बालवयापासून वृद्धत्वापर्यंत छायाचित्रणाचा छंद जिद्दीने जोपासलेल्या अँजेलो डिसिल्व्हा या पंचाहत्तरीतील अवलियाची प्रेरणादायी गोष्ट..
मूळचे कोकणातील सावंतवाडी येथील अँजेलो डिसिल्वा यांचा जन्म, १९५१ साली वर्धा जिल्ह्यात झाला. सावंतवाडीत डिसिल्वा यांचा मोठा वाडा होता. वडील रेल्वेत लागल्याने, त्यांची पहिली अपॉईटमेंट नागपूरला झाली आणि संपूर्ण डिसिल्वा कुटुंब वर्ध्याला स्थलांतरित झाले. वर्ध्यातच अँजेलो यांचे शालेय शिक्षण झाले. पुढील शिक्षणासाठी ते मुंबईत आले आणि जेमतेम अकरावी पूर्ण केली. अँजेलोनंतर ठाण्यात स्थायिक झाले आणि उपजीविकेचे साधन म्हणून, सुरुवातीला त्यांनी एका खासगी कंपनीत नोकरी केली. यानंतर ते १९७० साली आयकर विभागात कामावर रुजू झाले. अँजेलो यांना बालपणापासून छायाचित्रणाची गोडी होती. वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी वर्धा आर्ट गॅलरीत, वडिलांसोबत एक ग्रुप फोटो काढला होता. या दिवसापासूनच त्यांची छायाचित्रणाशी नाळ जोडली गेली. तेव्हा छायाचित्रकाराने ते फोटो हे धुण्याची प्रक्रिया पाहूनच,अँजेलो यांना फोटोग्राफीची ओढ निर्माण झाली. पुढे नोकरीच्या व्यापात हा छंद तसा दुर्लक्षित राहिल्याचे ते सांगतात.
अँजेलो त्यांच्या बंधुंच्या मेहुण्याकडील महागडा कॅमेरा पाहून हरखून गेले. त्यांनी कॅमेरा बघायला मागितला तेव्हा, कुणीही त्यांना हातही लावू दिला नाही. इथेच मनाचा हिय्या करून अँजेलो ठाण्यात परतले. जानेवारी १९७९ साली मुलगी सरीनाला पहिल्यांदा बघण्यासाठी सावंतवाडीला जात असताना, बसमध्ये मोठ्या भावाने अँजेलो यांना भेट म्हणून कॅमेरा हाती दिला आणि हा दिवस त्यांच्यासाठी ‘सोनियाचा दिनु’ ठरला. एकीकडे मुलगी झाल्याचा आनंद, तर दुसरीकडे लहानपणापासून हवा असलेला कॅमेरा प्रत्यक्षात मिळाल्याने, ते खुश झाले. याच कॅमेर्यासोबत त्यांच्या छायाचित्रणाच्या प्रवासाचा श्रीगणेशा झाला.
छायाचित्रण हा एक कलात्मक आविष्कार आहे. छायाचित्रण शिकवण्यासाठी अनेकांनी दिलेल्या नकारघंटेमुळे, त्यांनी स्वतःच शिकण्याचा निर्णय घेतला. पुस्तकांनाच गुरू मानत, छायाचित्रणाची अनेक पुस्तके त्यांनी विकत घेतली. पुस्तकात लिहिलेल्या माहितीवर केवळ विसंबून न राहता, ते प्रत्यक्ष सराव करू लागले. यातून त्यांच्यावर छायाचित्रणाचे संस्कार झाले आणि त्यांच्या फोटोग्राफीला एक वळण लागले. शिवाय उंचीदेखील प्राप्त झाली. पुढे पुस्तकी अभ्यासातून, निगेटीव्हवरुन फोटो डेव्हलप कसे करायचे? याचे शिक्षणही त्यांनी पुस्तकी अभ्यासातूनच मिळवले होते. पुढे या प्रक्रियेत स्वतःचा फॉर्म्युला तयार करून, फोटोंमधला कॉन्ट्रास्ट, त्यातले रंग अधिक कसे खुलवता येतील, याचे तंत्र त्यांनी अवगत केले.
