मुंबई (विशेष प्रतिनिधी) - सोलापूर रेल्वे स्थानकात घोरपडीच्या गुप्तांगाची विक्री करण्यासाठी आलेल्या शिकाऱ्यांना वन विभागाने रविवार दि. २ मार्च रोजी ताब्यात घेतले (monitor lizard trafficking). चौकशीअंती यापूर्वी या आरोपींनी जवळपास १ हजार घोरपडी मारल्याचे पुराव्यानिशी समोर आले आहे. (monitor lizard trafficking)
वन विभागाल रविवारी सोलापूर रेल्वे स्टेशनवर काही इसम घोरपडीचे गुप्तांग विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार सकाळपासून सोलापूर रेल्वे स्टेशनवर वनकर्मचाऱ्यांनी पाळत ठेवली. संशयित आरोपी एका चार चाकी गाडीमधून त्याठिकाणी घोरपडीचे गुप्तांग विक्रीसाठी घेऊन आले. त्यावेळी माहिती देणाऱ्या खबऱ्याने त्यांना ओळखले आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ त्याची माहिती दिली. वनकर्मचाऱ्यांनी आरोपींना पकडून त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे १५१ घोरपडीचे गुप्तांग सापडून आले. सदर गुन्हेगार सराईत असून त्यांच्याकडून असे यापूर्वीही झाले समजले.
या प्रकरण बीड जिल्ह्यात राहणारे विठ्ठल सुग्रीव पाटोळे, सुग्रीव रंगनाथ पाटोळे आणि बाळासाहेब लक्ष्मण डोरले यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ क्लेमेंट बेन, मुख्य वनसंरक्षक एन आर प्रवीण, उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक अजित शिंदे, वनक्षेत्रपाल रोहितकुमार गांगर्डे, वनपाल रुकेश कांबळे, इरफान काझी, शशिकांत सावंत, वनरक्षक श्रीशिल पाटील, आश्विनी सोनके, योगेश जगताप, सायली ठोंबरे, रमेश कुंभार, सुरेश कुरले, रेणुका सोनटक्के, अनिता शिंदे, नितीन चराटे, वाहन चालक कृष्णा निरवणे यांनी ही कारवाई केली.