येसूवहिनी या कुणी सामान्य का होत्या? हा काळ आहे 1909च्या सुमाराचा. 1909 सालच्या जून महिन्यात गणेशपंत सावरकरांना काळेपाण्याची शिक्षा झाली नि लवकरच पुढे त्यांचे धाकटे बंधू ‘बाळ’ (डॉ. नारायण सावरकर) यांनाही अटक झाली. या दोन्ही बातम्या गणेशपंतांच्या पत्नी यशोदाबाई यांनी विनायकराव सावरकरांना विलायतेला कळविल्या. तेव्हा व्यथित झालेल्या आपल्या दुःखी वाहिनीला त्यांनी घाईघाईने हे उत्तर लिहून टाकले.
सांत्वन’ या शब्दामध्ये ‘सांत्वन’ हा शब्द आनुकूल्य दाखवतो. आता आनुकूल्य म्हणाल तर ते कसले? तर समोरच्या व्यक्तीला आणि त्याच्या अपरिहार्य अशा परिस्थितीला, आपल्या अनुकूल अशा शब्दांनी त्यांच्या दुःखांचे हरण झाले, असे वाटायला हवे. तुम्ही दुःखांवर फुंकर मारल्याने थोडा वेळ का होईना मनाला उभारी आली, असे त्या व्यक्तीस वाटायला हवे, नव्हे तर ते दुःखच आता नाहीसे झाले, असा आत्मविश्वास जागृत व्हायला हवा. आपणा सामान्यांच्या सांत्वनात अजून एक गोष्ट प्रामुख्याने आढळते ती म्हणजे, जी काही परिस्थिती उद्भवली, त्यामध्ये व्यक्तीचा दोष नसून, दैवाचा दोष आहे, हे मानून अनेकदा सांत्वनाचा शेवट हा दुर्दैवाने दैववाद स्वीकारण्यात होत असतो. अहो ते नशिबाचे खेळ, विधिलिखितच होते, तुमचा दोष नाही हो, ते तर व्हायचेच होते इत्यादी इत्यादी. तर वाचकहो, जितका मनुष्य खरा, जितका मनुष्य ज्ञानी, जितका मनुष्य डोळस, तितकंच त्याला त्याचे दोष प्रकर्षाने लक्षात येऊन आपले सांत्वन कुणी करू नये, अशी त्याची मनस्थिती होत असते. किंबहुना, सांत्वन करण्याची वेळ न येणे हा उत्क्रांतीचा टप्पाच म्हणावा का? शांतिपर्वात नारदासमोर आपल्या मनाची व्यथा सांगून श्रीकृष्ण नव्हते का रडले? मग त्या ज्ञानवृद्ध देवर्षींनी अतिशय मार्मिक शब्दांत यादवांच्या चुका सांगून, पर्यायाने कृष्णाची चूकही त्याच्या पदरी टाकून त्याचे सांत्वनच केले होते. तिथे दैववाद मात्र प्रखरतेने नव्हता. श्री दत्तात्रेयांनी परशुरामांचे आईवडील स्वर्गवासी झाल्यानंतर त्यांचे सांत्वन तर चक्क योगमार्गाने केले होते. चला तर मग हे तरी कळले की, सांत्वन हे नुसते गोड बोलणे आणि ‘आयायी गो’ म्हणण्यापुरते मर्यादित नाही, तर जितकी दिव्यता आपल्यात जास्त तितकी सांत्वनात दैवाची शहानिशा कमी आणि स्वदोषशोधन आणि शिकवणूक जास्त.
येसूवहिनी या कुणी सामान्य का होत्या? हा काल आहे 1909च्या सुमाराचा. 1909 सालच्या जून महिन्यात गणेशपंत सावरकरांना काळेपाण्याची शिक्षा झाली नि लवकरच पुढे त्यांचे धाकटे बंधू ‘बाळ’ (डॉ. नारायण सावरकर) यांनाही अटक झाली. या दोन्ही बातम्या गणेशपंतांच्या पत्नी यशोदाबाई यांनी विनायकराव सावरकरांना विलायतेला कळविल्या. तेव्हा व्यथित झालेल्या आपल्या दुःखी वाहिनीला त्यांनी घाईघाईने हे उत्तर लिहून टाकले.
