शिंदखेडा तालुक्यातील सिंचन क्षेत्र विस्तारणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Mar-2018
Total Views |

 
रोहयो मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला विश्‍वास
धमाणे येथे विंध्यासिनी उपसा सिंचन योजनेचे भूमिपूजन

 

शिंदखेडा :
तापी नदीवरील उपसा सिंचन योजना, सुलवाडे-जामफळ योजना, तापी-बुराई तसेच बुराई नदी बारमाही योजनेमुळे आगामी काळात शिंदखेडा तालुक्यातील मोठे क्षेत्र सिंचनाखाली येवून ते बागायत होऊन सुजलाम् सुफलाम् होईल, असा विश्‍वास राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला.
 
 
तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगावअंतर्गत शिंदखेडा तालुक्यातील धमाणे येथे ४ कोटी २२ लाख रुपये खर्चातून होणार्‍या विंध्यासिनी उपसा सिंचन योजनेचे भूमिपूजन मंत्री रावल यांच्या हस्ते झाले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य कामराज निकम, दोंडाईचा बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, शहादा येथील सातपुडा साखर कारखान्याचे अध्यक्ष दीपक पाटील, विंध्यासिनी उपसा सिंचन योजनेचे चेअरमन जिजाबराव सोनवणे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र जोशी, जिजाबराव पाटील, प्रशांत पाटील, भूपेंद्र निकम, प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.
 
 
मंत्री रावल म्हणाले, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील २२ उपसा सिंचन योजनांसाठी निधी मिळावा म्हणून १५ वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. या योजनांसाठी राज्य शासनाने ४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या योजनांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आगामी चार महिन्यांत काम पूर्ण होऊन सुमारे १५ हजार हेक्टर जमीन सिंचनखाली येईल, असे त्यांनी सांगितले.
 
 
बाजार समितीचे सभापती नारायण पाटील यांनी सांगितले की, तापी नदीवरील बॅरेजेसमुळे तापी नदी पात्रात पाणी उपलब्ध होते. त्यामुळे उपसा सिंचन योजनांसाठी मंत्री रावल यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता. आता प्रतीक्षा संपुष्टात आली असून लवकरच पाणी शेत शिवारापर्यंत पोहोचणार आहे. सातपुडा साखर कारखान्याचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले, तापी नदीतील पाणी गरीब शेतकर्‍याच्या शेतापर्यंत उपसा सिंचन योजनांच्या माध्यमातून पोहोचणार आहे. त्यामुळे या भागातील सिंचनाखाली क्षेत्र वाढेल. प्रा. शशिकांत बोरसे, जिजाबराव पाटील, जिजाबराव सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी उपसा सिंचन योजनेचे महत्त्व सांगितले. कार्यकारी अभियंता जोशी यांनी प्रास्ताविक केले. निकम यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी परिसरातील ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.
 

बुराई नदीवर १४ ठिकाणी बंधारे - शिंदखेडा तालुक्यातून वाहणारी बुराई नदी बारमाही करण्यासाठी ठिकठिकाणी २४ बंधारे बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे आगामी काळात शिंदखेडा तालुका सुजलाम् सुफलाम् होईल. तसेच शेत शिवार रस्त्यांसाठी पालकमंत्री पाणंद योजनेसाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असेही मंत्री जयकुमार रावल यांनी नमूद केले.

@@AUTHORINFO_V1@@