मराठी भाषेमध्ये भारतीय सैन्याच्या पार्थपराक्रमाची कथा सांगणारी साहित्यनिर्मिती काही प्रमाणात झाली आहे. मात्र, त्याचे प्रमाण अपेक्षेपेक्षा फारच कमी आहे. निवडक अशा युद्धाच्या कथाच पुढे आलेल्या आहेत. त्यातील अनेक पुस्तके तर, प्रत्यक्ष सैनिकांनीच लिहिलेली आहेत. त्यामुळे संशोधन करून, नवसाहित्य निर्मितीसाठी या क्षेत्रात बराच वाव आहे. लष्कराच्या पराक्रमाचे वर्णन करणार्या साहित्यकृतींचा लेखाच्या उत्तरार्धात घेतलेला आढावा...
नवी दिल्ली येथील 98व्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’ला, नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेकरिता मला, ‘मराठी साहित्य आणि भारताची सुरक्षा’ या विषयावर लेख लिहिण्यास सांगण्यात आले. या लेखाचा हा उत्तरार्ध...
पहिल्या आणि दुसर्या महायुद्धावर फारसे लिखाण नाही
पहिल्या आणि दुसर्या महायुद्धामध्ये 25 ते 35 लाख भारतीय सैनिकांनी भाग घेतला आणि त्यांनी, युरोपच्या वेगवेगळ्या रणभूमीवर महापराक्रम गाजवले. या विषयावर फारसे लिखाण झालेले नाही. मात्र, भारतीय सैन्याच्या वेगवेगळ्या रेजिमेंट्स आपल्या इतिहासामध्ये, या युद्धांचे वर्णन करतात. उदाहरणार्थ, ‘मराठा रेजिमेंट’ने दुसर्या युद्धात गाजवलेला महापराक्रम, हा त्यांच्या ‘रेजिमेंटल हिस्टरी’मध्ये लिहिण्यात आलेला आहे.
भारतीय उपखंडामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळातील हजारो वर्षांमध्ये, शेकडो युद्ध लढली गेली. अनेक परकीयांनी भारतावर आक्रमण केले. या काळात वापरलेल्या भारतीय युद्ध पद्धतीचा किंवा शत्रूंच्या युद्ध पद्धतीचा, पुरेसा अभ्यास केला गेला नाही.
आता भारतीय सैन्य, भारतीय उपखंडामध्ये लढल्या गेलेल्या आजवरच्या सगळ्या युद्धाचा अभ्यास करून, त्याचे विश्लेषण करत आहे. तसेच येणार्या काळामध्ये, या डावपेचांचा कसा वापर करता येईल, यावर विचार करत आहे. भारतीयांनी हरलेल्या किंवा जिंकलेल्या युद्धाचा अभ्यास केला जात आहे, हे महत्त्वाचे आहे. कारण, प्रत्येक विजयातून किंवा पराभवातून, आपल्याला काहीतरी शिकता येते.
आता मौर्य, पल्लव, गुप्त, ते ब्रिटिश यापर्यंतच्या कळातील युद्ध पद्धतींचा अभ्यास केला जात आहे. भारतीय लष्कर त्यांच्या ‘प्रकल्प उद्भव’ अंतर्गत, भारताचा समृद्ध लष्करी वारसा, महाभारतातील लढाया, वेद, पुराण, उपनिषदे आणि अर्थशास्त्र यांसारख्या प्राचीन ग्रंथांचाही अभ्यास करत आहे.
या विषयांवर मराठी साहित्यात नवनिर्मिती होऊ शकते.
1947 सालानंतर भारत, पाकिस्तान आणि चीनबरोबर चार युद्धे लढला. 1947-48 सालच्या ‘भारत-पाकिस्तान युद्धा’वर मराठी भाषेत प्रकाशित झालेले मराठी साहित्य हे फार नाही. 1947-48 सालचे भारत-पाकिस्तान युद्ध हा भारताच्या इतिहासातील एका महत्त्वाच्या टप्पा होता. या युद्धामुळे भारताच्या सुरक्षेवर मोठा परिणाम झाला. या युद्धावर मराठीमध्ये नवसाहित्य निर्मिती होणे आवश्यक आहे. यातूनच आपल्याला या संघर्षाचे विविध पैलू समजू शकतात.