-1-
जयासी तुवां प्रतिपाळिलें।
मातेचें स्मरण होवू न दिलें
श्रीमती वहिनी वत्सले।
बंधु तुझा जो तुज नमीं॥
आशीर्वादपत्र पावले।
जें लिहिलें तें ध्यानी आलें
मानस प्रमुदित झालें।
धन्यता वाटली उदंड॥
धन्य धन्य आपुला वंश।
सुनिश्चये ईश्वरी अंश
की रामसेवा-पुण्य-लेश।
आपुल्या भाग्यीं लाधला ॥
तात्यारावांची आई ही ते लहान असतानाच त्यांना पारखी झाली. मातेचे सुख त्यांना काही लाभले नाही. पण, ती उणीव भरून काढली त्यांच्या वहिनीने. येसूवहिनी म्हणजे, गणेशपंत सावरकर (त्यांचे मोठे बंधू) यांची पत्नी तात्यारावांना त्यांच्या आईच्याच स्थानी भासे. वयात जास्त अंतर नाही, पण मुक्ताई जशी ज्ञानेश्वरांना मातेप्रमाणे सावरून घेत असे, अगदी तशीच येसूवहिनी आणि बाबाराव हे सावरकरांना आईवडिलांचीच माया लावीत असत. त्यांना आई म्हणावे की बहीण मानावे, असा संभ्रम पावून, तात्याराव दोन्ही भाव इथे व्यक्त करून येसूवहिनींना आदराने नमन करीत आहेत. येसूवहिनींनी आधीच्या पत्रात जे कळवले होते ते गंभीर होते खरे. पण, त्यातला आशय तात्यारावांनी लागलीच जाणला आणि ते वाचून “आपणांस धन्यता वाटली” असे ते वहिनीला म्हणत आहेत. “काय वाचून? तर आपल्या धाकट्या भावाला आणि पितृतुल्य मोठ्या भावाला अटक झाली, हे ऐकून. धन्यता वाटली त्याचे कारण म्हणजे, दोघेही भाऊ हे राष्ट्राच्या कामी आले. शत्रू दारावर आलेला असताना पाय दाखवून पळाले नाहीत, तर आपला जो राष्ट्रीय कर्तव्याचा वाटा, तो तो उचलते झाले म्हणून! हे काय बंधू असतो जरी सात आम्ही, त्वस्थंडिलीच असते दिधले बळी मी. ‘हे माझे मृत्युपत्र’ कवितेत सावरकर जे प्रसिद्ध करतात तोच आशय इथेही व्यक्त होताना आपल्याला दिसतो. गणेशपंत सावरकर यांनी ‘मोर्ले मिंटो सुधारणा कायद्या’च्या विरुद्ध जो उठाव चालवला होता, त्यापायी त्यांना ‘काळे पाणी-अंदमान’ अशी शिक्षा झाली होती.
सामान्यांची धारणा ही स्व-शरीर म्हणजे, मी अशी झालेली असते. पण, योगी लोक मात्र ‘हे विश्वची माझे घर’ अशा बुद्धीने खरोखरीच वागत असतात. आपल्या हाताला काही झाले म्हणजे, आपल्याला लागलीच जसा त्याचा प्रत्यय येतो आणि आपले लक्ष जसे त्याकडे जाते, तसे सावरकर बंधूंचे लक्ष देशाच्या विविध भागांकडे जात असे. तिथे झालेली जखम, म्हणजे दंगे, अत्याचार, अन्याय यामुळे त्यांच्या हृदयात वेदनांचा डोंब उठत असे आणि त्यावर स्वस्थ न बसता लागलीच ते उपचार करीत असत. खरोखर आजच्या काळातले राष्ट्राचे विविध आजार दूर करणारे अश्विनी कुमारच त्यांना म्हटले पाहिजे आणि आपल्या वंशाच्या दिव्यतेची कल्पना तात्यारावांनाही कुठेतरी होतीच, म्हणून ते स्पष्ट म्हणतात, “धन्य धन्य आपुला वंश। सुनिश्चये ईश्वरी अंश॥ कशामुळे? तर रामसेवेचा लेशमात्र का होईना, लाभ आमच्या कुळाला लाभला.”
