बसपाचा गृहकलह

    07-Mar-2025   
Total Views |

bsp chief mayawati removed akash anand from all party posts
 
 
बसपाच्या राष्ट्रीय समन्वयक पदावरुन आपल्या पुतण्याला, आकाश आनंदला पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी नुकतेच पदमुक्त केले. राजकारणाला घराणेशाही जशी नवीन नाही, तसेच राजकीय पक्षांनाही गृहकलहाचा तर पिढीजात शाप!त्याचीच प्रचिती मायावतींच्या या टोकाच्या निर्णयातून जगजाहीर झाली.
 
बहुजन समाज पक्षाने (बसपा) या आठवड्यात आकाश आनंद यांना बाहेरचा रस्ता दाखवला. तत्पूर्वी रविवारी त्यांना पक्षाच्या सर्व पदांवरून काढून टाकण्यात आले. यापूर्वी बसपा प्रमुख मायावती यांनी आकाशचे सासरे अशोक सिद्धार्थ यांनाही बाहेरचा मार्ग दाखवला होता. मायावती यांनी आकाशवर त्याच्या सासरच्यांच्या प्रभावाखाली काम करण्याचा आरोप केला होता. आकाश आनंद यांचे वडील आनंद कुमार आणि राज्यसभा खासदार रामजी गौतम यांना बसपाचे नवे राष्ट्रीय समन्वयक बनवण्यात आले आहे. यासोबतच मायावती म्हणाल्या आहेत की, “जोपर्यंत ते जिवंत आहेत, तोपर्यंत कोणीही त्यांचे उत्तराधिकारी होणार नाही.” बसपाच्या या पावलांमुळे आकाश आनंद आणि बसपाचे भविष्य काय असेल, याची चर्चा तीव्र झाली आहे. त्याचप्रमाणे, आणखी एका प्रादेशिक पक्षामध्ये गृहकलह सुरू झाला आहे.
 
आकाश आनंद २०१७ साली शिक्षण घेतल्यानंतर लंडनहून परतले. त्यानंतर ते बसपाच्या कार्यात सक्रिय झाले. २०१९ साली त्यांना बसपाचे राष्ट्रीय समन्वयक बनवण्यात आले. परंतु, गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर त्यांना या पदावरून हटविण्यात आले. मायावती म्हणाल्या होत्या की, “आकाश अजून परिपक्व झालेला नाही.” पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर त्यांनी त्यांच्या सभांमध्ये थेट हल्ला करायला सुरुवात केली, तेव्हा बसपाने त्यांच्यावरही कारवाई केली. काही लोकांनी म्हटले की, बसपाचा निर्णय भाजपच्या दबावाखाली घेण्यात आला.
 
लोकसभा निवडणुकीनंतर, आकाश आनंद यांना पुन्हा एकदा राष्ट्रीय समन्वयक पदावर नियुक्त करण्यात आले. ते रविवारपर्यंत या पदावर होते. आकाश आनंद यांनी बसपामध्ये असताना अनेक निवडणुका पाहिल्या. मात्र, त्यांना कोणत्याही निवडणुकीत कोठेही उल्लेखनीय यश मिळाले नाही. यामध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका तसेच हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान आणि दिल्ली यासारख्या राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांचा समावेश आहे. या राज्यांमध्ये बसपाची स्थिती पूर्वीपेक्षाही वाईट झाली आहे. मात्र, एका गोष्टीने लोकांचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे आकाश आनंद यांची लोकप्रियता. कार्यकर्त्यांना सहज भेटणे आणि त्यांचे म्हणणे ऐकून घेणे. त्याचप्रमाणे त्यांच्या आक्रमक भाषणांनीही कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रियता मिळवली आहे.
 
आकाश आनंदचा विवाह मार्च २०२३ साली अशोक सिद्धार्थ यांची मुलगी डॉ. प्रज्ञा हिच्याशी झाला होता. त्याचवेळी आकाशच्या मेहुण्यांचे लग्न दि. ७ फेब्रुवारी रोजी आग्रा येथे झाले. राजकीय वर्तुळातील चर्चेनुसार, मायावतींनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना या लग्नाला उपस्थित राहण्याचे टाळण्यास सांगितले होते. यानंतरही आकाश आनंद यांच्या लग्नाला अनेक नेते उपस्थित राहिले. यामध्ये आकाश आनंद मायावतींचे वारस झाल्यापासून त्यांच्याशी जवळीक दाखवणारे नेते समाविष्ट होते. मायावतींनी याला शक्तिप्रदर्शन म्हणून पाहिले. अशोक सिद्धार्थ हे आकाश आनंदसोबत त्याच्यासारखाच एक गट तयार करण्याचा प्रयत्न करत आहे, असा मायावतींचा संशय बळावला आणि त्यांनी पक्षातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला.
 
