स्वित्झर्लंडच्या मराठी बंधु-भगिनींचे प्रेम अनमोल! मला या प्रेमातच राहायचंय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : झ्युरिक येथे बृहन महाराष्ट्र मंडळातर्फे उत्साहात स्वागत
20-Jan-2025
Total Views | 111
स्वित्झर्लंड : स्वित्झर्लंडच्या मराठी बंधु-भगिनींचे प्रेम अनमोल असून मला या प्रेमातच राहायचे आहे, अशा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या. रविवार, १९ जानेवारी रोजी स्वित्झर्लंडच्या बृहन महाराष्ट्र मंडळातर्फे झ्युरिक येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी त्यांनी वैश्विक मराठी परिवारातील मराठी बंधु-भगिनींशी मनमोकळा संवाद साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "बृहन महाराष्ट्र मंडळ, स्वित्झर्लंडच्या प्रेमाचे मोल नाही, मला या प्रेमातच राहायचे आहे. हे प्रेम सातत्याने असेच राहावे. आपला महाराष्ट्र भारताचे पॉवर हाऊस आहे. महाराष्ट्र ही भारतीय अर्थव्यवस्थेची गुरुकिल्ली आहे. ज्यावेळी भारत ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होईल त्यानंतर १-२ वर्षांतच महाराष्ट्र एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होईल. महाराष्ट्र ही देशातील पहिली उपराष्ट्रीय ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था असेल. जगात डेटा आणि एआय या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. एआय तंत्रज्ञानात आघाडी घेतलेला महाराष्ट्र भारताचे डेटा सेंटर कॅपिटल आहे. आपण महाराष्ट्रात एक नवीन इनोव्हेशन सिटी तयार करणार आहोत," असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, "महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला देव, देश, धर्माकरिता लढायला शिकवले. आपल्या संस्कृतीचा, भाषेचा अभिमान बाळगायला शिकवले. ती शिकवण मराठी माणसाने स्वित्झर्लंडमध्ये जपली आणि पुढच्या पिढीला दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. आता लवकरच मराठीला ज्ञानभाषा म्हणून प्रस्थापित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी स्वित्झर्लंडसह वैश्विक मराठी परिवारातील मराठी बंधु-भगिनी आमचे राजदूत म्हणून काम करत आहेत," असेही ते म्हणाले.