पुढे ‘माझे मृत्युपत्र’ कवितेत ते हेच पुन्हा बोलून दाखवतात की, ‘दिव्यार्थ देव। आमुचे कुल सज्ज आहे।’ याच कुळातल्या लक्ष्मीला म्हणजेच, बाबरावांच्या पत्नीस, आपल्या मातृतुल्य वाहिनीस ते पुढे मीमांसा देत आहेत,
-2-
अनेक फुलें फुलतीं।
फुलोनिया सुकोन जाती
कोणी त्यांची महती गणती।
ठेविली असे?॥
परी जें गर्जेंद्रशुंडेने उपटिले। श्रीहरीसाठी मेलें
कमलफूल तें अमर ठेलें।
मोक्षदातें पावन॥
त्या पुण्य गर्जेद्रासमची।
मुमुक्षु-स्थिती भारतीची
करुणारवें ती याची।
अदिंवरश्यामा श्रीरामा॥
स्वोद्यानी तिने यावें।
आपुल्या फुलास भुलावें
खुडोनिया अर्पण करावें। श्रीरामचरणां॥
धन्य धन्य आपुला वंश।
सुनिश्चयें ईश्वरी अंश
श्री-राम-सेवा-पुण्य-लेश। आपुल्या भाग्यीं लाधला॥
‘अनुपश्य यथा पूर्वे! प्रतिपश्य तथा परे!!’ कठोपनिषदात नचिकेत स्वतःच्या मनाचे सांत्वन करताना हेच नेमके शब्द वापरतो. की, “अरे पूर्वीच्या लोकांकडे पाहा आणि नंतरच्या लोकांकडेही पाहा : ‘सस्यमिव मर्त्य: पच्यते सस्यमिव जायते पुनः’ मर्त्य मनुष्य एखाद्या धान्याप्रमाणे मरतो आणि धान्याप्रमाणेच पुन्हा उत्पन्न होतो.” (अध्याय 1, वल्ली 1, श्लोक 6) त्यांची गणती कुणी ठेवली आहे? महापुरुषांचे विचार कसे साम्य दाखवतात, हे पाहण्यासारखे आहे. वयाच्या पाचव्या वर्षी उपनिषदे आवडीने वाचणारे तात्याराव. त्यांच्यामध्ये उपनिषदांचे सार कसे मुरले होते हे पाहा. सत्यनिष्ठ लोकांची प्रतिभा ही सहज प्रवाहित होतानाही जे आत खोलवर मुरले, आचरले गेले तेच प्रसवत असत्ये. तात्याराव म्हणतात, “अनेक फुले फुलतात आणि कालौघात सुकून जातात. त्यांची गणती कुणी ठेवत नाही. पण, जे फुल मोक्षाची इच्छा करून श्रीरामचरणी वाहिले जाते. त्या फुलाच्या आयुष्याचे मात्र सार्थक होते.”
गजेंद्र मोक्ष कथा जी भागवत पुराणात आठव्या स्कंधात आली आहे, त्यानुसार थोर विष्णुभक्त इंद्रद्युम्न नावाचा राजा काही कारणाने अगस्ती ऋषींकडून शापित झाला आणि पुढल्या जन्मात हस्तीन् गजेंद्र म्हणजेच हत्तीचा जन्म पावता झाला. पण, पूर्वजन्मीच्या संस्कारांमुळे तो त्या जन्मीही विष्णूची भक्ती स्मरून रोज एक कमळ ते त्यास अर्पण करीत असे. असाच एकदा बाजूच्या सरोवरात कमळ खुडण्यास गेला असता, एका मगरीने त्यास धरले. बाकीचे हत्ती मदतीस धावले. पण, मगरमिठी काही सुटेना. शेवटी अंगीचे त्राण संपले. अशा वेळी नेम चुकू नये म्हणून, त्या पुण्यवान गजेंद्राने त्या स्थितीतही, मृत्यूसमोर असताना आपल्या सोंडेत एक कमल धरलेच. त्याच्या भक्तीने प्रसन्न झालेले भगवान विष्णू तेथे येताच त्याने सोंड उंचावून ते कमळ त्यांना अर्पणही केले. श्री विष्णुंनी त्याला संकटमुक्त केले. जणू काही मोक्षच दिला एकाप्रकारे. म्हणून ते ‘कमल मोक्षद’ ठरले. मोक्ष देणारे ठरले. सावरकर स्वतःला आणि त्यांच्या बंधूंना त्या कमळाची उपमा देत आहेत. इथे संकटात सापडलेला हत्ती म्हणजे, जणू काही आपली पारतंत्र्यात पडलेली भारतमाता! तिने काकुळतीला येऊन शेवटी विष्णूला प्रसन्न करण्यासाठी जणू ही बंधुरुपी कमळे खुडली आणि श्रीरामांच्या चरणी वाहिली. तिची मोक्षाची इच्छा करणारी मनाची हळूवार स्थिती, ती मुमुक्षुता सावरकर वर्णितात. खरोखरच जणू स्वातंत्र्यदेवीनेच या कुळाची निवड केल्यासारखे आपल्याला दिसते.
