आर. आर. पाटलांचा मुलगा आमदार झाला पण माझा मुलगा होत नाही हे जयंतरावांचे दुखणे!

आमदार गोपीचंद पडळकरांची जयंत पाटलांवर टीका

    20-Jan-2025
Total Views |
 
Gopichand Padalkar
 
सांगली : आर. आर. पाटलांचा मुलगा आमदार झाला आणि माझा मुलगा होत नाही हे जयंत पाटील यांचे मोठे दुखणे आहे, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
 
सांगली येथे सांगोल्याचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, आमदार सुधीर गाडगीळ, आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचा नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
 
गोपीचंद पडळकर म्हणाले की, "जिल्ह्यात एक चांगले संघटन होण्याची आवश्यकता आहे. जयंतराव पाटील हे एकटेच ९० चे आमदार आहेत. ११ हजार मतांनी निवडून आल्यामुळे ते पडल्यासारखे आहे. त्यांचे दुखणे वेगळेच आहे. आर. आर. पाटील यांचा मुलगा आमदार झाला आणि माझा मुलगा होत नाही याचे त्यांना सगळ्यात जास्त टेन्शन आहे. आणखी काही नेत्यांचा याचे टेन्शन आहे. जतमध्ये माझ्याआधी जयंत पाटील यांनी मुलासाठी चाचपणी केली होती. पण एजन्सीचा रिपोर्ट नापास आला. त्यानंतर त्यांनी हातकणंगले लोकसभेचाही सर्वे केला. परत सांगलीतही पुडी सोडली. पण काहीही झाले नाही. सत्ता आणि पैसा या गोष्टींवर राजकारण करण्याची वेळ संपलेली आहे. तसे असते तर मी आमदार झालो नसतो. आता लोकांच्या हातात निवडणूका गेलेल्या आहेत," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  स्वित्झर्लंडच्या मराठी बंधु-भगिनींचे प्रेम अनमोल! मला या प्रेमातच राहायचंय
 
ते पुढे म्हणाले की, "सांगलीच्या तुरुंगातील एक आरोपी ज्याला अनेकदा खोट्या प्रकरणात तुरुंगात जावे लागले त्याचा आज जनतेच्या पाठबळावर सांगलीच्या चौकात सन्मान होतो, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न केला तर पहिल्यांदा तुरुंगाचा रस्ता दाखवला जातो, हे लक्षात ठेवा. ज्यांची ही तयारी आहे त्यांनी राजकारणात पुढे गेलेच पाहिजे. माझ्यावर जेवढ्या केसेस टाकल्या त्याच्यापेक्षा हजार पटीने तुरुंगातून बाहेर आल्यावर लोकांनी मला हार घातले आहेत."
 
"सांगली जिल्हा हा दोन पुढाऱ्यांचा आहे असे वारंवार म्हटले जाते. हा जिल्हा त्यांच्या विराचारांचा असे म्हणतात पण विचार नेमका काय आहे ज्यामुळे राज्याला त्याचा फायदा झाला? हे कळू द्या. हा जिल्हा नागनाथ अण्णा नायकवडी, क्रांतीसिंह नाना पाटील, बारा बलुतेदार आणि अठरापगड जातीतील लोकांचा, शेतकऱ्यांचा आणि कष्टकऱ्यांचा आहे. त्यामुळे या जिल्ह्यात केवळ राजकीय नाही तर सामाजिक परिवर्तन झाले पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर आहेत. यात सांगली जिल्ह्याला आणि जत तालुक्याचा मोठा आंतरराष्ट्रीय प्रकल्प देण्याची मी विनंती केली असून त्यांनी मला तसा शब्द दिला आहे," असे ते म्हणाले.
 
कृष्णाकाठच्या पुढाऱ्यांनी दुष्काळग्रस्त तालुक्यांवर अन्याय केला!
 
"एक काळ सांगली जिल्ह्यातील एक नेतृत्व होते. जिल्ह्यातील एक कॅबिनेट मंत्री अनेक वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणात होते. जिल्ह्यातील मातब्बर नेते मंत्रिमंडळात असताना १९९० पासून तर २०२४ पर्यंत त्यांनी असा कुठला प्रकल्प आणला ज्यात सांगली जिल्ह्यातील दहा हजार मुले काम करत आहेत. असा एकही प्रकल्प ते आणू शकले नाहीत कारण ती वृत्ती नाही. कृष्णाकाठच्या सगळ्या पुढाऱ्यांनी जिल्हातल्याच दुष्काळग्रस्त तालुक्यांवर अन्याय केला," असेही ते म्हणाले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121