मुल्लाच्या मदतीला मुल्ला!

    24-Jan-2025
Total Views |
Farooq Abdullah

सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी नागरिक असून तो भारतात बेकायदा घुसला आहे. इतकेच नव्हे, तर त्याने एका भारतीय नागरिकावर जीवघेणा हल्ला केला. अशा व्यक्तीवर टीका करायची की त्याची बाजू घ्यायची? पण, फारूख अब्दुल्ला यांना त्या बांगलादेशी व्यक्तीबद्दल प्रेमाचे भरते आले. कारण, बांगलादेश हा सत्तांतरानंतर आता पाकिस्तानच्या मार्गावर आहे. तेथील हिंदूंची सर्रास कत्तल झाली. असंख्य मंदिरे पाडली गेली. त्याबद्दल अब्दुल्ला यांनी कधी टीकेचा चकार शब्द काढल्याचे दिसले नाही. यावरून त्यांची कट्टरवादी मानसिकताच स्पष्ट होते.

जम्मू व काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगवेगळे आहेत, हे आजवर अनेकदा दिसून आले आहे. आता पुन्हा त्यांनी आपला खरा रंग दाखविला. अभिनेता सैफ अली खानवर नुकताच जीवघेणा हल्ला झाला. त्या घटनेस जबाबदार असलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, हा आरोपी बांगलादेशी असल्याचे उघड झाले आहे. पण, या हल्लेखोराचा उल्लेख माध्यमांमध्ये ‘बांगलादेशी’ म्हणून केला जात असल्याचा अब्दुल्ला यांना राग आला. “एका व्यक्तीच्या कृत्याबद्दल संपूर्ण देशाला बदनाम करण्याचे काय कारण,” असा अजब प्रश्न त्यांनी विचारला. त्यातून अब्दुल्ला यांचा कट्टरवादी सूर यातून स्पष्ट दिसतो.

मुळात त्या हल्लेखोराला ‘बांगलादेशी’ म्हटल्याने संपूर्ण बांगलादेशाचा कसा अपमान होतो, हे अब्दुल्ला यांनी स्पष्ट केले पाहिजे. भारतात गुन्हा करणारी एखादी व्यक्ती जर परदेशी नागरिक असेल, तर तिचा उल्लेख त्या देशाच्या नावानेच केला जाईल, ही साधी बाब आहे. हा हल्लेखोर बांगलादेशाचा नागरिक आहे, म्हणून त्याला ‘बांगलादेशी’ म्हटले जाते. त्यात वावगे काय आहे? मुंबईवर हल्ला करणारा अजमल कसाब हा पाकिस्तानी होता. त्याला ‘पाकिस्तानी’ म्हणूनच संबोधले गेले. त्यात चुकीचे काये? पण, ‘मुल्ला’ अब्दुल्ला यांना आता इस्लामी उम्माची (मुस्लीम बंधुत्व) उबळ आलेली दिसते.

बांगलादेशात सत्तांतर झाल्यापासून तो देश पाकिस्तानच्या मार्गाने जात आहे. पूर्वी तो पाकिस्तानचाच एक भाग होता. अब्दुल्ला यांचे पाकिस्तानप्रेम तर जगजाहीर. त्यामुळे त्या देशाशी संबंध असलेल्या व्यक्तीबद्दल अब्दुल्ला यांना ममत्व वाटल्यास नवल नाहीच. एक तर हा बांगलादेशी भारतात बेकायदा घुसला असून त्यानंतर तो समाजविरोधी कृत्यातही गुंतला आहे. त्याने एका भारतीय नागरिकावर जीवघेणा हल्ला केला आहे, याबद्दल त्याच्यावर टीका करायची की त्याची बाजू घ्यायची? बांगलादेशाला स्वतंत्र राष्ट्र बनविण्यात भारताचाच सिंहाचा वाटा आहे. पण, त्याबद्दल कृतज्ञता बाळगण्याऐवजी त्या देशाने आता भारतविरोधी भूमिका घेतली आहे. गतवर्षी त्या देशात झालेल्या सत्तांतरानंतर तेथील सत्तेवर इस्लामी कट्टरवादी प्रवृत्तींनी कब्जा केला आहे. या प्रवृत्ती आपल्याच देशाचे संस्थापक शेख मुजिबुर रहमान यांचाच अपमान करीत आहेत, तिथे त्या भारताबद्दल कसली कृतज्ञता बाळगणार! उलट या प्रवृत्तींनी बांगलादेशातील हिंदूंवर हिंसक हल्ले केले असून शेकडो हिंदूंची हत्या केली आहे. हजारो मंदिरे पाडली असून, हिंदू महिलांची बेअब्रू केली आहे. त्याबद्दल अब्दुल्ला यांनी आजवर टीकेचा एक शब्दही काढलेला नाही.

