मुंबई पोलिसांच्या गुप्तवार्ता विभागाची ताकद वाढली

- भारत-पाकिस्तान तणावानंतर खबरदारी; सहआयुक्त दर्जाचा स्वतंत्र अधिकारी नेमणार

    17-May-2025
Total Views | 11
 
Mumbai Police Intelligence Department
 
मुंबई: ( Mumbai Police Intelligence Department ) भारत-पाकिस्तानमधील तणावानंतर देशातील महत्त्वाच्या ठिकाणी विशेष खबरदारी घेतली जात आहे. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी असल्यामुळे येथील गुप्तवार्ता विभागाची ताकद वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. त्यानुसार, या विभागात सहआयुक्त दर्जाचा स्वतंत्र अधिकारी नेमला जाणार आहे. शुक्रवार, दि. 16 मे रोजी याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला. दरम्यान, आरती सिंह यांची मुंबई गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
 
मुंबई शहरात ‘अ’ वर्गवारीतील संवेदनशील स्थळांची संख्या मोठी आहे. त्यामुळे त्यांची सुरक्षा व्यवस्था अभेद्य राखणे आणि सूक्ष्म पर्यवेक्षण करीत राहणे गरजेचे असते. मुंबई शहरात सुरक्षिततेला धोका (थ्रेट पर्सेप्शन) असलेल्या अति महत्त्वाच्या व्यक्तींची संख्यादेखील खूप मोठी आहे. तसेच भारतासह इतर देशांचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राष्ट्रप्रमुख, राजे आणि देशातील इतर महत्त्वाचे केंद्रीय मंत्री यांच्या मुंबई शहरास होणार्‍या भेटींची संख्यादेखील मोठी आहे. त्या अनुषंगाने सुरक्षा व्यवस्था अभेद्य राखण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांच्या अधिपत्याखाली ‘पोलीस सहआयुक्त, गुप्तवार्ता’ हे पद स्थापन करण्यात येत असल्याचे या शासननिर्णयात नमूद करण्यात आले आहे.
 
मुंबई पोलिसांच्या अखत्यारीत आतापर्यंत ‘कायदा आणि सुव्यवस्था’, ‘गुन्हे’, ‘प्रशासन’, ‘वाहतूक’ आणि ‘आर्थिक गुन्हे’ हाताळणारे पाच सहआयुक्त होते. तर गुप्तचर माहिती गोळा करण्याचे काम विशेष शाखेकडून केली जात होते. ज्याचे नेतृत्व अतिरिक्त आयुक्त (उपमहानिरीक्षक दर्जाचे) करतात आणि ही विशेष शाखा पोलीस सहआयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) यांना अहवाल सादर करते. यापुढे या शाखेचे नेतृत्व गुप्तवार्ता विभागाचे सहपोलीस आयुक्त करतील.
 
काम काय?
 
मुंबईतील प्रत्येक घडामोडींवर लक्ष ठेवत गुप्त माहिती गोळा करणे. तसेच स्लीपर सेल आणि (दहशतवादाच्या) सहानुभूती असलेल्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवेल.
 
गुप्तवार्ता विभागाचे सहआयुक्त थेट पोलीस आयुक्तांना अहवाल देतील आणि कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या सहआयुक्तांशी जवळून समन्वय साधतील.
 
यामुळे गुप्तचर माहिती गोळा करण्यास आणि वरिष्ठांना वेळेवर माहिती सामायिक करण्यास मदत होईल, जेणेकरून जलद कारवाई करता येईल.
 
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121