ठाणे: ( holi in thane ) होळीनंतर धुळवडी दिवशी पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात केला जातो. उच्चभ्रू सोसायटीमध्ये तसेच काही राजकीय वरदहस्त लाभलेल्या वस्त्यांमध्ये रंगपंचमीसाठी पाण्याच्या टँकरची मागणी जोरात असते. पाण्याची धुळवड रोखण्यासाठी ठाणे महापालिकेने कडक पाऊले उचलली आहेत. यादिवशी टँकरद्वारे होणार्या पाणीपुरवठ्यावर बंदी घातली असून रंगपंचमीसाठी कुणीही टँकरवाल्याला बोलावू नये, असा फतवाच प्रशासनाने काढला आहे.
पाणी जपून वापरावे, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. होळीच्या धामधुमीचा फीवर आता चांगलाच तापला असून, गल्लीबोळात उत्सवाचा माहोल बघायला मिळत आहे. बच्चे कंपनी आतापासूनच धमाल करताना दिसून येत आहेत. होळीनंतर रंगपंचमीला तर सर्वत्र रंगांच्या उधळणीसह पाण्याचा वापर वारेमाप केला जातो. पाण्याच्या टाक्याच्या टाक्या रित्या केल्या जातात. ठाण्याच्या टंचाईग्रस्त भागात महापालिकेचे तीन आणि खासगी पाच टँकर अशा एकूण आठ टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा विनामूल्य केला जातो. यापूर्वी रंगपंचमीच्या दिवशी पाण्यासाठी टँकरची मागणी करण्यात येत होती. हीच गंभीर बाब लक्षात घेऊन यंदा रंगपंचमीला टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
नैसर्गिक रंग उधळा : डॉ. कैलास पवार
होलिकोत्सवात रंगांची उधळण करण्यासाठी बाजारात मिळणारे रंग आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. अॅल्युमिनियम, पारा, मोरचूद, जस्त, अॅसबेसटॉस, कथिल, क्रोमियम, कॅडमियम वगैरे धातूंपासून हे रंग बनवलेले असतात. अशा रंगामुळे डोळ्यांना इजा, त्वचा विकार, अथवा शरीरात गेल्यावर धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे पाने, फुले, माती आदी नैसर्गिक रंगांची होळी खेळा. तसेच, धुळवडी आधी अंगाला नारळ तेल, ऑलिव्ह तेल किंवा बदाम तेल लावावे. त्यामुळे संरक्षणात्मक कवच बनते. रंग खेळल्यानंतर कोमट पाण्याने आंघोळ करा आणि सौम्य साबण वापरा, असे आवाहन सिव्हील रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी केले आहे.
ठाणे महापालिकेकडून टँकरद्वारे होणार्या पाण्याचा रंगपंचमीच्या दिवशी अपव्यय होण्याची शक्यता लक्षात घेता शहरात टँकरद्वारे होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
- विनोद पवार (उपनगर अभियंता, ठामपा)