1962 सालच्या भारत-चीन युद्धावर, मराठी साहित्यनिर्मिती झाली आहे. भारत-चीन युद्ध हे भारताच्या ईशान्य आणि उत्तर सीमेवर, दि. 20 ऑक्टोबर ते सि. 20 नोव्हेंबर 1962 दरम्यान झाले. त्यात भारतीय नेतृत्वाचा पराभव झाला. हा पराभव अनेक कारणांनी, भारतीय लष्कराला धडा देणारा ठरला. या विषयावर अनेक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यातील काही पुढीलप्रमाणे आहेत
जनरल पित्रे यांचे, न सांगण्याजोगी गोष्ट : 62च्या पराभवाची शोकांतिका.
सतीश अंभईकर लिखित, सुधाताई नाटेकर यांची संकल्पना असलेले, ‘शूरा मी वंदिले’ ही शौर्यगाथा. 1962 सालच्या भारत-चीन युद्धामध्ये वीरगती प्राप्त झालेला माझा मावस भाऊ, लेफ्टनंट विष्णू आठले याची ही शौर्यगाथा आताच आम्ही प्रकाशित केली आहे.
‘आव्हान चिनी ड्रॅगनचे’ हे माझे पुस्तकसुद्धा 2012 साली प्रकाशित झाले होते.
1965 सालच्या भारत-पाकिस्तान युद्धावरचे मराठी साहित्य:
या विषयावर अनेक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. यामधील काही पुस्तकांमधून आपण, या संघर्षाचे विविध पैलू समजून घेऊ शकतो.
- भारत-पाकिस्तान युद्ध 1965 : ‘एका सामान्य सैनिकाची कहाणी’ हे पुस्तक, एका भारतीय सैनिकाच्या दृष्टिकोनातून युद्धाचे अनुभव सांगते.
‘ताश्कंद करार : 1965 सालच्या भारत-पाकिस्तान युद्धाचा परिणाम’ हे सुनील धानवते यांचे पुस्तक, ताश्कंद कराराच्या पार्श्वभूमी, वाटाघाटी आणि त्याच्या परिणामांचा विश्लेषण करते.
भारत आणि पाकिस्तान : 1947 ते 1965 सालापर्यंतचे संबंध हे विजय केशव यांचे पुस्तक , भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि 1965 सालच्या युद्धाचा त्याच्यावर कसा परिणाम झाला, याचे सखोल विश्लेषण करते.
1971 सालच्या भारत-पाकिस्तान युद्धावरील मराठी साहित्य:
या युद्धावरही बरेच मराठी साहित्य प्रकाशित झाले आहे. या साहित्याच्या माध्यमातूनच, संघर्षाचे विविध पैलू समजून घेण्यास मदत होते. यातील काही पुस्तके, वरिष्ठ भारतीय सैन्य अधिकार्याच्या दृष्टिकोनातून युद्धाचे वर्णन करतात. काही पुस्तके भारतीय सैनिकांच्या दृष्टिकोनातून, युद्धाचे अनुभव सांगतात. यात रणगाडे, लढाया, सैनिकांचे धैर्य आणि बलिदान आणि युद्धाचा मानसिक परिणाम यांचेही विस्तृत वर्णन करण्यात आले आहे.
या पारंपरिक युद्धामध्ये भारताचे सैन्य हे चीन, पाकिस्तानच्या सैन्याशी लढत होते. या युद्धांशी देशातील जनतेचा फारसा संबंध नव्हता. पारंपरिक युद्धामध्ये, भारतीय सैन्याने पाकिस्तानचा नेहमीच पराभव केला.
‘ऑपरेशन काराकोरम’मध्ये पाकिस्तानचा पराभव
1971 सालचे युद्ध हरल्यानंतर पाकिस्तानला लक्षात आले की, पारंपरिक युद्धात भारताशी लढून जिंकणे शक्य नाही. म्हणून त्यांनी एक नवीन प्रकारचे युद्ध 1972 नंतर सुरू केले. ज्याचे नाव होते ‘ऑपरेशन काराकोरम.’ काराकोरम युद्धाचे तीन भाग होते. काराकोरम एक म्हणजे, खलिस्तानी दहशतवाद, काराकोरम दोन म्हणजे, काश्मीरमध्ये छुपे युद्ध किंवा दहशतवाद आणि काराकोरम तीन म्हणजे, देशाच्या इतर भागात दहशतवाद.
