‘पाकिस्तानी दहशतवादी आम्हाला मारत आहेत, तुम्ही काही तरी करा,’ असे जागतिक व्यासपीठावर रडगाणे गाणारे आपले नेतृत्व होते. ‘ऑपरेशन सिंदूर’ने दाखवून दिले की, तो आता इतिहास झालेला आहे आणि आता चिमूटभर लाल सिंदूरचा वचपा असंख्य दहशतवाद्यांची मुंडकी छाटून घेतला जाईल, हे न बोलता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून दाखविले.
‘ऑपरेशन सिंदूर’च्या बातम्यांनी आज सर्व देशात आनंदाचे तुफान उठलेले आहे आणि ते स्वाभाविकच आहे. पहलगाम येथे पाकिस्तानी जिहादी दहशतवाद्यांनी हिंदू पुरुषांना वेचून वेचून ठार मारले. त्याची तीव्र वेदना सर्व देशभर उमटली. इतरवेळी आपल्या देशातील जनता कधी जातीवरून आपापसात भांडत बसते, कधी नदीच्या पाण्यावरून भांडणे होतात, तर कधी भाषिक कलह होतात. असे असले तरी या देशाचे चैतन्य मात्र एक आहे. त्या चैतन्यावर जेव्हा आघात होतो, त्याची कळ सर्व देशभर सारखी उमटते. हे आपले राष्ट्रीयत्व आहे. पाकिस्तानी जिहादी दहशतवाद्यांनी या राष्ट्रीयत्वावरच गोळ्या घातल्या.
राष्ट्राच्या आत्मसन्मानाचा विषय उफाळून वर आला आणि सर्व देशाने एकमुखाने मागणी केली की, ‘या घटनेचा सूड घेतला पाहिजे. पाकिस्तानला जन्माची अद्दल शिकविली पाहिजे. गरज पडली तर युद्ध केले पाहिजे आणि अंतिम उपाय म्हणून अण्वस्त्रांचा वापरही केला पाहिजे. जी काही मनुष्यहानी होईल, त्याला घाबरू नये. अपमानित होऊन रोज मरत जगण्यापेक्षा पराक्रम करून जगण्यात पुरुषार्थ आहे,’ अशी देशाची भावना झाली. ही भावना जातीनिरपेक्ष, पंथनिरपेक्ष आणि राजकीय विचारधारानिरपेक्ष आहे. भारताच्या सन्मानाचे रक्षण झालेच पाहिजे, ही तीव्र आच त्यामागे होती.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. अंतर्बाह्य राष्ट्रीयता ही त्यांची ओळख. त्यांचा जन्मच मुळी भारतमातेची परिपूर्ण सेवा करण्यासाठी झालेला आहे. भारतमातेचा अपमान सहन करण्याची त्यांची प्रवृत्ती नाही. त्यांच्यावर झालेले संघसंस्कार तसे नाहीत. ‘जगायचे ते मातृभूमीसाठी, देह झिजवायचा मातृभूमीसाठी, वैभवाची कामना करायची मातृभूमीसाठी’ ही त्यांची प्रवृत्ती असल्यामुळे हा दहशतवादी हल्ला मोदी सहन करणार नाहीत, हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ होते. मोदी संवेदनशील नेता आहेत, पण भावनाविवश नेता नाहीत. मनुष्य भावनाविवश झाला की, त्याची सारासार विवेकशक्ती गोठून जाते आणि तो जर संवेदनशील असेल, तर त्याची विचारशक्ती प्रखर होते. मोदींनी पाकिस्तानला ठोकण्याची शिवछत्रपतीनीती अवलंबली. शत्रूला गाफील ठेवायचे, संभ्रमित ठेवायचे, हल्ला कुठून करणार याचे आभासी चित्र निर्माण करायचे आणि शत्रू कल्पनाही करणार नाही अशाप्रकारे वार करायचा, ही महाराजांची रणनीती होती. नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त आहेत. शिवनीतीचा अवलंब करणारे महाराजांचे अनुयायी आहेत. भारताकडून पहलगाम हल्ल्याचे सैनिकी उत्तर दिले जाईल, असे पाकिस्तानला वाटले आणि त्यांनी आपले सैन्य सीमेवर आणून ठेवले. भारतानेदेखील समुद्रात नौदलाचा युद्ध सराव केला, सीमेवर हवाई दलाचा सराव केला आणि आपण हल्ला करण्याच्या तयारीत आहोत, असे आभासी चित्र निर्माण केले. सीमेवर बसलेल्या पाकिस्तानी सैनिकांच्या डोक्यावरून 24 भारतीय क्षेपणास्त्रे निघाली आणि त्यांनी अचूकपणे ‘लष्कर-ए-तोयबा’, ‘जैश-ए-मोहम्मद’, ‘हिजबुल्ला’ इत्यादी पाकिस्तानी दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करून टाकले. केवळ 25 मिनिटांची कारवाई झाली. छत्रपती शिवाजी महाराज दीड-दोन लाखांचा सैनिकी तळ असणार्या शाहिस्तेखानाच्या वाड्यात म्हणजे लाल महालात घुसले. आजच्या भाषेत याला ‘सर्जिकल स्ट्राईक’ म्हणावे लागेल. त्याची पुनरावृत्ती नरेंद्र मोदी यांनी आता केली. या हल्ल्यात किती दहशतवादी ठार झाले, याचा निश्चित आकडा हा लेख लिहीपर्यंत आलेला नव्हता. महाखतरनाक दहशतवादी मौलाना मसूद अजहर याच्या परिवारातील 14 जण झाले. तोही मरायला पाहिजे होता, पण वाचला. शिवशंभूंची इच्छा त्याला स्वतंत्रपणे संपविण्याची असावी.
