राऊतांचं हे पुस्तक म्हणजे...! मंत्री संजय शिरसाटांचा घणाघात
16-May-2025
Total Views | 54
मुंबई : संजय राऊतांनी लिहिलेले 'नरकातला स्वर्ग' हे पुस्तक म्हणजे पिक्चरची स्क्रिप्ट असल्याच्या प्रकार आहे, असा घणाघात मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. लवकरच संजय राऊतांच्या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. मात्र, त्याआधीच यावर विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, "संजय राऊतांना लिहिण्याचा छंद आहे ही चांगली गोष्ट आहे. परंतू, लिहित असताना वास्तविकता मांडायला हवी. पण जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही हा राऊतांचा स्वभाव असल्याने त्यांनी तेच तेच रिपीट केले. शिवसेनाप्रमुखांमुळे अनेकांना मदत झाली हे कोणतेही जाणकार नेते नाकारणार नाही. परंतू, राऊतांचे पुस्तक हे पिक्चरची स्क्रिप्ट लिहिल्याचा प्रकार आहे. त्याकाळात संजय राऊत काय करत होते? त्यांचं पद काय होतं? हे त्यांनी सांगावं. परंतू, मी काहीतरी स्फोटात्मक बोलतो आणि लिहितोय आणि तेच सत्य माना हे केवळ प्रसिद्धीसाठी आहे. ही नौटंकी आहे," अशी टीका त्यांनी केली.
"शिवसेना प्रमुखांनी अनेकांना मदत केली आणि कधीच त्याची वाच्यताही केली नाही. त्यामुळेच शिवसेनाप्रमुखांवर अनेक लोक प्रेम करतात. आमच्यासारखे लोक त्यांच्या आशीर्वादामुळे मोठे झाले. त्यामुळे संजय राऊतांचे पुस्तक हे पिक्चरची स्टोरी लिहिल्यासारखे असून स्वत:ची पाठ थोपटवून घेण्याचा हा प्रकार आहे," असे ते म्हणाले.
राऊतांना राहुल गांधी हे शिवसेना प्रमुखांपेक्षाही मोठे!
"संजय राऊत काहीही करू शकतात. ते इंग्रजीत लिहतील. राहुल गांधी परदेशातील विद्यापीठात जातील आणि तिथे या पुस्तकाचे प्रकाशन करतील. त्यांना राहुल गांधी हे शिवसेना प्रमुखांपेक्षाही मोठे वाटतात, हे सत्य आहे. संजय राऊत कधीच खरे बोलणार नाही. संजय राऊतांची मानसिकता दरोडेखोरासारखी झाली आहे. त्यामुळे राऊतांचे पुस्तक ही मनाने घडवलेली स्क्रिप्ट आहे," अशी टीकाही संजय शिरसाट यांनी केली आहे.