मुंबई : " प्रफुल्ला डहाणूकर आर्ट फाउंडेशनच्या माध्यमातून उदयोन्मुख कलाकारांचा शोध निरंतर सुरू असतो. मला असं वाटतं की कलात्मक प्रतिभेला सामाजिक, आर्थीक, सीमांचे बंधन नसावे. ही कलात्मक प्रतिभा सर्वाथाने मुक्त असावी. प्रतिभाशाली कलाकारांना त्यांच्या हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत." असे प्रतिपादन प्रफुल्ला डहाणूकर आर्ट फाउंडेशनच्या विश्वस्त गौरी डहाणूकर यांनी केले. कलानंद २०२५ या कार्यक्रमाविषयी दै. मुंबई तरूण भारतशी संवाद साधताना म्हणाल्या. प्रफुल्ला डहाणूकर आर्ट फाउंडेशनच्या माध्यमातून मुंबईतील नरिमन पाँईट इथल्या बजाज भवन येथे 'कलानंद २०२५'चे आयोजन करण्यात आले आहे. दि. २ मार्च ते ८ मार्च पर्यंत सुरू असलेल्या या प्रदर्शनात नवोदित कलाकारांच्या सृजनशीलतेचा आविष्कार दर्शकांना अनुभवायाला मिळणार आहे.
प्रफुल्ला डहाणूकर हे आधुनिक भारतीय कलाविश्वातील अत्यंत महत्वाचे नाव. आपल्या चित्रशिल्पातून त्यांनी कला विश्वात स्वताचा वेगळा ठसा उमटवला. कला विश्वातील त्यांच्या योगदानाबरोबरच प्रफुल्ला डहाणूकर यांनी तरुण पिढीतील असंख्य कलाकारांना आपल्या हयातीत मदत केली. त्यांचा हाच वारसा पुढे चालवला आहे त्यांच्या मुली गौरी डहाणूकर-मेहता, गोपिका डहाणूकर आणि रुकमिणी डहाणूकर यांनी. कलानंद २०२५ या प्रदर्शनात २१ कलाकृतींचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये चित्रकला, रेखाचित्र, मुद्रणकला, शिल्पकला, टेपेस्ट्री, या कलाकृतींचा समावेश आहे. कलानंद अनुदान कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतातील नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. ऑनलाईन प्रवेशिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना, कलाकारांना आपले कलाविष्कार सादर करण्याची संधी दिली जाते. मान्यवर कला इतिहासकर, समीक्षक निष्पक्ष पद्धतीने सादरीकरणाचे मूल्यमापन करतात. या मूल्यमापनातून पुढे सदर कलाकारांना आपल्या प्रदर्शनासाठी प्रफुल्ला डहाणूकर आर्ट फाउंडेशनच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. या वर्षी २०० पेक्षा जास्त प्रवेशिका ' कलानंद'साठी दाखल करण्यात आल्या होत्या, त्यातील निवडक २१ कलाकृतींचे प्रदर्शन मुंबईच्या नरिमन पाँईट येथील बजाज भवन इथल्या कला दालनात मांडण्यात आले आहे. प्रफुल्ला डहाणूकर आर्ट फाउंडेशन मागची ११ वर्ष अविरत कार्यरत आहे. २०१४ साली दिवंगत दिलीप डहाणूकर यांनी या प्रफुल्ला डहाणूकर यांच्या स्मृतीप्रित्यार्थ या संस्थेची स्थापना करण्यात आली. नवोदित कलाकारांना भारतीय कलाक्षेत्रातील मुख्य प्रवाहामध्ये आपल्या हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, त्यांच्या कलाकृतीमुळे समकालीन कला विश्वाचा पट लोकांना अनुभवता यावा यासाठी प्रफुल्ला डहाणूकर आर्ट फाउंडेशन कार्यरत आहे.