एकीकडे “मोदींना पंतप्रधानपदावरुन हटविल्याशिवाय मी मरणार नाही,” असे विधान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले, तर दुसरीकडे ‘पीडीपी’च्या मेहबूबा मुफ्ती यांनी इस्रायल हल्ल्यात ठार झालेल्या ‘हिजबुल्ला’च्या म्होरक्याला ‘शहीद’ ठरविले. या दोन्ही घटना विरोधकांच्या कोत्या मानसिकतेचे दर्शन घडवणार्याच!
जम्मू-काश्मीरच्या कठुआमधील एका सभेत बोलताना काँग्रेसचे 83 वर्षीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा जिभेवरील तोल पुन्हा सुटला. “जोपर्यंत मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेवरुन हटवत नाही, तोपर्यंत मी मरणार नाही,” असे विधान खर्गेंनी केले. मुळात हे विधान करण्यापूर्वी अगदी काही क्षण व्यासपीठावर असलेल्या खर्गेंना भोवळ आली आणि कार्यकर्त्यांनी त्यांना खुर्चीत बसून विश्रांतीचा सल्ला दिला. पण, वैद्यकीय साहाय्य घेतल्यानंतर खर्गेंमधील अस्सल काँग्रेसी जागा झाला आणि त्यांनी मोदींवर निशाणा साधला. काश्मिरी जनतेला उद्देशून खर्गे म्हणाले की, “मी इतक्यात मरणारा नाही. जोपर्यंत मोदींना सत्तेवरुन हटवत नाही, तोपर्यंत मी जिवंत राहणार आहे. मी तुमचे ऐकीन आणि तुमच्यासाठी लढणार आहे.” खर्गेंचे हे विधान म्हणजे, केवळ जनतेच्या टाळ्या मिळवण्यासाठीचा एक नसता खटाटोप म्हणावा लागेल. आपली तब्येत ढासळली, स्वास्थ्य एकाएकी बिघडले, याचा कदाचित सगळा राग खर्गेंनी मोदींवरच काढलेला दिसतो. काँग्रेसचा अध्यक्ष असा वयोमानापरत्वे अशक्त झालेला, तो पुरेसा सक्षम नाही, मग पक्षावर विश्वास तरी कसा ठेवायचा, असा संदेश जनतेत जाऊ नये, म्हणूनच खर्गेंनी केलेली ही राणा भीमदेवी थाटातील गर्जना.खर्गेंच्या या विधानाचा भाजप नेत्यांनी चांगलाच समाचार घेतला. पण, त्याहीपेक्षा या प्रकरणी अधिक महत्त्वाची कृती ठरली ती पंतप्रधानांची. आपले कडवे राजकीय विरोधक असले, तरी मोदींनी आवर्जून खर्गेंच्या तब्येतीची फोनवरुन विचारपूस केली आणि आपल्या राजकीय परिपक्वतेचा पुनश्च परिचय करुन दिला.
बेताल विधाने करण्याची खर्गेंची म्हणा ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही खर्गेंचा मोदीद्वेष वेळोवेळी उफाळून आला आहे. खर्गेंनी मोदींचा उल्लेख मागे ‘विषारी साप’ असा केला होता. त्यावेळीही मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधत, हा खरं तर माझा सन्मान असल्याचा पलटवार करीत, कशाप्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि वीर सावरकर यांचाही अपमान काँग्रेसने केला, त्याचा दाखला दिला होता. एवढेच नाही, तर गेल्या दहा वर्षांत तब्बल 110 वेळा मोदींविरोधात काँग्रेसकडून कशी खालच्या पातळीवर टीका गेली, त्याचा संदर्भही जे. पी. नड्डा यांनी खर्गेंना लिहिलेल्या एका खरमरीत पत्रात नुकताच दिला. गेल्याच महिन्यात केंद्रीय मंत्री बिट्टू यांच्या राहुल गांधी यांना उद्देशून ‘क्रमांक एकचा दहशतवादी’ या विधानाविरोधात खर्गेंनी मोदींना उद्देशून पत्र लिहिले. आपल्या पत्रात भारतीय लोकशाहीचे महत्त्व, संविधानातील मूल्य वगैरे यांवर खर्गेंनी मोदींना उपदेशाचे डोस पाजण्याचा प्रयत्न केला होता. पण, आज तेच खर्गे आणि त्यांचा काँग्रेस पक्ष सत्तेसाठी इतका कासावीस झाला आहे की, मोदीद्वेषापलीकडे त्यांना दुसरे काहीही दिसत नाही. यात खर्गेंचाही दोष नाहीच म्हणा. कारण, काँग्रेसने वर्षानुवर्षे नरेंद्र मोदींना यथेच्छ शिवीगाळ करुन, त्यांच्या राजकीय खच्चीकरणाचा सर्वोपरी प्रयत्न केला. खुद्द सोनिया गांधी यांनी नरेंद्र मोदींना ‘मौत का सौदागर’ असा केलेला उल्लेख असेल किंवा त्यानंतरही ‘नीच’, ’रावण’, ‘भस्मासूर’ आणि यापेक्षाही टोकाच्या असंसदीय शब्दांत काँग्रेसने वेळोवेळी मोदींचा अपमान करण्याची एकही संधी सोडलेली नाही. त्यामुळे मोदींविषयी आपण वाट्टेल ते, अगदी खालच्या पातळीवर जाऊन बरळायचे आणि राहुल गांधींविषयी कुणी काही टीका केली की, त्यावरुन रान उठवायचे, असा हा सगळा काँग्रेसचा परंपरागत दुटप्पीपणा. त्यामुळे राहुल गांधी म्हणतात तसे काँग्रेस ‘मोहब्बत की दुकान’ नाही, तर ‘मोदीद्वेषाचे दुकान’ असल्याचेच कालच्या घटनेनंतर पुन्हा सिद्ध झाले.
