पहलगाममध्ये जे झालं तो देशावरचा हल्ला आहे. या हल्ल्यात धर्म, जातपात, भाषा या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत. देशवासीय म्हणून कोणतीही अपेक्षा न करता आपल्याला एकत्र यावं लागेल,” असे वक्तव्य शरद पवार यांनी नुकतेच केले. पण, यावरून पवारांना धर्माची नव्हे, तर हिंदू धर्माचीच एलर्जी असल्याचे पुनश्च सिद्ध व्हावे. म्हणजे, इस्लामिक दहशतवाद्यांनी 26 पर्यटकांना चक्क त्यांचा धर्म विचारून ठार मारल्यानंतरही, ‘हा धर्मावरचा हल्ला नाही’ हे पवारांचे विधान म्हणजे असंवेदनशीलतेचा कळस! हिंदू होते म्हणूनच त्या पर्यटकांवर निर्घृणपणे गोळ्या झाडण्यात आल्या, हे त्या मृतांच्या बायकामुलांनी अगदी ओरडून ओरडून पवार भेटीला गेले असतानाही सांगितले.
पण, तरीही पवार साहेबांना हा हिंदूंवरील नव्हे, तर देशावरीलच हल्ला वाटतो, हे त्यांच्या आजवरच्या लांगूलचालनाच्या राजकारणाचेच (कु)संस्कार! असाच हल्ला मुसलमानांना त्यांचा धर्म विचारून अन्य धर्मीयांकडून यदाकदाचित झाला असता, तरीही या ‘जाणत्यांनी’ अशीच सोयीस्कर भूमिका घेतली असती का? तर मुळीच नाही. उलट पवारांनीही भारतात ‘इस्लाम खतरे में’ची बांग ठोकून दिली असती. अल्पसंख्याकांची सुरक्षा कशी देशोधडीला लागली आहे, याचे पाढे पवारांनी वाचले असते. देशात धार्मिक असहिष्णुता कशी शिगेला पोहोचली आहे, याचे दाखले देण्यातच साहेबांची अगदी दमछाक झाली असती. अशांसाठीच्या मेणबत्ती मोर्च्यांना, शोकसभांनाही पवार अगदी जाळीदार टोप्या घालून झाडून हजर असतेच की!
पण, पहलगामचा हल्ला हिंदूंवर झाला. हा देशावरचा हल्ला आहेच, त्याबाबत दुमत नाहीच. परंतु, हा दहशतवादी हल्ला विशेषत्वाने धार्मिक ओळख विचारून करण्यात आला, यावरून त्या दहशतवाद्यांचे लक्ष्य हिंदू धर्मीयच होते, हे सिद्ध व्हावे. तरीही पवारांनी इथे आपल्या सोयीनुसार ‘धर्म’ आणि ‘देश’ यांचा अर्थ लावला आणि आपण किती हाडाचे सेक्युलर, पुरोगामी आहोत, हेच दाखवण्याचा हा सगळा खटाटोप. दहशतवादी इशरत जहाँच्या नावे रुग्णवाहिका सुरू करणारे आणि 1993 साली मुंबईत 12 स्फोटांऐवजी 13वा न झालेला स्फोटही मुस्लीम वस्तीत झाल्याचे बेधडकपणे ठोकून देणार्या पवारांकडून दुसरी अपेक्षा ती काय म्हणा? कारण, पवार साहेबांचा ‘धर्म’च मुळी वेगळा
काँग्रेसींचा ना‘पाक’गळा
सिद्धरामय्या, विजय वडेट्टीवार यांसारख्या काँग्रेसी नेत्यांनी पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर असंवेदनशील टीकांचा धडाकाच लावला. त्यानंतर काँग्रेसने त्या भूमिका वैयक्तिक म्हणत, नेहमीप्रमाणे आपले ‘हात’ झटकले. म्हणे, काँग्रेसने या नेत्यांना समज वगैरे दिली. पण, तसे असते आणि खरोखरच काँग्रेस पक्ष मोदी सरकारसोबत पहलगाम हल्ल्याविरोधातील कारवाईसाठी एकदिलाने उभा असता, तर मोदींचे शीर नसलेले ‘गायब’ म्हणून पोस्टर त्यांच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी पोस्ट केले नसते.
आपल्याच देशाच्या पंतप्रधानाचे असे शीर नसलेले पोस्टर समाजमाध्यमांवर टाकण्याचा नापाकपणा या काँग्रेसींना दाखवला. त्यावरून प्रचंड टीकेची झोड उठताच, हे पोस्टर काँग्रेसच्या समाजमाध्यमांवरील खात्यांवरून ‘गायब’ करण्यात आले. पण, यानिमित्ताने मोदीद्वेष काँग्रेसच्या किती नसानसांत भिनला आहे, याची प्रचिती यावी. या सगळ्यानंतर तरी काँग्रेसचे डोके ठिकाणावर येईल आणि पाकिस्तानी माध्यमांना हे काँग्रेसी ‘बाईट्स’ आयते भारतविरोधी खाद्य पुरवणार नाहीत, अशी अपेक्षा होती. परंतु, काँग्रेसचेच प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांच्या विधानाने पाकिस्तानी माध्यमांनाही कोलित मिळाले.
सुरजेवाला म्हणाले की, “भाजप आणि अतिरेक्यांचे जवळचे संबंध असून, जेव्हा भाजप सत्तेत असतो तेव्हाच असे हल्ले होतात.” आता एका राष्ट्रीय पक्षाच्या प्रवक्त्याने राष्ट्रीय सुरक्षेसारख्या संवेदनशील विषयावर बोलताना असे अकलेचे तारे तोडणे, हा काँग्रेसच्या ‘राहुल गांधी घराण्या’च्या परंपरेचाच एक भाग. पुलवामा, उरी येथील सैन्यदलावरील हल्ल्यांनंतरही अशाच तथ्यहीन शंका-कुशंका काँग्रेसींनी उपस्थित केल्या होत्या.
तेव्हाही काँग्रेसला याबाबतचे कोणतेही पुरावे देता आले नव्हते आणि आताही पहलगाम दहशतवादी हल्ल्यामागील सत्य ढळढळीत समोर असताना, काँग्रेसकडून केले जाणारे हे दावे देशाच्या शत्रूंनाच सर्वस्वी बळ देणारे! त्यात सुरजेवालांनी पाजळलेल्या अज्ञानाची कीव करावी तितकी कमीच. कारण, देशात सर्वाधिक दहशतवादी हल्ले हे काँग्रेसच्याच कार्यकाळात झाले. त्या हल्ल्यांनंतरची भारताची निष्क्रिय प्रतिक्रिया आणि आज पहलगाम हल्ल्यानंतर प्रत्यक्ष कारवाईआधीच गलितगात्र झालेला पाकिस्तान, हेच या नवभारताच्या शौर्याचे अन् सामर्थ्याचे प्रतीक!