लहानपणापासूनच अगदी जेवणावर बसलेले असतानाही सावरकर कुटुंबात चर्चा होत असत, त्याही तेजस्वी विभूतींच्याच! छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे, सवाई माधवराव, बप्पा रावळ ते अगदी श्रीकृष्ण, भीम अशा पुण्यपुरुषांच्या पराक्रमाच्याच गोष्टींनी त्यांचे घर भारून जात असे. नियतीसुद्धा त्यांच्यासाठी या बाबतीत अनुकूल झाली होती. लहानपणीच त्यांच्या लेखनकलेचे बक्षीस म्हणून की काय, तर ‘काळ’ या वृत्तपत्राचे वर्षभर मोफत अंक नियतीनेच त्यांना पुरवले. म्हणूनच रघुनाथराव परांजपेंसारख्या मुत्सद्दी आणि देशभक्तीपर लेखांचा तात्यारावांवर खोलवर परिणाम झाला. खरोखर अगदी लहान वयात त्यांचे विचार देशहिताच्या बाबतीत परिपक्व झाले होते. ते पुढे म्हणतात,
-3-
अशींच सर्व फुलें खुडावीं। श्रीरामचरणीं अर्पण व्हावी
काही सार्थकता घडावी।
ह्या नश्वर देहाची॥
अमर होय ती वंशलता।
निर्वंश जीचा देवाकरिता
दिगंती पसरे सुगंधता। लोकहितपरिमलाची॥
सुकुमार आमुच्या अनंत फुलां। गुंफोनि करा हो सुमन-माला
नवरात्रीच्या नवकाला।
मातृभूमी वत्सले॥
एकदा नवरात्र संपली।
नवमाला पूर्ण झाली
कुलदेवी प्रकटेल काली। विजयालक्ष्मी पावन॥
आमच्या कुळातील सारेच लोक या विजयादेवीला, या स्वातंत्र्यमातेच्या चरणी बळी पडावेत, अशी इच्छा ते करतात. मनुष्य देहाचे सार्थक त्या देहाचे चोचले पुरवून होत नाही, तर तो देह इतरांसाठी झिजविल्याने होत असते. इथे एक कथा अजून आठवते ती त्यांच्या लहानपणीची. ज्यावेळी प्लेग रोग नाशिकमध्ये पसरला, त्यावेळी तात्यारावांनाही त्याची लागण झाली होती. ते फक्त 13 वर्षांचे होते. त्यावेळी जेव्हा त्यांच्या मनात आपल्या मृत्यूची शंका आली, तेव्हाही आपल्या जन्माचे सार्थक ते काय, हा प्रश्न त्यांना पडला. त्यावेळी त्यांनी नुकताच एक ‘दुर्गादास विजय’ नावाचा ग्रंथ श्री दुर्गा देवीच्या स्तुतिपर रचला होता. आपला मृत्यू आता जर झालाच, तर आपल्या मरणोत्तर हा ग्रंथ प्रकाशित करावा, अशी सूचना त्यांनी आपल्या नातेवाईकांना देऊनही ठेवली होती. किती ती मनाची दिव्यता! खरोखर अशा पुरुषांना ‘देव पुरुष’ म्हणायचे नाही, तर काय म्हणायचे? आपण 13व्या वर्षी काय करीत होतो ते आठवले, तुलना केली म्हणजे हे जाणवतेच.