स्वत: सत्तेवर बसण्यासाठी आणि दुसर्याला सत्तेवरुन पायउतार करण्यासाठी एकटी काँग्रेसच नव्हे, तर ‘पीडीपी’सारखे पक्षही कोणत्याही थराला जाऊ शकतात, याचीही काश्मीरमध्येच पुन्हा प्रचिती आली. जम्मू-काश्मीरमध्ये आज, दि. 1 ऑक्टोबर रोजी तिसर्या आणि अखेरच्या टप्प्यातील 40 मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडेल. त्यासाठी तब्बल 415 उमेदवार रिंगणात आहेत. यावेळी प्रचार शिगेला असतानाच, ‘पीडीपी’च्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी रविवारी एक दिवस प्रचार न करण्याचा निर्णय घेतला. जम्मू-काश्मीरमधील एखाद्या घटनेच्या निषेधार्थ नव्हे, तर चक्क लेबेनॉन आणि पॅलेस्टाईनमधील इस्रायलच्या हल्ल्यांचा तीव्र निषेध म्हणून मुफ्ती यांनी प्रचाराला एकदिवसीय ब्रेक लावला. एवढ्यावर न थांबता मुफ्तींनी इस्रायल हल्ल्यात मारल्या गेलेल्या ‘हिजबुल्ला’चा म्होेरक्या नसराल्लाला चक्क ‘शहीद’ ठरविले आणि त्या शहादतीच्या प्रीत्यर्थ रविवारी निवडणूक प्रचाराला फाटा दिला. कोणी म्हणेल, प्रचाराचा एक दिवस मुफ्तींनी फुकट घालवला, म्हणजे त्यांनी स्वत:च्याच पक्षाचे, उमेदवारांचे नुकसानच नाही का केले? पण, ते तसे अजिबात नाही. उलट मुफ्ती यांनी इस्रायल-लेबेनॉन युद्धात कशाप्रकारे मुस्लिमांवर अत्याचार होत आहेत, त्याप्रती आपल्या या कृतीतून सहानुभूती व्यक्त करुन, मुस्लीम पतपेढीला चुचकारण्याचाच प्रयत्न केलेला दिसतो. एवढेच नाही, तर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनाही ‘हिटलर’ची उपमा देऊन मुस्लीम मतदारांना खूश करण्याचा आटापिटा मुफ्तींनी केला. त्यामुळे पॅलेस्टिनींविषयी, लेबेनॉनविषयी अशाप्रकारे सहानुभूती प्रकट करायची आणि चार अधिकची मुस्लीम मते पदरात पाडून घ्यायची, असा हा सगळा केविलवाणा प्रकार.
मुफ्तींवर हे ‘मुस्लीम कार्ड’ खेळण्याची वेळ आली ती त्यांच्या लोकसभेतील दारुण पराभवानंतर. अनंतनाग-राजौरी लोकसभा मतदारसंघातून तब्बल 2 लाख, 36 हजार मतांनी मुफ्तींचा नॅशनल कॉन्फरन्सचे उमेदवार मिया अल्ताफ यांनी पराभव केला. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्रिपद भूषविलेल्या मुफ्ती यांना अशाप्रकारे नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले. त्याचीच विधानसभेत पुनरावृत्ती टाळण्यासाठी यंदा मुफ्ती यांनी निवडणुकीच्या रिंगणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या कन्येला मैदानात उतरविले. तेव्हा, लोकसभा निवडणुकीत मोदीद्वेषाचे कार्डही चालले नाही की ‘काश्मिरीयत’ही मदतीला धावून आली नाही, म्हटल्यावर मुफ्तींनी आता ‘मुस्लीम कार्ड’ खेळलेले दिसते. हाच प्रकार ‘हिजबुल मुजाहिद्दीन’चा इस्लामी अतिरेकी बुरहान वानी याच्या 2016 सालच्या चकमकीतील हत्येनंतर खोर्यात दिसून आला होता. त्यावेळीही वानीला ‘शहीद’ ठरवित, मोदी सरकार आणि भारतीय सैन्याला दूषणे देण्यात मुफ्ती आघाडीवर होत्या. त्यामुळे असाच प्रश्न उपस्थित होतो की, खोर्यातील भारतीय सैनिक, काश्मीर पोलीस आणि काश्मिरी पंडितांच्या दहशतवाद्यांकडून घडलेल्या हत्येनंतर मुफ्तींनी अशीच सहवेदना व्यक्त करत एकदा तरी बंद पाळला का? तर त्याचे उत्तर साहजिकच ‘नाही’ असे द्यावे लागेल. त्यामुळे एकीकडे खर्गेंचा मोदीद्वेष आणि दुसरीकडे मुफ्तींची दहशतवाद्यांप्रती ‘मोहब्बत’ अशी ही सगळी राजकीय दुकानदारी!