पक्षातून काढून टाकल्यानंतर आकाश आनंद यांनी अद्याप काहीही महत्त्वाचे जाहीर वक्तव्य केलेले नाही. अशा परिस्थितीत येणारे दिवस खूप महत्त्वाचे आहेत. बसपाच्या कार्यशैलीचा विचार करता, आकाश आनंद यांना पुन्हा कधीही पक्षात घेतले जाणार नाही, अशी अपेक्षा आहे. कारण, राज्यसभा सदस्य रामजी गौतम यांच्यासोबत आकाशचे वडील राज कुमार आनंद यांनाही बसपाचे राष्ट्रीय समन्वयक बनवण्यात आले होते. मात्र, आनंद यांनी त्यास नकार दिला. अशा परिस्थितीत काहीतरी मध्यम मार्ग सापडेल, अशी अपेक्षा पक्षातील कार्यकर्त्यांना आहे. तथापि, यासाठी आकाश आनंद यांना ते अन्य कोणाच्या प्रभावात नाही, हे पटवून द्यावे लागणार आहे.
 
आकाश आनंद यांच्या हकालपट्टीस त्यांचे भाषण तात्कालिक कारण ठरले. हे भाषण मात्र एकप्रकारे थेट मायावतींनाच आव्हान देणारे होते. आकाश आनंद यांनी त्यांच्या भाषणात म्हटले की, “गेल्या अडीच वर्षांत, मला समजले आहे की, आमचे कार्यकर्ते पक्षाच्या रचनेबद्दल, पद्धतींबद्दल, पक्ष चालवण्याच्या पद्धतीबद्दल थोडे चिंतेत आहेत, त्यात अनेक कमतरता आहेत. आमचे काही अधिकारी पक्षाला फायदा होण्यापेक्षा त्याचे जास्त नुकसान करत आहेत, असा समज पक्षात दृढ होत आहे. सध्याचे काही ज्येष्ठ पदाधिकारी तरुणांना काम करू देत नाहीत.” काम करताना मलाही अशाच अडचणींचा सामना करावा लागल्याचा टोला त्यांनी लगावला होता. पक्षात सध्या थेट बहनजींशी बोलता येईल, अशी स्थिती नाही. मात्र, त्यासाठी आपण प्रयत्न करणार, असेही त्यांनी म्हटले होते.
 
आकाश आनंद यांच्या या भाषणातून पक्षात काय चालले आहे, याचे सत्य समोर आले आहे. बसपा सुप्रिमो मायावतींवर अनेकदा भाजपला मदत केल्याचा आरोप झाला आहे, ज्यामुळे पक्ष या स्थितीत पोहोचला आहे. अनेक राजकीय तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, आकाश आनंदचा संदर्भ पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे होता. कदाचित त्यांना याचे परिणाम भोगावे लागले असतील आणि बसपा सुप्रिमो मायावती यांनी त्यांना पक्षातून बाहेर पडण्याचा रस्ता दाखवला असेल.
 
आकाश आनंद बसपापासून वेगळे होऊन स्वतःची सामाजिक, राजकीय संघटना स्थापन करण्याच्या शक्यतेची चर्चा आता रंगली आहे. जर त्यांनी असे केले तर हा मार्ग नक्कीच सोपा नसेल. मात्र, यामध्ये आकाश आनंदमध्ये बसपाचे भविष्य पाहणार्‍या बसपा कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळू शकतो. त्यांच्यासोबत असे कार्यकर्ते आणि नेतेदेखील येऊ शकतात, ज्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले आहे किंवा ज्यांनी स्वतःहून पक्ष सोडला आहे किंवा जे पक्षात असूनही निष्क्रिय आहेत.
 
उत्तर प्रदेशातील नगीना मतदारसंघाचे खासदार चंद्रशेखर कधीही बसपामध्ये नव्हते. परंतु, बसपाशी नाराज असलेल्या लोकांच्या बळावर ते उत्तर प्रदेश आणि देशातील इतर राज्यांमध्ये त्यांचा पक्ष ‘आझाद समाज पक्ष’ स्थापन करण्यात यशस्वी झाले आहेत. मात्र, एक-दोन अपवाद वगळता ज्यांनी बसपा सोडून वेगळी संघटना किंवा पक्ष स्थापन केला, त्यांना फारसे यश मिळालेले नाही. याचे कारण असे की, मायावतींना अजूनही दलित समुदायावर सर्वात जास्त पकड असल्याचे मानले जाते. पण, काही राजकीय विश्लेषकांचा असा विश्वास आहे की, मायावतींची पकड दिवसेंदिवस कमकुवत होत आहे. दलित समाजात बसपाच्या जागी भाजप आणि समाजवादी पक्षाची पकड मजबूत होत आहे. हे असेच सुरू राहिल्यास आकाश आनंद यांनी भरपूर संघर्ष करावा लागणार, हे नक्की.