
नवी दिल्ली : इस्त्रायल-इराण युद्धादरम्यान इराणमधील भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षितरित्या मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारने १८ जून २०२५ रोजी 'ऑपरेशन सिंधू' सुरू केले आहे. या ऑपरेशमध्ये इराणमधील भारतीय नागरिकांना, विशेषतः विद्यार्थ्यांना परदेशातून भारतात आणण्यात येणार आहे.
पहिल्या विशेष विमानाने ११० वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना आर्मेनियातून दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय हवाई दलावर उतरवण्यात आले आहे. हे विद्यार्थी मुख्यत्वे उरमिया मेडिकल विद्यापीठातील होते.
अधिक विमानं पाठवण्याची तयारी!
परराष्ट्र राज्यमंत्री किर्ती वर्धन सिंह यांनी सांगितले की, “आमच्याकडे दुसरे विमान तयार असून गुरुवार, १९ जून रोजी आणखी एक विमान पाठवण्यात येणार आहे. तुर्कमेनिस्तान मार्गे अजून नागरिकांनाही सुरक्षित परत आणण्यात येईल. या ऑपरेशनसाठी २४ तास हेल्पलाईन आणि नियंत्रण केंद्र सक्रिय करण्यात आले आहेत."
इराणी नागरिकांची परिस्थिती चिंताजनक!
भारतीय विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांनी इराणमध्ये ड्रोन आणि क्षेपणास्त्रांची भीती वाटत असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, “निरनिराळ्या ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या आदळण्याचे सतत आवाज येत आहेत. इराणमध्ये साधारण ४ हजार भारतीय नागरिक आहेत, ज्यात जवळपास अर्धे विद्यार्थी आहेत. ऑपरेशन सिंधूचे स्वरूप २०२२ मधील ऑपरेशन गंगाप्रमाणे आहे, ज्यात रशियाच्या युक्रेन तणावात १८ हजार भारतीय विद्यार्थी परत आणण्यात आले होते.