यापूर्वी अब्दुल्ला यांनी काश्मीरमध्ये पाकिस्तान पाठवीत असलेल्या घुसखोरांविरोधात कधी शब्द उच्चारल्याचे ऐकिवात नाही. किंबहुना, अब्दुल्ला सत्तेत असताना असा घुसखोरांना संरक्षणच मिळत असे. पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांसाठी पाकिस्तानलाच दोष दिला जातो. तसाच दोष बांगलादेशाला दिल्यास त्यात काहीच चुकीचे नाही. दुसरे असे की एखादी दोषी व्यक्ती परक्या देशातील असली की तिच्या देशाला नावे ठेवण्याची मानवी प्रवृत्ती आहे. अमेरिकेतही सर्व भारतीयांना भेदभावाला सामोरे जावे लागते. तेथेही भारताला नावे ठेवली जातात. आता तर नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत बेकायदा प्रवेश केलेल्या घुसखोरांविरोधात मोठी मोहीम उघडली आहे. त्यात केवळ बेकायदा घुसखोरच नव्हे, तर रीतसर कामाचा परवाना घेऊन आलेल्या व्यक्तींनाही लक्ष्य केले जात आहे. या व्यक्तींच्या व्हिसाची मुदत संपल्यावर त्यांची मूळ देशात परतपाठवणी केली जाईल. वास्तविक हे व्हिसाधारक आपल्या व्यावसायिक कौशल्याद्वारे अमेरिकेच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात वाढच करीत असतात. तरीही त्यांची परत पाठवणी केली जाण्याची शक्यता आहे. इतकी कठोर भूमिका परक्या नागरिकांविरोधात तेथे घेतली जात आहे.

त्याउलट भारतातील घुसखोरांची स्थिती आहे. बांगलादेशी घुसखोरांना पैशाच्या मोबदल्यात भारतात प्रवेश तर मिळतोच, पण निवडणूक ओळखपत्रापासून थेट पारपत्रापर्यंत सर्व कायदेशीर कागदपत्रे उपलब्ध करून दिली जातात. त्यात प्रामुख्याने राज्य सरकारच्या भ्रष्ट कर्मचार्‍यांचा सहभाग असतो. असे हे परदेशी घुसखोर भारतावर भार होत चालले आहेत. हे घुसखोर भारतात समाजविघातक कृत्यांमध्ये सहभागी होतात. त्यांच्यामुळे स्थानिक नागरिकांच्या रोजगाराच्या संधी कमी होतात. देशातील संसाधनांमध्ये हे वाटेकरी बनतात. म्हणूनच सरकारने कितीही योजना राबविल्या, तरी त्या पुर्‍या पडत नाहीत. बांगलादेशी रोहिंग्या मुस्लिमांनी तर आपली प्रजा वाढविण्याची मोहीमच हाती घेतली आहे. भारतात मुले जन्माला घातली की आपोआपच त्यांना भारताचे नागरिकत्व मिळेल, हा त्यामागील हेतू आहे. ट्रम्प यांनी तर अशा प्रकारे मिळणार्‍या नागरिकत्वाची सुविधाही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरून भारताला बोध घेण्यास हरकत नाही.

एखाद्या देशात बेकायदा प्रवेश केलेला घुसखोर हा त्या देशासाठी डोकेदुखीच ठरते, हा अनुभव सध्या युरोप, अमेरिका आदी देशांना येत आहे. युरोपमध्ये सीरियन आणि इराकी शरणार्थींनी उत्पात माजविला आहे. लंडनसारख्या शहराची ओळख पाकिस्तानी बनत चालली आहे, इतके पाकिस्तानी तेथे स्थायिक झाले आहेत. फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, इटली वगैरे अनेक देशांमध्ये या इस्लामी शरणार्थींनी दंगली घडविल्या. अमेरिकेतही या इस्लामी दहशतवादाला कोंब फुटत असल्याचे गतवर्षी अखेर घडलेल्या दोन घटनांनी दाखवून दिले. त्यामुळे आता भारताने वेळीच या बांगलादेशी आणि अन्य घुसखोरांविरोधात कठोर कारवाई केली नाही, तर भारतीयांपुढील संकट आणि आव्हाने बेसुमार वाढतील. सैफ अली खानवरील हल्ल्यामुळे भारतात, विशेषत: मुंबईत राहणार्‍या बांगलादेशी घुसखोरांबद्दल सतर्कता वाढली, तर ती स्वागतार्ह बाब ठरेल. त्यात बांगलादेशाची बदनामी होणार असेल, तर त्यास तोच देश जबाबदार!