संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरी आयकर विभागाचा छापा!

    05-Feb-2025
Total Views |
 
Sanjeevraje Nimbalkar
 
सातारा : शरद पवार गटाचे नेते आणि संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरी आयकर विभागाने छापा टाकला आहे. संजीवराजे हे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू आहेत.
 
बुधवार, ५ फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजताच आयकर विभागाचे पथक संजीवराजे निंबाळकर यांच्या घरी दाखल झाले असून त्यांच्या घराची झाडाझडती सुरु आहे. यासोबतच रघुनाथराजे निंबाळकर यांच्या घरावरदेखील आयकर विभागाने छापा टाकला आहे. एकाचवेळी पुणे, मुंबई आणि फलटण येथील निवासस्थानी धाडी टाकण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.
 
हे वाचलंत का? -  एकनाथ खडसे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला! म्हणाले...
 
दरम्यान, संजीवराजे निंबाळकरांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली असून त्यांच्याकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. या धाडीचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी या घटनेवर कार्यकर्त्यांकडून तीव्र रोष व्यक्त करण्यात येत आहे.
 
संजीवराजे निंबाळकर हे आधी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. मात्र, विधानसभा निवडणूकीच्या आधी त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत येणार असल्याची माहिती आहे. परंतू, त्याआधीच त्यांच्या घरावर आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत. आयकर विभागाच्या पथकाकडून त्यांच्या घरातील कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे.