विविध प्रांतांतील असंतोष आणि बंडाळी आटोक्यात न ठेवू शकणार्या पाकिस्तानी लष्करी नेतृत्वाने भारताची कुरापत काढण्याचे त्याला न पेलणारे वजन उचलल्यावर त्याचे तोंड फोडणारा ठोसा भारताने लगावला. वारंवार मार खाऊनही दहशतवादाला पोसण्याची पाकिस्तानची खुमखुमी कमी होत नसेल, तर त्या देशाचा सर्वनाश अटळ आहे. कारण, भारताचे नेतृत्व मोदींच्या हाती आहे, जे अशा देशविरोधी गोष्टी कदापि विसरणार नाहीत. काल ‘चुटकीभर सिंदूर’ची खरी किंमत काय, ती पाकिस्तानला भारताने दाखवून दिली!
पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या एकंदर नऊ अड्ड्यांवर बुधवारी पहाटे ‘सर्जिकल स्ट्राईक’ करून भारताने पहलगाममधील नृशंस हत्याकांडाचा बदला घेतला. या लष्करी कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे सूचक आणि सुयोग्य नाव देण्यात आले होते. यात केवळ पाकव्याप्त काश्मीरमधीलच नव्हे, तर थेट पाकिस्तानच्या मुख्य भूमीवर असलेल्या दहशतवाद्यांच्या तळांवर क्षेपणास्त्रांनी अचूक हल्ला चढविण्यात आला आणि त्यात काही दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले. पण, दहशतवाद्यांना ठार मारणे हा दुय्यम हेतू होता. दहशतवाद्यांना आपल्या देशात आश्रय दिल्यास तेथेही आम्ही त्यांना शोधून काढू आणि त्यांना अल्लाकडे पाठवून देऊ शकतो, हे भारताने सार्या जगाला दाखवून दिले.
पहलगाम हल्ल्यास जबाबदार दहशतवाद्यांना जगाच्या कानाकोपर्यांतून शोधून काढून ठार मारू, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर वचन दिले होते. मोदी अशा गोष्टी विसरत नसल्याने त्यांनी आपले वचन प्रत्यक्षात आणून पाकिस्तानला धडा शिकवला. यापूर्वी उरी आणि पुलवामा येथेही झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा मोदी यांनी हवाई हल्ले करून बदला घेतला होता. आता पहलगाममधील निष्पाप पर्यटकांच्या हत्येचा बदलाही त्यांनी घेतला. या कारवाईविरोधात कोणत्याही देशाने ‘हूं की चूं’ केलेले नाही. यावरून पाकिस्तान हा जगभरात किती तिरस्करणीय आणि एकाकी देश बनला आहे, ते स्पष्ट होते.
या हल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे, पाकिस्तानला भारताविरोधात लष्करी प्रतिकारवाई करणे अवघड बनले आहे. कारण, एक तर भारताने पाकिस्तानच्या कोणत्याही लष्करी स्थळांवर किंवा आस्थापनांवर हल्ला चढविलेला नाही. तसेच, यात सामान्य नागरिकांचाही बळी गेलेला नाही. या हल्ल्यांचे लक्ष्य पाकव्याप्त काश्मीरमधील तळ असून तो प्रदेश म्हणजे पाकिस्तान नाही. त्यामुळे पाकिस्तानला त्यावर अधिकृतपणे तक्रारही करता येत नाही. मात्र, बहावलपूर, मुरीदके, सियालकोट वगैरे पाकिस्तानी भूमीवरील ज्या तळांवर भारताने हल्ले केले आहेत, तेथे नेमके काय आहे, हे पाकिस्तानला जगाला सांगताच येत नाही. कारण, ते दहशतवाद्यांचे प्रशिक्षण तळ आहेत. या हल्ल्यात नष्ट झालेली ही ठिकाणे ना रुग्णालये होती, ना शाळा, ना मशिदी, ना सरकारी आस्थापने. मग पाकिस्तान तक्रार तरी कशाची करणार होता?
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आंतरराष्ट्रीय सरहद्दीच्या 100 किमी आत असलेल्या ठिकाणांवर भारताकडून क्षेपणास्त्राने हल्ले होत असताना पाकिस्तानी हवाई दल काय झोपा काढत होते? आपल्या देशाच्या हवाई हद्दीचा भंग करून काही गोष्टी आत येत असताना पाकिस्तानी हवाई दलाकडून त्याला विरोध कसा झाला नाही, याचे उत्तरच पाकिस्तानी लष्कराकडे नाही. या क्षेपणास्त्रांना अडविण्यास ना पाकिस्तानी हवाई दलाची विमाने उडाली की त्यांनी आपली अस्त्रे डागली. यावरून पाकिस्तानी हवाई दल आणि लष्करही किती कुचकामी आहेत, ते सार्या जगाला कळून चुकले.