सावरकर महाकाली देवीची उपासना करीत असत. रोज आंघोळ झाली म्हणजे ते त्यांच्या अष्टभुजा देवीच्या मूर्तीसमोर बसून ध्यानस्थ होत असत. ही मूर्ती त्यांच्या कुळात तिच्या इच्छेने आलेली आहे, अशी एक आख्यायिका सांगितली जाते. आजही सावरकर गेल्यानंतर ती मूर्ती त्यांच्या कुळालाच मानवते. इतर ठिकाणी ती नेली असता तिचा कृतक् कोप अनुभवास येतो, अशी साक्ष अनेकांनी चालू काळात दिलेली आहे. लहानपणी सावरकरांना याच देवीचा साक्षात्कारही झालेला आहे. हे त्यांनीच त्यांच्या ‘माझ्या आठवणी’ या पुस्तकात नमूद केले आहे. ज्यांना हे पत्र त्यांनी लिहिले आहे, त्या येसूवहिनींनीसुद्धा आपल्या तात्यारावांच्या आठवणींमध्ये ही गोष्ट नमूद केली आहे. खरोखरच त्यांची समाधी लहानपणापासूनच लागत असे. येसूवहिनी एका ठिकाणी म्हणतात की, “खरोखरच लहान वयात त्यांच्या इतकी एकाग्रता मी कुणाची कधी बघितली नाही. खरोखरच ध्यानात खोल गेल्यानंतर त्यांना आजूबाजूचे काही कळत नसे. त्यांच्या तोंडी, मनात, चित्तात ती देवीच असे असेही दिसते. लहानपणी एका शंकराच्या मंदिरात जायच्या मार्गावर एका उंच शिळेवरून तात्याराव तोल जाऊन पडले. ते पडताना त्यांनी ‘भद्रकाली’ अशी आरोळी दिली आणि पडून बेशुद्ध पडले,” अशी घटना येसूवहिनींनीच घडल्याची ग्वाही दिलेली आहे. नंतर त्यांची बुद्धी जशी अजून परिपक्व झाली, तशी ते त्या देवीची सेवा आपल्या कर्मातून करू लागलेले आपल्याला दिसतात. पण, देवीवरची श्रद्धा मात्र त्यांची किंचितही कमी झाली नाही. उलट तिला बुद्धिनिष्ठता, विवेक आणि सश्रद्ध चिकित्सेचा आधार प्राप्त झाला. म्हणूनच 13व्या वर्षी जरी ही शपथ घेतली असली, तरी ती कशी बुद्धिनिष्ठच होती, ते बुद्धीला स्मरून घेतलेले सतीचे वाण कसे होते, हे सावरकर आयुष्याच्या उत्तरार्धातही सांगताना दिसतात.
‘माझे मृत्युपत्र’ या कवितेतून तीच वंशलता अमर ठरते. जिचा निर्वंश देवाकरिता होतो, असे उद्गार ते इथे काढत आहेत. ”आमच्या पुढील वंशाला, फुलांना या मालेत गुंफून हे देवी, तूच नवरात्रीच्या नवकाला हा नैवेद्य घे,” असे ते म्हणत आहेत. आणि याचा प्रत्ययही येताना दिसतो. आज सावरकर कुटुंबीय तरीही कुठल्याही हीन थराला न जाता, कायदेशीर आणि सुसंस्कृत पद्धतीने सावरकरांबद्दलच्या टीकांना उत्तरे देत आहेत. खरोखरच त्यांच्या वंशाची दिव्यता खचितच जाणवल्याशिवाय राहात नाही.
तात्याराव म्हणत की, अशाच एक दिवशी या आत्मसमर्पणाने प्रसन्न होऊन नवरात्र संपेल आणि स्वातंत्र्याची उषा आपल्याला अनुभवायला मिळेल. 1947 साली ती कुलदेवी प्रसन्न झाली. उषा आली, नवमाला पूर्ण झाली. पण, सावरकरांचा, त्यांच्या कुटुंबीयांचा बळी घेऊनच! आपले एक कुळ उद्ध्वस्त करून लाखो घरांमध्ये सोन्याचा धूर उद्या निघेल हे बंदी-बेडीत असताना आपल्या पत्नीस उद्देशून काढलेले तात्यारावांचे उद्गार आज शब्दशः खरे होताना दिसत आहेत.
दिगंती पसरे सुगंधता। लोकहितपरिमलाची!!
पण त्यासाठी लागेल ते धैर्य! आत्मबल! म्हणूनच.
