महाविकास आघाडी सत्तेत असताना मागे अंबानींच्या घराबाहेर विस्फोटके भरलेली कार उभी केली होती. त्याचबरोबर १०० कोटींचे टार्गेट वगैरे वगैरे हे सगळे काही लोकांना अजूनही स्मरणात आहे बरं. पण, आताच हे पुन्हा स्मृतिपटलावर येण्याचे कारण काय, तर नुकतेच देवेंद्र फडणवीस यांनी ‘उद्योजकांना त्रास होऊ नये, याची काळजी घ्या’ हा मंत्र प्रशासनाला दिला आहे. यावर काही लोकांचे म्हणणे असे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या या विधानामुळे अनेकांच्या पोटात गोळा आला. उद्योजकांना धमकावून १०० कोटी टार्गेट गाठणारे आता काय करणार?
कारण, त्यांचे पोटपाणी आणि मौजमजेसहित सगळा माज उद्योजकांना त्रास देण्यावरच अवलंबून आहे. कुणी एखादा उद्योग सुरू केला की, तत्काळ यांची पाळलेली माणसे तिथे पोहोचतात. “शहरातली परिस्थिती किती भयंकर आहे; येथे उद्योग करायचा तर जीवाची सुरक्षा असणे गरजेचे. ती सुरक्षा आम्ही देतो,” असे ती माणसे उद्योजकांना सांगतात. शहरात उद्योजक किती असुरक्षित आहेत, याचे प्रात्यक्षिकही माणसे घडवून आणतात. सुरक्षितपणे आपला उद्योग चालावा, म्हणून मग उद्योजक या लोकांना शरण येतात. जीवाच्या आणि उद्योगाच्या सुरक्षिततेसाठी उद्योजक या लोकांना लाखो-करोडोंचा खंडणीस्वरुप मलिदा देतात. उद्योजकांना इतर कुणापासूनही धोका नसतोच. पण, त्यांना खोटी भीती दाखवली जाते. पण, पुढे ऑक्टोपससारख्या या लोकांच्या मागण्या वाढत जातात. कंटाळून उद्योजक दुसर्या राज्यात उद्योग वसवण्याचा विचार करतो. उद्योजक दुसर्या राज्यात गेला की मग त्या उद्योजकांना त्रास देऊन पैसे उकळणारी गँग आणि त्यांचे बादशहा आरोळ्या ठोकतात- ‘मुंबईतले उद्योगधंदे दुसर्या राज्यात गेले. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणार,’ वगैरे वगैरे. या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्योजकांची आणि पर्यायाने उद्योगांची काळजी घेण्याचे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केल्यामुळे उद्योजकांना त्रास देणे म्हणजे आपला विनाश ओढवून घेणे, हे या खंडणीबहाद्दरांना कळून चुकले आहे. त्यामुळे उद्योजकांना त्रास देण्यापूर्वी ते हजार वेळा विचार करतील. परिणामस्वरुप, महाराष्ट्रात उद्योगधंदे भरभराटीला येतील आणि महाराष्ट्राचीही आणखीन आर्थिक भरभराट होईल. देवाचा निर्णय लय भारी!
राहुल यांची खासियत
सचिन पांचाल कर्नाटकमध्ये सरकारची छोटीमोठी कंत्राटी कामे करायचा. मात्र, धावत्या रेल्वेसमोर रूळावर जाऊन तो झोपला आणि त्याचे शरीर क्षत विक्षत झाले. त्याच्या देहाच्या चिंधड्या उडाल्या. इतक्या क्रूरपणे सचिनने स्वतःला का संपवले असेल? अशा प्रकारे आत्महत्या करण्याची वेळ त्याच्यावर का यावी? तर राजू कापानूर नावाच्या व्यक्तीने त्याचा छळ चालवला होता. त्याच्याकडे एक कोटींची खंडणी मागितली होती. म्हणून मग वैतागून आणि दहशतीमुळे सचिनने आत्महत्या केली.
कर्नाटक भाजपने याबद्दल म्हटले आहे की, “कलबुर्गीचे भाजप आमदार बसवराज मुत्तिमुद, भाजपचे दोन वरिष्ठ नेता आणि कर्नाटकमधील लिंगायत समाजाचे संत अशा चार-चारजणांना मारण्यासाठी राजू कापानूर यांने एका गुन्हेगाराला सुपारी दिली होती.” कोण हा राजू कापानूर? तर तो कर्नाटक सरकारमध्ये ग्रामीण विकास आणि पंचायती राज मंत्री प्रियांक खर्गे यांचा जानी दोस्त! प्रियांकच्या सांगण्यावरूनच राजू कापानूरने सचिनवर पैशांसाठी दडपण आणले, असेही म्हटले जाते.
कष्टाने कमावणार्या सचिन पांचालकडून खंडणी उकळू पाहणारा राजू आणि त्याचा दोस्त वजा मालक प्रियांक. प्रियांक कर्नाटकमध्ये देशाच्या कायदा-सुव्यवस्था आणि एकंदर संविधानविरोधी कामे करत आहे, असे दिसते. या प्रकरणाबद्दल प्रियांक म्हणतात, “राजू कापानूर हा माझा मित्र आहे. भाजपच्या राज्यातही असे खून होतात.” दुसरीकडे याच प्रियांकचे वडील मल्लिकार्जुन खर्गे अहोरात्र देशात ‘संविधान खतरे में हैं’, ‘देशात असिहष्णूता आहे’ अशी आवई उठवत असतात. काँग्रेसचे सर्वेसर्वा राहुल गांधी हे तर ‘मोहब्बतचे दुकान’ चालवत आहेत. पण, अजूनही ते सचिन पांचालच्या मृत्यूपश्चात त्यांच्या कुटुंबीयांना भेटायला गेलेले नाहीत. सचिन पांचाल काय माणूस नव्हते? काँग्रेस सरकारने सचिन पांचालच्या मृत्यूबद्दल मूग गिळण्याचे नाटक केले. कारण, कर्नाटकमध्ये काँग्रेसचे राज्य सरकार आहे. काँग्रेसच्या राज्यात अशा प्रकारे हकनाक लोक मरत असले, तरी ते राहुल त्या विरोधात ‘ब्र’ शब्द काढू शकत नाहीत. हीच तर राहुल गांधींच्या ‘मोहब्बतच्या दुकाना’ची आणि मल्लिकार्जुन यांच्या संविधानावरच्या खोट्या प्रेमाची खासियत आहे.
योगिता साळवी
९५९४९६९६३८