‘ऑपरेशन काराकोरम’मध्येसुद्धा पाकिस्तान पराभवाच्या उंबरठ्यावर.
खालिस्तानी दहशतवादाचे कंबरडे मोडले गेले आहे. मात्र, त्यापेक्षा भयानक अफू, गांजा, चरसचा दहशतवाद अर्थात ‘नार्को टेररिझम’ पंजाब आणि सीमावर्ती भागात सुरू असून, तरुणांना लक्ष्य केले जात आहे. या युवकांना जर वाचवायचे असेल, तर सीमा सुरक्षा दलाला सीमा बंद कराव्या लागतील. राजकीय पक्ष, पोलीस, सामाजिक संस्था आणि समाज यांना अफू, गांजा, चरस, दहशतवादाच्या विरोधात एकत्रित लढाई लढावे लागेल.
काश्मीरमध्ये दहशतवादाचे कंबरडे मोडण्यात आले आहे. काश्मीरच्या खोर्यामध्ये आज 150 दहशतवादी असावेत. भारतीय सैन्य अविरत ऑपरेशन्स लॉन्च करून त्यांना मारत असते. मात्र, पाकिस्तान, भारतात दहशतवाद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून दहशतवादाच्या लढाईकरिता, भारतीय सैन्याला अजून रक्त सांडण्याकरता तयार राहावे लागेल. मात्र, भारताच्या इतर भागात दहशतवादी हल्ले करण्यापासून थांबवण्यामध्ये, आपल्याला यश मिळालेले आहे. मात्र, समुद्रातील तस्करी, बेकायदेशीर व्यापार आणि बांगलादेशी घुसखोरी सुरूच आहे. येत्या काळात नौदल, तटरक्षक दल आणि सागरी पोलिसांना डोळ्यात तेल घालून, सागरी सुरक्षा अधिक मजबूत करावी लागेल.
भारताच्या भूसीमांच्या सुरक्षेशिवाय, सागरी सुरक्षा, महासागरी सुरक्षा, आकाश किंवा अवकाशाची सुरक्षा या विषयांवर, कुठलीच पुस्तके नाहीत. या विषयांवर अभ्यास करून, मराठी वाचकांकरिता पुस्तके लिहिणे जरूरी आहे. भारताच्या सागरी सुरक्षेवर लिहिलेली माझी मराठीमधील पुस्तके, एप्रिल 2024 साली प्रकाशित झाली.
भारतात नक्षलवाद, डावा दहशतवाद, माओवाद संपवण्याकरिता अर्धसैनिक दले आणि पोलिसांना दंडकारण्य, अबुजमाड जंगल आणि सरंदा जंगलांमध्ये घुसून, माओवाद्यांचे ट्रेनिंग, इतर अड्डे आक्रमक कारवाई करूनच उद्ध्वस्त करावे लागतील.
काश्मीर माओवाद, दहशतवाद या विषयावर अनेक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. यावर माझी नक्षलवादावरची दोन पुस्तके, 2012 आणि सुधारित आवृत्ती 2019 साली प्रकाशित झाली. ‘आव्हान काश्मीरमधील छुप्या युद्धाचे’ हे पुस्तकसुद्धा, मराठीमध्ये प्रकाशित झाले आहे. 1961 सालचे ‘गोवा मुक्ती आंदोलन’, 1948 सालचे ‘हैदराबाद मुक्तिसंग्राम’, यावर बरेच मराठी साहित्य प्रकाशित झालेले आहे. मात्र, हैदराबादच्या सैन्याने लढलेले ’ऑपरेशन पोलो’, गोवामुक्ती संग्रामामध्ये सैन्याने 1961 मध्ये लढलेले ’ऑपरेशन विजय’ प्रकाश झोतात नाहीत. मराठीमध्ये जर यावर पुस्तके प्रकाशित झाली, तर अधिक चांगले होईल.
हेमंत महाजन