदी न्यायालयानेच उठवली आणि या प्रसंगी हिंदू समाज संघाच्या पाठीशी उभा राहिला आणि पुढे काही वर्षांतच राजकीय परिवर्तन घडले. त्यानंतरच्या दोन शतकांत जे सामाजिक आणि राजकीय परिवर्तन होत आहे, त्यामुळे हिंदुत्वविरोधी शक्ती अस्वस्थ झाल्या आहेत. मधल्या दहा वर्षांच्या संपुआ सरकारच्या काळात ’भगवा दहशतवाद’ या नावाने हिंदुत्ववादी शक्तींना बदनाम करण्याचे प्रयत्न झाले. परंतु, त्यांना त्यात यश आले नाही. याचे कारण ‘जिहाद’च्या नावाने केलेले युद्ध किंवा हिंसाचार हा मुस्लीमधर्माचाच भाग आहे, असे मानणारा प्रभावी मुस्लीम गट आजही मुस्लीम धर्मात आहे. परंतु, युद्ध किंवा हिंसाचार यांना धर्मप्रसाराचा एक भाग म्हणून हिंदू संस्कृतीने इतिहासात किंवा वर्तमानात कधीही मान्यता दिलेली नाही. काही अपवादात्मक शक्ती अतिरेकी भाषा बोलत असतात. तरी त्याला व्यापक जनसमर्थन कधीही मिळालेले नाही. हिंदुत्त्ववादी शक्तींच्या वाढत्या प्रभावाचा परिणामम्हणून मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर आपली सद्दी संपणार हे लक्षात आल्याने या सर्व शक्ती हिंदुत्ववादाला पराभूत करण्यासाठी सर्व प्रकारच्या मार्गांचा उपयोग करून आपली शक्ती एकवटत आहेत. वैचारिक युद्धापासून हिंसक आंदोलन करण्यापर्यंत सर्व प्रकारच्या माध्यमांचा ते उपयोग करीत आहेत.
 
 
 
 
 
- दिलीप करंबेळकर

 
 
@@AUTHORINFO_V1@@