प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ‘पद्म’ पुरस्कारांची घोषणा झाली. विविध क्षेत्रांत आपले अमूल्य योगदान देऊन देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणार्या अनेक दिग्गजांचा, दरवर्षी ‘पद्म’ पुरस्काराने सन्मान केला जातो. कला आणि साहित्य या क्षेत्रांत मोलाची कामगिरी करून, यावर्षी ‘पद्मविभूषण’ पुरस्काराला गवसणी घालणार्या या चार दिग्गजांचा हा अल्पपरिचय..
कुमुदिनी लाखिया
भारतातील एक प्रसिद्ध नृत्यांगना आणि नृत्यदिग्दर्शिका म्हणून नावारुपाला आलेल्या, कुमुदिनी लाखिया या मूळच्या गुजरातमधील. त्यांची आई शास्त्रीय गायक. कुमुदिनी यांनी नृत्य शिकावे, अशी त्यांच्या आईची इच्छा होती. आईच्या पाठिंब्यामुळे आणि मार्गदर्शनामुळे, कुमुदिनी नृत्याकडे वळल्या. “कुठलीही आत्मसात केलेली कला, आयुष्यभर माणसाचा मित्र होऊन सोबत राहते,” असा मंत्र, त्यांच्या आईने त्यांना लहानपणी दिला होता. आईचा पाठिंबा आणि मार्गदर्शनामुळेच, कुमुदिनी नृत्याकडे वळल्या. वयाच्या अवघ्या सहाव्या-सातव्या वर्षी त्यांची पाऊले, संगीताच्या तालावर फेर धरू लागली. जानकी प्रसाद घराण्याचे कथ्थक शिक्षक आशिक हुसेन आणि जयपूर घराण्याचे शिक्षक राधेलाल मिश्र, यांसारख्या दिग्गज गुरूंकडे त्यांच्या आईने त्यांना नृत्याची शिकवणी लावली. वयाच्या १७व्या वर्षी ‘कृषिविज्ञान’ विषयात पदवी प्राप्त केल्यानंतर, वडिलांच्या सांगण्यावरून त्यांनी जे. जे. कॉलेज ऑफ आर्ट्समधून स्थापत्यशास्त्राचे शिक्षण घेतले. मात्र, त्यांची नृत्यसाधना सुरूच होती. या क्षेत्रात त्यांच्या प्रवासाला खरी सुरुवात झाली, ती लंडनमधील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रसिद्ध नर्तक राम गोपाल यांच्यामुळे. राम गोपाल हे एकदा त्यांच्या मुंबई दौर्यावर आलेले असताना, त्यांनी कुमुदिनी यांना त्यांच्या संस्थेत सामील होण्यासाठी आमंत्रण दिले. राम गोपाल यांच्या संस्थेशी जोडले गेल्यानंतर, कुमुदिनी यांना त्यांच्या समवेत लंडन आणि युरोपातील इतर मोठ्या शहरांमध्ये, नृत्य सादर करण्याची संधी मिळाली. राम गोपाल यांच्या सहवासात कुमुदिनी यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील नृत्य, रंगमंच सादरीकरण, नृत्यासाठी आवश्यक असणारी प्रकाशयोजना, समूह नृत्यासाठी आवश्यक गोष्टी आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, या सगळ्यासाठी एक कलाकार म्हणून लागणारी शिस्त या गोष्टी शिकता आल्या. याच शिस्तीचे एक कलाकार म्हणून त्यांनी, आयुष्यभर पालन केले आणि एक प्रतिभावंत नृत्यांगना म्हणून त्यांची किर्ती सर्वत्र पसरली. देशातील अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये त्यांनी, नृत्यसादरीकरण आणि नृत्यदिग्दर्शन केले आहे. ‘उमराव जान’सारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांसाठीही त्यांनी नृत्यदिग्दर्शन केले आहे. पारंपरिक शास्त्रीय नृत्याला आधुनिक रुप देऊन, त्यांनी त्यांची नृत्यकला लोकांपर्यंत पोहोचवली. “कथ्थक या नृत्यप्रकाराला, कायम कशा अन् कशाशीतरी बांधून ठेवण्यात आले. हा नृत्यप्रकार कायम मर्यादित ठेवण्यात आला. त्यामुळे या प्रकारातील स्वायत्तता आणि सौंदर्य मर्यादित राहिले,” असे कुमुदिनी यांचे मत आहे. “या नृत्यप्रकाराला मान आणि सन्मान मिळवून देणे, हे माझ्यापुढील एक मोठे आव्हान म्हणून स्वीकारले होते,” असे त्यांनी, एका मुलाखतीत म्हटले आहे. १९६७ साली कुमुदिनी यांनी, ‘कदंब स्कूल ऑफ डान्स अॅण्ड म्युझिक’ची स्थापना केली. आज भारतीय शास्त्रीय नृत्यक्षेत्रात नाव कमावणारे, अनेक शिष्य त्यांनी घडवले आहेत. कुमुदिनी यांच्या याच योगदानासाठी त्यांना, १९८७ मध्ये ‘पद्मश्री’, २०१० मध्ये ‘पद्मभूषण’ आणि यावर्षी ‘पद्मविभूषण’ सन्मान प्रदान करण्यात आला.
