काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पराजयाच्या मानसिकतेत : मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Oct-2019
Total Views |



धुळे : "निवडणूक सुरू झाली असून काही दिवसांनी मतदानही होईल. मात्र, या निवडणुकीत मजाच येत नाही. कारण, समोर कोणी दिसतच नाही. आपले सर्व पहिलवान तेल लावून मैदानात उतरले आहेत. पण, समोर दुसरा कोणी पहिलवानच नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा पायपोस एकमेकांच्या पायात नाहीत. त्यामुळे ते सुरुवातीपासूनच पराजयाच्या मानसिकतेच गेले आहेत," अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. ते धुळ्याच्या नेर भागात आयोजित केलेल्या महायुतीच्या प्रचारसभेत बोलत होते.

 

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "काल-परवा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या जाहिरनाम्यात जगातली सर्वच आश्वासने देऊन टाकली. फक्त प्रत्येकाला ताजमहाल बांधून देण्याचे आश्वासने तेवढे बाकी राहिले. कारण, आश्वासने पूर्ण करायची नाहीत हे त्यांचे धोरण आहे. ५० वर्षे खोटं बोल पण रेटून बोल अशा प्रकारचे राजकारण यांनी केले. जनतेचा नव्हे तर स्वतःचा फायदा करून घेतला. गेल्या पाच वर्षांत हे केंद्रातील आणि राज्यातील सरकारवर एकही भ्रष्टाचाराचा आरोप लावू शकले नाहीत. आम्ही २४ तास जनतेकरिता काम केले. जनतेचा पैसा जनतेकडे नेला," असे त्यांनी सांगितले.

 

"दरम्यान, आघाडीच्या १५ वर्षांच्या सत्ताकाळात राज्यातला शेतकरी पूर्णपणे उद्धवस्त झाला. त्या महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांत आम्ही शेतकर्‍याच्या पाठीशी उभे राहिलो. १५ वर्षांत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने शेतकऱ्यांना २० हजार कोटींची मदत केली. मात्र, पाच वर्षांत युतीच्या सरकारने केलेली मदत ही ५० हजार कोटींची होती. आम्ही राज्यात ५० लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली ती अजूनही सुरूच आहे. प्रत्येक शेतकर्‍याचा सातबारा कोरा करणे हे आमचे उद्दिष्ट आहे," असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

 

आणि काश्मीर भारताचा अविभाज्य भाग झाला

 

"प्रत्येक भारतीयाच्या मनात शल्य होते की, काश्मीर आमचे असूनही त्याला वेगळा दर्जा, तिरंग्यापेक्षा वेगळ्या झेंडाला मान का? तसेच 'कलम ३७०' मुळे काश्मीरमधील व्यक्ती म्हणायचा की, आम्ही वेगळे आहोत आम्ही भारतीय नाही. त्या ठिकाणी वेगळेपणाची भावना तयार झाली होती. पाकिस्तान काश्मीर तोडण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र, मोदींना तुम्ही तीनशेच्या वर जागा दिल्या आणि त्यांनी '३७०' निष्प्रभ केले. त्यामुळे मोदींच्या नेतृत्वात शक्तिशाली भारत तयार होत आहे. मोदींच्या नेतृत्वात एक शक्तिशाली आणि समृद्ध महाराष्ट्र आपल्याला करायचा आहे," असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

@@AUTHORINFO_V1@@