भारत हा हल्ला करू शकला, यामागे भारताची बाजू नैतिकदृष्ट्या योग्य होती, इतकेच कारण नाही. गेली 35 वर्षे परकीय दहशतवादाचा बळी ठरलेल्या भारताने दहशतवादाविरोधात कसलीही तडजोड न करण्याचे धोरण स्वीकारले आहे. पूर्वीच्या काँग्रेस सरकारने हे धोरण निव्वळ कागदावरच ठेवले होते. केंद्रात नरेंद्र मोदी सत्तेवर येताच त्यांनी या समस्येचा खातमा करण्यासाठी भारतीय लष्कराला सुसज्ज आणि आधुनिक करण्याचा ध्यास घेतला. कोणत्याही वेळी युद्धाला सामोरे जाण्याची सज्जता भारतीय सैन्याकडे आज आहे, त्यामागे मोदी यांचे हे लष्कराच्या आधुनिकीकरणाचे प्रयत्न आहेत. काँग्रेसच्या काळात भारतीय सैनिकाला ‘बुलेटप्रूफ जॅकेट’ही मिळत नव्हते. मोदी यांनी जागतिक दर्जाच्या ‘बुलेटप्रूफ जॅकेट’ची निर्मिती सुरू केली. अनेक हलक्या बंदुकांचे आणि ‘एके-47’सारख्या अत्याधुनिक रायफलींचे उत्पादनही भारतात सुरू करण्यात आले. जगातील सर्व अत्याधुनिक शस्त्रे आणि अस्त्रे आज भारताकडे आहेत. तसेच, भारतानेही स्वबळावर आपल्या गरजेनुरूप काही अस्त्रे विकसित केली आहेत. त्यात ‘ब्रह्मोस’, ‘नाग’, ‘आकाश’, ‘पृथ्वी’ यांसारखी क्षेपणास्त्रे, ‘धृव’ हे हलके लढाऊ हेलिकॉप्टर, ‘तेजस’ हे लडाऊ विमान यांसारख्या संरक्षण साहित्याचा समावेश आहे. एकेकाळी संरक्षण साहित्याचा निव्वळ आयातदार देश असलेला भारत आज हजारो कोटी डॉलर्सची अस्त्रे-शस्त्रे निर्यात करीत आहे.
अर्थात, युद्ध हे निव्वळ शस्त्रास्त्रांच्या जोरावर जिंकता येत नाही. त्याला राजनैतिक डावपेचांचीही जोड द्यावी लागते. त्या आघाडीवरही मोदी सरकारने नेत्रदीपक यश संपादन केले. पाकिस्तान हा दहशतवादाची गंगोत्री आहे, हे मोदी यांनी सार्या जगाला दाखवून दिले. त्यात केवळ अमेरिका आणि युरोपीय देशच नसून, बहुसंख्य मुस्लीम देशांचाही समावेश आहे. पाकिस्तानविरोधी या कारवाईसाठी कतारने नुकताच भारताला पाठिंबा दिला. रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी दोन दिवसांपूर्वीच मोदी यांना फोन करून पूर्ण पाठिंबा देऊ केला होता. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत सर्व देशांनी पाकिस्तानच्या दहशतवादी धोरणाबद्दल त्याला धारेवर धरले होते. मोदी यांच्या या धूर्त आणि कार्यक्षम डावपेचांना परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या बुद्धिमत्तेची जोड लाभली आहे.
काँग्रेसच्या बोटचेप्या, खरेतर पाकिस्तानधार्जिण्या धोरणाच्या तुलनेत मोदी यांच्या जाज्ज्वल्य राष्ट्रवादी परराष्ट्र आणि संरक्षण धोरणामुळेच भारत ही आशियातील विभागीय लष्करी महासत्ता म्हणून उदयाला येत आहे. मुंबईवर झालेला हल्ला हे शब्दश: छोटेखानी युद्धच होते. तरीही तत्कालीन काँग्रेस सरकारने पाकिस्तानविरोधात साधे बोटही उचलले नव्हते. उलट उरी लष्करी तळावरील हल्ला असो, पुलवामाचा जवानांवरील हल्ला असो की, आता पहलगाममधील पर्यटकांवरील हल्ला असो, मोदी यांनी प्रत्येक वेळी पाकिस्तानला रक्तबंबाळ करणारे प्रत्युत्तर दिले. इतका मार खाऊनही पाकिस्तानची दहशतवाद पोसण्याची खुमखुमी जिरत नसेल, तर त्या देशाचा सर्वनाश अटळ आहे. तो दोन प्रकारे होईल. पाकिस्तानातील बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा हे प्रांत आताच पाकिस्तानच्या विरोधात बंड करून उठले आहेत. पाकिस्तानी लष्कराचे या प्रांतांवर कसलेही नियंत्रण उरलेले नाही. जोडीला सिंध प्रांतात पंजाब प्रांताविरोधात असंतोष खदखदतो आहेच. आता भारताने पाकिस्तानचे पाणी बंद केल्याने त्या असंतोषाचा स्फोट केव्हाही होऊ शकतो. पाकव्याप्त काश्मीरमधील जनताही पाकिस्तानच्या भेदभावाला कंटाळली असून, त्यांना भारतात सामील व्हायचे आहे. दुसरीकडे पाकिस्तानने भारताविरोधात दहशतवादाचे धोरण कायम ठेवल्यास त्याला भारताकडून आजच्यासारखे सणसणीत प्रत्युत्तर मिळत राहील. एकंदरीतच पाकिस्तानचे भवितव्य अधांतरी बनले असून, येत्या दशकभरात हा देश जगाच्या नकाशावरून पुसून गेल्यास आश्चर्य वाटायला नको. ‘चुटकीभर सिंदूर’ची किंमत त्याला आज कळली असेल!