शारदा सिन्हा
‘छठपूजा’ हा उत्तर भारतातील एक अतिशय महत्त्वाचा सण. हा सण ज्यांच्या गाण्यांशिवाय साजराच केला जात नाही, त्या गायिका म्हणजे शारदा सिन्हा होय. संपूर्ण देशावर आणि खास करून, उत्तर भारतावर त्यांनी आपल्या आवाजाने जादू केली. ‘बिहार कोकिळा’ म्हणून त्यांची ख्याती होती. शारदा सिन्हा यांचा जन्म बिहारमधलाच. लहानपणापासूनच त्यांना गायनाची खूप आवड होती. शास्त्रीय संगीतात त्यांनी ‘पीएच. डी.’सुद्धा मिळवली होती. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात, मैथिली आणि भोजपुरी भाषेतील लोकगीते गाऊन केली. त्यांच्या आवाजाने, अल्पावधीतच त्यांनी लोकाचीे मने जिंकून घेतली. त्यांच्या कोकिळेसारख्या आवाजामुळेच, त्यांना ‘बिहार कोकिळा’ ही उपाधी देण्यात आली. पाश्चात्य गीतांचा प्रभाव वाढत असतानाही, त्यांची पारंपरिक गीते लोकांच्या मनात घर करून होती. परंपरा आणि संस्कृतीचे दर्शन, शारदा त्यांच्या लोकगीतांमधून घडवत होत्या. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये शारदा यांनी, त्यांची लोकगीते सादर केली होती. त्या मैथिली, भोजपुरी आणि मगधी भाषेत तर गाणी गातच होत्या, पण काही हिंदी सिनेमांनाही त्यांनी आपला आवाज दिला आहे. १९८९ साली प्रदर्शित झालेला ‘मैने प्यार किया’, ‘हम आपके है कौन’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटाला, त्यांनी आवाज दिला आहे. त्यांची खास ओळख ठरली ती त्यांनी गायलेली ‘छठगीते’. छठपूजेच्या दिवशी देशातल्या अनेक ठिकाणी जी गाणी लावली जातात, त्यामधील बहुतांश गाणी शारदा सिन्हा यांनी गायलेली आहेत. छठपूजा आणि शारदा सिन्हा हे एक समीकरणच झाले होते. त्यांच्या गाण्यांची दखल अनेक मोठ्मोठ्या माध्यमांनी घेतलेली आहे. त्यांच्या गायनाचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुकही झाले. अनेक मानाच्या पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते. २००० मध्ये, ‘संगीत नाटक अकादमी’चा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला होता. १९९१ मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ आणि २०१८ मध्ये ‘पद्मभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. आपल्या आयुष्याची अनेक वर्ष त्यांनी, संगीत क्षेत्राची सेवा करण्यासाठी घालवली. पण, दुर्दैवाने २०१७ पासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या. दि. ५ नोव्हेंबर २०२४ रोजी, त्यांची ही झुंज अयशस्वी ठरली आणि त्यांचे निधन झाले. शरीराने जरी त्यांनी या जगाचा निरोप घेतलेला असला, तरी त्यांच्या आवाजाच्या माध्यमातून त्या रसिकांच्या मनात अजरामर आहेत. छठपूजेच्या सणाला तर दरवर्षी त्यांची आठवण आवर्जून काढली जाईल. त्यांच्या याच कार्याची दखल म्हणून, यावर्षी त्यांना मरणोत्तर ‘पद्मविभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम
