भारतीय तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर समुद्रात कोसळले, तिघे बेपत्ता!
कार्गो जहाजावर बचावकार्यासाठी गेलेल्या हेलिकॉप्टरचा अपघात
03-Sep-2024
Total Views |
गांधीनगर : गुजरातच्या पोरबंदर तटावर भारतीय तटरक्षक दलाचे अॅडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर (ध्रुव) अरबी समुद्रात कोसळले. हेलिकॉप्टरमधील चारपैकी तीन क्रू मेंबर्स बेपत्ता आहेत. एकाला वाचविण्यात यश आले असून हेलिकॉप्टरचे अवशेषही सापडले आहेत. सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. भारतीय तटरक्षक दलाने मंगळवार सकाळी १०.१२ वाजता एक्सवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोरबंदर तटापासून ४५ किलोमीटर दूर कार्गो जहाजावर बचावकार्यासाठी हे हेलिकॉप्टर गेले होते. यात दोन पायलट आणि दोन डायव्हर्सचा सामावेश होता.
कार्गो जहाजावर बचावकार्यासाठी गेले असताना हेलिकॉप्टरची एमर्जन्सी लँडींग करावी लागली. याच दरम्यान हेलिकॉप्टर समुद्रात कोसळले. दरम्यान या बचावकार्यआणि शोधमोहिमेसाठी चार जहाज आणि दोन विमाने पाठविण्यात आली आहेत. गुजरातमध्ये काही दिवसांपूर्वी उद्भवलेल्या पूरस्थितीत एएलएच हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली होती. जवळपास ६७ जणांच्या बचावकार्यासाठी या हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली होती. अॅडव्हांस लाईट हेलिकॉप्टरला 'ध्रूव' ही म्हटले जाते. तटरक्षक दल, सैन्य आणि नौदलही याचा वापर करतात. काही दिवसांपूर्वीच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (HAL) यात अद्यावत बदल केले आहेत.
अरबी समुद्रात झाली होती एमर्जन्सी लँण्डींग
मुंबईतही यापूर्वी ALH ध्रुवची एमर्जन्सी लँण्डींग झाली होती. ८ मार्च २०२३ रोजी सकाळी नौदलाने हे हेलिकॉप्टर टेहळणीसाठी वापरले होते. काही कारणास्तव पायलटने हे हेलिकॉप्टर पाण्यावर उतरवले. याला तांत्रिक भाषेत डिचिंग, असे म्हटले जाते. यामध्ये पाण्यावर आप्तकालीन स्थितीत हेलिकॉप्टर उतरवता येते. यामध्ये पायलटला तीन जणांसह वाचवण्यात यश आले होते. यानंतर या घटनेची चौकशीही करण्यात आली होती.