-4-
तूं धैर्याची अससी मूर्ति।
माझे वहिनी, माझे स्फूर्ति
रामसेवाव्रताची पूर्ति।
ब्रीद तुझे आधीच॥
महत्कार्याचें कंकण धरिलें।
आता महत्तमत्व पाहिजे बाणलें
ऐसें वर्तन पाहिजे केलें।
की जें पसंत पडलें संतांना॥
अनेक पूर्वज ऋषीश्वर।
अजात वंशजांचे संभार
साधु साधु गर्जतील।
ऐसें वर्तणें ह्या काला॥
येसूवहिनी निश्चितच धैर्याची मूर्तीच होत्या, असे म्हणावे लागेल. अनेक ठिकाणी त्यांनी दाखविलेले प्रसंगावधान हे पाहिले की, प्रचलित काळात अशा साचेबद्ध समाजाच्या विरोधात अशी साहसी कर्मे करणार्या माहेरच्या सरस्वतीबाईंबद्दल आदर दुणावतो. 1905 साली त्यांनी स्वदेशी व्रत घेतले होते. साखर परदेशातून येते म्हणून साखर खाणे सोडून दिले होते. त्यांनी स्थापन केलेल्या ‘आत्मनिष्ठ युवती संघा’ने स्वदेशीचे व्रत गावोगावी पोहोचविले होते. कवी गोविंदांनी केलेल्या कविता असोत, किंवा तात्यारावांचे लेख असोत, ते त्या इतर युवतींना वाचून दाखवित आणि त्यांना कार्योद्युक्त करीत. सावरकरांना आणि बाबाराव सावरकरांना त्या कायम प्रेरणाच देत असत. दोन्ही बंधुंच्या या अटकेनंतरच येसूवहिनींना घर सोडून बाहेर पडावे लागले, सरकारने घरावर जप्ती आणली म्हणून. सरकारच्या भीतीने कुणी नातेवाईक त्यांना जवळ करीत नसे. अशा स्थितीतही त्या आपल्या पतीच्या व्रताचीच चिंता बाळगीत. त्या खरेच पतिव्रता होत्या. पतीच्या आणि दीराच्या अशा देशप्रेमामुळे आपला संसार सुखाचा झाला नाही, अशी तक्रार सबंध हयातीत त्यांच्या मनाला शिवलीसुद्धा नाही. आपल्या वहिनीस आणि आपल्या बायकोस सांभाळण्यास आपण तिथे नाही आणि आता दोन्ही भाऊही अटकेत पडले म्हणजे, कुणीच कर्ता पुरुष नाही, अशी स्थिती झालेली असताना आता नियतीवश त्यांच्या वाटेत अनेक संकटे येऊन पुढचा मार्ग दुष्करच राहणार आहे, हे तात्याराव जाणून होते. म्हणून, ते वहिनीस म्हणतात की, “महत् कार्याचे व्रत, महत् कार्याचे व्रत आपण घेतले ना? मग, आता महत्तमत्व बाळगलेच पाहिजे. असे वर्तन केले पाहिजे, जे संतांना पसंत आहे. संतांचा मार्ग हा द्वंद्व सहन करण्याचा असतो. तसेच तुम्ही वागले पाहिजे,” असे तात्याराव काळजीने सांगताना येथे दिसत आहेत.
आज असे वागावे, म्हणजे येणार्या कित्येक पिढ्या अजात वंशजांचे संभार आपली कर्मे जाणून साधू साधू म्हणत मान डोलवतील. आज हे खरे होताना दिसत आहे. येसूवहिनी श्रीरामांची उपासना करीत असत. ते या देशकार्याकडे रामसेवेच्याच दृष्टीनेच बघत. म्हणून ईश्वर प्रणिधान घडून असंख्य क्लेशातून मार्ग काढून त्या नित्य समाधानातच असत. तात्याराव आपल्या मातृतुल्य वहिनीचा हा आध्यात्मिक अधिकारही जाणून होते. किंबहुना, म्हणूनच हे असे निराळे सांत्वनपर पद्य त्यांनी रचले.
लहानपणी तात्यारावांनीच त्यांच्या वहिनीस अक्षरांचे धडे दिले होते. आज ही सांत्वन कविता त्यांना पाठविताना त्यांच्या मनाच्या भावना कशा झाल्या असतील? कवी गोविंदांच्या राष्ट्रभक्तीपर काव्यांच्या प्रति प्रकाशित व्हाव्या म्हणून आपले दागिने विकून पैसे उभे करणार्या येसूवहिनी! त्यांना सांत्वनाची का आवश्यकता होती? ज्यांच्या दोन्ही मुली लहानपणीच स्वर्गवासी झाल्या आणि ज्यांनी क्रांतिकार्यापुढे त्याची अजिबात तमा बाळगली नाही, त्या येसूवहिनींना संतांचे वर्तन शिकविण्याची आवश्यकता अजिबात नव्हतीच. पण, एक योगी मनुष्य जसा दुसर्या एखाद्या योगिनीस दिनक्रम सांगतो आणि योगचर्येची खूण सांगतो तद्वत् हा प्रकार वाटतो. अहो बोलणार तरी काय, अप्रूप काय ते तुम्हां आम्हां वाचकांना, आपल्यासारख्या अभ्यासकांना. वाचकहो, सावरकर कुटुंब खरेच ईश्वरांश म्हणावे लागते. अजून काय लिहू? समस्त सावरकर कुटुंबीयांना मनापासून वंदन करून लेख संपवतो.
इत्यलम्।
आदित्य शेंडे