जगप्रसिद्ध व्हायोलिन वादकांच्या यादीत स्थान मिळविणारे भारतीय नाव म्हणजे, वादक लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम उर्फ एल. सुब्रमण्यम. एल. सुब्रमण्यम यांचा जन्म १९४७ साली मद्रासमध्ये झाला. त्यांचे आई आणि वडील दोघेही संगीतकार होते. घरातूनच संगीताचा वारसा मिळाल्यामुळे, त्यांची संगीतसाधना लहानपणीच सुरू झाली. त्यांच्या वडिलांकडून ते व्हायोलिन वाजवायला शिकले होते. वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम यांनी, सामूहिक कार्यक्रमात व्हायोलिन सादरीकरण केले. कर्नाटक संगीतशैली आणि पाश्चिमात्य शास्त्रीय संगीत शैलीवर त्यांचे प्रभुत्व आहे. ‘एमबीबीएस’चे शिक्षण घेतलेल्या लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम यांनी, कमी वयातच संगीत क्षेत्रात आपला ठसा उमटवला. त्यांच्या नावावर २०० हून अधिक रेकॉर्डस प्रसिद्ध झाल्या आहेत. परंपरा आणि आधुनिकतेचा मेळ साधत सुब्रमण्यम यांनी, संगीत क्षेत्रात अनेक प्रयोग केले. त्यामुळे देशभरात, तर त्यांच्या व्हायोलिनवादनाची चर्चा झालीच, पण आंतरराष्ट्रीय स्तरावरही ते नावाजले गेले. अनेक भारतीय चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. भारतीय चित्रपटांसोबत ‘मिसिसिपी मसाला’, ‘लिटिल बुद्धा’ आणि मर्चंटच्या ‘कॉटन मेरी’सारख्या, अनेक पाश्चिमात्य चित्रपटांनाही त्यांनी संगीत दिले आहे. येहुदी मेन्यूइन, अल जारेउ, जॉर्ज ड्यूक, टोनी विल्यम्स, स्टेफॉन ग्रॅफेली, सोलो सिसोखो, मार्क ‘ओ’कॉनर, लोयको, जीन-ल्यूक पोंटी यांसारख्या, अनेक जगप्रसिद्ध संगीतकारांसोबत त्यांनी काम केले आहे. ”लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम यांच्या व्हायोलिनवादनाचा मी चाहता आहे. त्यांच्या वादनातून मला कायमच स्फूर्ती मिळत आली आहे”, असे प्रसिद्ध संगीतकार येहुदी मेन्यूइन याने, त्यांच्याविषयी बोलताना सांगितले आहे. भारतापासून सुरू झालेली त्यांच्या व्हायोलिनवादनाची किर्ती, जगभरात पोहोचलेली आहे. संगीतावर आधारित ‘राग हार्मनी’, ‘क्लासिकल म्युझिक अँड इंडिया’ आणि ‘यूफनी’ यांसारखी काही पुस्तकेही त्यांनी लिहिली आहेत. संगीत सादरीकरणासाठी त्यांनी जगभरात अनेक दौरे केले. ‘लक्ष्मीनारायण जागतिक संगीत महोत्सव’ हा त्यांच्या स्वतःच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या आणि त्यांनीच दिग्दर्शित केलेल्या महोत्सवाचे, त्यांनी भारतासह अनेक देशांमध्ये सादरीकरण केले. २००७ मध्ये त्यांनी त्यांच्या पत्नीसह मिळून, संगीत शिकू इच्छिणार्यांसाठी ‘सुब्रमण्यम अकादमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स’ या संस्थेची सुरुवात केली. सुब्रमण्यम यांना त्यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानासाठी, अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. १९९८ मध्ये त्यांना ‘पद्मश्री’, २००१ मध्ये ‘पद्मभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. वयाच्या ७७व्या वर्षीही संगीताविषयीचे त्यांचे प्रेम आणि संगीत विविध प्रकारे लोकांपर्यंत पोहोचवण्याचे त्यांचे प्रयत्न, कमी झालेले नाहीत. यासाठीच यावर्षी ‘पद्मविभूषण’ पुरस्कार देऊन, त्यांचा सन्मान करण्यात आला.