डिसिल्वा यांनी ‘रेंज फाइंडर मॅन्युअल’ कॅमेर्यापासून सुरुवात केली. मात्र, पुढे ‘आरबी ६७’, ‘सिनार’ अशा मोठ्या कॅमेर्यांपासून आता ‘५ डी’ कॅमेर्यांपर्यंत, त्यांचा प्रवास वेगाने झाला. इन्कम टॅक्स ऑफिसमधल्या नोकरीनिमित्ताने, त्यांच्या अनेकांशी ओळखी झाल्या आणि त्यातून त्यांना छायाचित्रणाची कामेही मिळत गेली. हौशी छायाचित्रकार म्हणून त्यांनी, आपल्या छंदाची भूक यातून भागवली होती. पण, व्यवसाय म्हणून त्यांना यातून काहीच साध्य करता आले नव्हते, ही सल त्यांच्या मनात तेव्हा कायम होती.
पुढे, छायाचित्रणातच पुढे उदरनिर्वाह करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. त्यासाठी, १९९० साली त्यांनी सरकारी नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. यानंतर त्यांच्या व्यावसायिक छायाचित्रणाला खर्या अर्थाने सुरुवात झाली आणि या प्रवासादरम्यानची फोटोग्राफी, टेबल टॉप अशा कामातून त्यांनी सुरुवात केली. पुढे अनेक खासगी एजन्सींना त्यांनी, छायाचित्र पुरवण्यास सुरुवात केली. तसेच त्यांनी अनेक बड्या कंपन्यांसाठी छायाचित्रणाची सेवा देण्यास सुरुवात केली. याच काळात कोकण रेल्वे प्रकल्पाची फोटोग्राफी तसेच अनेक खाणींमध्ये जाऊनही त्यांनी, व्यावसायिक फोटोग्राफी केली. ‘नोसील’ कंपनीच्या तब्बल ५२१ स्टाफचा काढलेला अखंड ग्रुप फोटो, हा त्यांच्या आयुष्यातला एक अविस्मरणीय क्षण असल्याचे ते सांगतात. फोटोग्राफीचा चालता बोलता एन्साक्लोपीडिया असलेल्या अँजेलो डिसिल्व्हा यांनी, गेली अनेक दशके विविध पद्धतीची फोटोग्राफी करीत आपले कर्तृत्व सर्वार्थाने सिद्ध केले. नव्वदीच्या दशकात चिखल दगडधोंडे तुडवत, कोकण रेल्वेच्या खोदकामाचे दुर्मीळ फोटो त्यांनी काढले. विविध मासिके, नियतकालिकांसाठी फोटो, फुड फोटोग्राफी, इंडस्ट्रीयल फोटोग्राफी, प्रॉडक्ट फोटोग्राफी, मॉडेल फोटोग्राफी केली. मात्र, सवंग ग्लॅमरकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याचे ते सांगतात. छायाचित्रणात सर्वार्थाने जेष्ठ असलेल्या अँजेलो यांना, ठाणे महापालिकेने ‘ठाणे गुणीजन’ पुरस्कार देऊन गौरवले.
अँजेलो डिसिल्व्हा यांना या क्षेत्रातील सर्वच आदराने, ‘डिसिल्वा अंकल’ म्हणतात. डिसिल्वा अंकल अगदी नवशिक्या छायाचित्रकारालाही, त्याच आत्मीयतेने आणि तळमळीने छायाचित्रणाचे धडे देतात. फोटोग्राफीची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी, अनेकदा ज्येष्ठ छायाचित्रकारही त्यांच्या घरी मांड ठोकतात. फोटो सर्कल सोसायटीसह जवळजवळ अनेक दिग्गज फोटोग्राफरना अँजेलो यांनी शिकवले दिले. हजारो रुपयांचे फोटोग्राफीचे साहित्य त्यांनी खरेदी करून, इतरांनाही मोफत भेट दिली. त्यांच्याकडे असलेली ऊर्जा, कामासाठीची धडपड आणि छायाचित्रकारांना घडवण्याची जिद्द थक्क करणारी आहे. आता तंत्रज्ञान बदलले आहे, तरी समाधानी न राहता नव्याच्या शोधात राहून कलेची उपासना करा, असा उपदेश ते नवीन पिढीला देतात. अशा या छायाचित्रणाचा चालता-बोलता ज्ञानकोष असलेल्या, छायाचित्रणातील ‘पितामह’ अवलियाला दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या मनःपूर्वक शुभेच्छा!