पाकिस्तानला घडा शिकवणे ही सोपी गोष्ट नव्हती. त्याचे अनेक आंतरराष्ट्रीय पदर आहेत. नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्रनीतीची कमाल आहे. त्यांनी पाकिस्तानला ‘दहशतवाद’ या मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर एकाकी पाडले. अमेरिका, रशिया, चीन आणि ‘युनो’ कोणीच पाकिस्तानला साथ दिली नाही. याप्रकारे पाकिस्तानला 1965 आणि 1971 सालच्या युद्धातदेखील एकाकी पाडण्यात आलेले नव्हते. आज सारे जग दहशतवादाविरुद्ध उभे राहिले आहे. हा ‘इस्लामी जिहादी दहशतवाद’ आहे. ‘हमास’, ‘हिजबुल्ला’ यांच्याशी इस्रायलची वर्षभर लढाई चालू आहे. अमेरिकेने इस्रायलला सर्व प्रकारची मदत केली. पाकिस्तान हा इस्लामी दहशतवाद्यांचा आश्रयदाता देश झालेला आहे. ओसामा बिन लादेनला त्यानेच लपवून ठेवले होते आणि आजही अनेक खतरनाक दहशतवाद्यांना त्याने आपल्या देशात लपवून ठेवले आहे. भारताने म्हणजे नरेंद्र मोदी यांनी एक रणनीती आखली. या रणनीतीप्रमाणे फक्त दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला करायचा, हे निश्चित करण्यात आले.
पाकिस्तानच्या सैनिकी अड्ड्यांवर हल्ला करायचा नाही. पाकिस्तानच्या हवाई दलावर हल्ला करायचा नाही. आणि सैन्यावरदेखील हल्ला करायचा नाही. दि. 7 मे रोजीच्या हल्ल्याने भारताने जगाला दाखवून दिले की, आमची लढाई पाकिस्तान या देशाशी नसून, पाकिस्तानी जनतेशी नसून दहशतवाद्यांशी आहे. दहशतवादी तळ उद्ध्वस्त करून भारताने लष्करी कारवाईचे क्षेत्र अतिशय मर्यादित ठेवले. आंतरराष्ट्रीय राजकारण करत असताना या सर्वांची अत्यंत काळजी घ्यावी लागते. सामान्य माणसाला वेगळे वाटू शकते. पाकिस्तानी जनता, पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवादी यांच्यात तो फरक करीत नाही. त्याच्या दृष्टीने सगळेच एका माळेचे मणी आहेत आणि वास्तव जरी तसे असले तरी, आंतरराष्ट्रीय रणनीती आखताना दूरदर्शी राष्ट्रनेत्याला सामान्य माणसासारखा विचार करता येत नाही. त्याला मुत्सद्दीपणाचा विचार करावा लागतो आणि नरेंद्र मोदी हे त्यातील ‘मास्टर’ आहेत. युद्धाच्या कथा ऐकायला गोड असतात, युद्धाचा विध्वंस पचवायला फार कडू असतो. युद्ध हा अंतिम पर्याय असतो. मुत्सद्दी राजकारणी युद्ध न करता प्रश्न सोडविण्याचा उपाय शोधत राहतो.
नरेंद्र मोदी यांनी युद्धाची सिद्धता तर ठेवली आहे, पाकिस्तानाने युद्ध लावले तर लढावे लागेल. युद्ध करणे ही आपली प्रवृत्ती नाही, पण युद्धातून पलायन करणे हा आपला स्वभावदेखील नाही. आपली परंपरा शूरवीर आणि वीरांगनांची आहे. आताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये वीरांगनादेखील सहभागी झाल्या. राणी दुर्गावती, झाशीची राणी, जिजाऊ यांचे स्मरण झाल्याशिवाय राहत नाही. दि. 7 मे रोजी हा दिवस भारतीयांच्या चिरकाल स्मरणात राहील, पराक्रम करण्याची परंपरा आपण विसरत चाललो होतो. 1965, 1971 आणि कारगीलचे युद्ध पराक्रमाचे इतिहास असले तरी, त्यानंतर झालेले दहशतवादी हल्ले आपली प्रतिमा अत्यंत खराब करणारी झाली. भारत हा ‘डरपोक’ देश आहे, आत्मरक्षण करण्याचे त्याच्यात सामर्थ्य नाही, पराक्रम करण्याची भारतीयांत उर्मी आलेली नाही, पाकिस्तानी दहशतवादी आम्हाला मारत आहेत, तुम्ही काही तरी करा, असे जागतिक व्यासपीठावर रडगाणे गाणारे आपले नेतृत्व होते. ‘ऑपरेशन सिंदूर’ने दाखवून दिले की, तो आता इतिहास झालेला आहे आणि आता चिमूटभर लाल सिंदूरचा वचपा असंख्य दहशतवाद्यांची मुंडकी छाटून घेतला जाईल, हे न बोलता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून दाखविले. पोकळ गर्जना पाकिस्तानी नेत्यांनी कराव्यात आणि पाकिस्तानच्या कानशिलात एक सणसणीत मोदींनी मारावी, हे दृश्य जगाने बघितले आहे. ही पराक्रमाची आणि एकराष्ट्रीयत्वाच्या भावनेची ऊर्जा अशीच ओजस्वी आणि तेजस्वी राहावी, नव्हे राहिली पाहिजे. तिला क्षीण करणार्या आवाजांना जनतेने शांत केले पाहिजे. हा दहशतवाद एका ‘ऑपरेशन सिंदूर’ने संपला, या भ्रमातही ग्रहू नये. निरंतर जागरूकता ही स्वातंत्र्याची हमी असते. नित्य, सिद्ध, समर्थता ही आत्मरक्षणाची गुरुकिल्ली असते.
रमेश पतंगे
9869206101