एम. टी. वासुदेवन नायर
मल्याळी साहित्यातील एक नाव म्हणजे एम. टी. वासुदेवन नायर. ज्ञानपीठ आणि साहित्य अकादमी यांसारख्या साहित्य क्षेत्रातील मानाच्या पुरस्कारांवर, त्यांनी आपल्या नावाची मोहोर उमटवली आहे. वासुदेवन नायर यांचा जन्म केरळमधील कुटल्लुर गावात झाला. विद्यार्थी दशेत असतानाच नायर यांनी, त्यांच्या लिखाणाला सुरुवात केली होती. ‘वळस्तु मृगगळ’ या नायर यांनी, विद्यार्थी दशेत लिहिलेल्या कथेला विश्वलघुकथा स्पर्धेत, सर्वश्रेष्ठ लघुकथेसाठीचा पुरस्कार मिळाला होता. इथूनच त्यांच्या साहित्यिक म्हणून प्रवासाला सुरुवात झाली. ‘रक्तम पुरण्टा मणतरीकळ’ हा त्यांचा पहिला कथासंग्रहसुद्धा त्यांनी, विद्यार्थी दशेत असतानाच लिहिला होता. वयाच्या अवघ्या २३व्या वर्षी त्यांनी, ‘नालुकेट्टू’ ही पहिली कादंबरी लिहिली. या कादंबरीत, केरळमधील नायर समुदायातील मातृसत्ताक समाजव्यवस्थेचे चित्रण त्यांनी केले आहे. अपमान, आक्रोश आणि सूडभावना याचे सजीव चित्रणकरून ग्रामीण भागातील तरुण पिढीचे मनोविश्व त्यांनी, या कादंबरीमध्ये रेखाटले आहे. त्यामुळे त्यांची ‘नालुकेट्टू’ ही कादंबरी केवळ लोकप्रियच झाली नाही, तर त्या कादंबरीला ‘केरळ साहित्य अकादमी पुरस्कार’ प्राप्त झाला. ‘असुरवित्तु’ ही त्यांनी लिहिलेली दुसरी कादंबरी. या कादंबरीमध्ये त्यांनी, स्वतःसोबत इतरांनाही उद्ध्वस्त करणार्या नायकाचे चित्रण केले आहे. स्त्री किंवा पुरुषांमध्ये असलेली एकाकीपणाची भावना मांडणारी, ‘मंजू’ ही कादंबरी त्यांनी लिहिली. त्यांनंतर महाभारताचा आधार घेऊन, पौराणिक पात्रांना एका वेगळ्या रुपात आणणारी ‘रंटामषम’ ही कादंबरीही त्यांनी लिहिली. त्यांनी लिहिलेल्या ‘कालम’ या कादंबरीसाठी नायर यांना, १९७० साली साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. कादंबरीसोबतच ‘गोपुरनटयिल’सारखे नाटक आणि निर्माल्यम्, पेरूम्तच्चन, ओरुवट्कन वीरगाथा व वैशाली यांसारख्या चित्रपटांच्या पटकथाही, त्यांनी लिहिल्या आहेत. सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी त्यांना, चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. एम. टी. वासुदेवन नायर यांनी बैक्कम मोहम्मद बशीर व आपले वरिष्ठ साहित्यिक कोविलम, उरुब आणि एस. के. पोट्टेकाट यांच्यासारख्या साहित्यिकांकडून, लिखाणाची प्रेरणा घेतली. नायर ज्या काळात लिहित होते, त्याकाळात आधुनिकतावादी लिखाण करणार्या साहित्यिकांची संख्या फार कमी होती. एम. टी. वासुदेवन नायर यांनी मल्याळी साहित्याला एक वेगळे वळण दिले. ते एक साहित्यिक तर होतेच, पेशाने शिक्षकसुद्धा होते.
आयुष्याचा काळ त्यांनी शिक्षक म्हणूनच व्यतीत केला. अनेक राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कारांना गवसणी घालणार्या नायर यांचे दि. २५ नोव्हेंबर २०२४ रोजी, वयाच्या ९१व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी, त्यांना यावर्षी मरणोत्तर ‘पद्मविभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
दिपाली कानसे