पक्षफुटीनंतर विधानसभेत मिळालेला धक्का पचवत नाहीत, तोवर सुप्रिया सुळे आणि त्यांच्या वडिलांना पुन्हा दणका देण्याची तयारी अजित पवारांनी केलेली दिसते. काकांकडे आठ खासदारांचे बळ असले, तरी सत्तेवाचून त्यांचे अस्तित्व जवळपास शून्य, हे अजितदादा जाणतात. त्यामुळेच बहुदा आपले विश्वासू सुनील तटकरे यांच्या खांद्यावर या मोहिमेची जबाबदारी दिली असावी. तटकरेंनी म्हणे संसदेच्या हिवाळी अधिवेशनात ‘सावज’ टप्प्यात गाठले. सुप्रिया सुळे वगळता शरद पवारांकडील सात खासदारांना संपर्क साधण्यात आला. प्रदेशाध्यक्ष स्वतः त्यांना खासगीत भेटले आणि दादांचा निरोप सांगितला. या घटनेला जवळपास १५ दिवस उलटले, तरी या कानाची खबर त्या कानाला लागली नाही. याचा अर्थ बहुतांश खासदारांना दादांच्या छायेत जायचे आहे, फक्त ते काकांच्या ‘सिग्नल’ची वाट पाहत असावे.
सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे वगळता पवारांकडील सहा खासदार हे नवखे आहेत. काहीजण आमदार पदावरून खासदार झाले असले, तरी संसदेचा विशेषतः दिल्लीतील वातावरणाचा अनुभव त्यांना नाही. त्यात विरोधी बाकांवर बसावे लागल्याने पहिल्या दिवसापासून ते निराशेत. निधी मिळत नाही, मंत्री सहकार्य करीत नाहीत, अशा तक्रारी ऐकून स्वतः शरद पवारही कंटाळले आहेत. त्यामुळे असंतुष्टांची नाराजी हेरत दादांनी मखमली गालिचा अंथरला, तर त्यात वावगे काय? महायुती सरकारला भक्कम बहुमत मिळाल्यामुळे पुढची पाच वर्षे दादांच्या मंत्रिपदाला धोका नाही, ही बाब काकांचे चेलेही जाणतात. राजकारणात टिकायचे असेल, तर विकासकामांसाठी निधी आणि कार्यकर्त्यांच्या हाताला काम द्यावेच लागेल, अन्यथा भवितव्य अवघड आणि अजितदादांच्या पदरात शिरल्याशिवाय यापैकीच काहीच मिळणार नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ. बरे, तटकरे याचा विरोध करीत असले, तरी सुप्रिया सुळेंचा प्रफुल्ल पटेलांना गेलेला फोन सर्व प्रश्नांवरचे उत्तर आहे. त्यामुळे आगामी काळात सुप्रिया वगळता अन्य खासदार दादांच्या सावलीत गेल्यास नवल वाटायला नको.
उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक,’ अशी उद्धव ठाकरेंच्या पक्षाची सध्याची स्थिती. विधानसभा निवडणुकीतील मानहानिकारक पराभवानंतर ‘उबाठा’ गटातील आजी-माजी आमदार प्रचंड अस्वस्थ झाले. पक्षप्रमुखांकडून पुनर्वसनाचे कोणतेच ठोस आश्वासन मिळत नसल्यामुळे अनेकांनी जाहीर उद्विग्नता व्यक्त करण्यास सुरुवात केली. राजापूर मतदारसंघातील पराभूत उमेदवार राजन साळवी हे त्याचे ताजे उदाहरण. राजापुरातून सलग तीनवेळा विजय मिळवलेल्या साळवींचा यंदा शिवसेनेचे उमेदवार किरण सामंत यांनी पराभव केला. त्याचा धक्का सहन न झाल्यामुळे साळवींनी थेट पक्षांतराची तयारी सुरू केली. त्याची माहिती मिळताच उद्धव ठाकरेंनी त्यांना ‘मातोश्री’वर भेटीचे निमंत्रण दिले.
साळवी आणि उद्धव ठाकरेंमध्ये जवळपास पाऊण तास कोकणातील निकालावर चर्चा झाली. साळवींनी आपल्या पराभवाचे खापर माजी खासदार विनायक राऊत यांच्यावर फोडले. उदय आणि किरण सामंत यांच्यासोबत चांगले संबंध असल्यामुळे राऊतांनी त्यांना छुपी मदत केल्याचा आरोप साळवींनी केला. त्यावर उद्धव ठाकरेंनी आवाज चढवत विनायक राऊतांच्या लोकसभेतील पराभवाला तुम्ही जबाबदार नाहीत का? असा सवाल केला. त्यावर, ‘माझ्या मतदारसंघातून राऊतांना 21 हजारांचे लीड मिळवून दिले. त्यामुळे मी जबाबदार कसा?’ असा प्रतिप्रश्न साळवींनी केला. त्यामुळे रागाने लालबुंद झालेल्या ठाकरेंनी ‘तुम्हाला काय निर्णय घ्यायचा तो घ्या,’ असे खडसावत राजन साळवींना बाहेरचा रस्ता दाखवला. बाळासाहेब हयात असते, तर निष्ठावंत सैनिकाला मिळणारी अशी वागणूक पाहून दुःखी झाले असते.
असो. दुधाने तोंड पोळले, तर ताकदेखील फुंकून प्यावे, असे म्हणतात. गेल्या पाच वर्षांत अनेकवेळा तोंड पोळल्यानंतरही उद्धव ठाकरेंच्या वर्तनात सुधारणा झालेली नाही. त्याचा फटका विधानसभा निवडणुकीत बसला. भाजपसोबत असताना, ठाकरेंच्या ६० हून अधिक जागा निवडून यायच्या. आता ती संख्या २० पर्यंत खाली आहे. इतके अधःपतन होऊनही रगेलपणा कमी न झाल्याने पालिका निवडणुकीतही याहून निराळी स्थिती नसेल. त्यामुळे येत्या काळात ‘धर्मवीर-२’ प्रमाणे ‘सेना’ फुटीचा दुसरा भाग पाहायला मिळेल, हे निश्चित!