माणूस घडवणारेच शिक्षण हवे!

    29-Sep-2024
Total Views |
 
Education
 
‘केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळा’सारखाच अभ्यासक्रम महाराष्ट्रातील शाळांमध्ये शिकवला जावा, या दृष्टीने धोरणनिश्चिती करण्याचे ठरत आहे. स्पर्धापरीक्षांना नजरेसमोर ठेवून हा निर्णय घेतल्यास तो एकांगीच ठरेल. शिक्षणाचा उद्देश नोकरी मिळवणे, हा नसून माणूस घडवणे हा असला पाहिजे. त्यानिमित्ताने देशातील शिक्षण व्यवस्थेवर प्रकाश टाकणारा हा लेख...
 
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना विविध स्पर्धापरीक्षांमध्ये चमकदार कामगिरी करता यावी, यासाठी ‘केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळा’शी संलग्न असलेल्या शाळांच्या अभ्यासक्रमाच्या धर्तीवर, राज्य मंडळाच्या शाळांचा अभ्यासक्रम तयार करण्यासंदर्भात सुतोवाच करण्यात आले आहे. शिक्षणाचा उद्देश स्पर्धापरीक्षांची तयारी इतकाच राखला गेला, तर इतर क्षेत्रांसाठी लागणारे उत्तम व्यावसायिक, कलावंत, साहित्यिक, नेतृत्व, कृषितज्ज्ञ, विधिज्ञ, प्राध्यापक, शिक्षक, प्रशासक यांच्या निर्मितीचे काय? समाज आपल्याला आनंदी हवा असेल तर, ही सर्व क्षेत्रांतील संपन्न माणसे आपल्याला हवी आहेत. सर्वांच्याच सहभागाने उत्तम समाज निर्माण होत असतो. शेवटी समाजाची प्रगती सर्वांच्याच सहभागाने होत असते. त्यामुळे शिक्षणातून सर्व क्षेत्रांसाठी लागणारे उत्तम दर्जाचे मनुष्यबळ विकसित करण्याचे ध्येय राखण्यात आले आहे. या सर्व क्षेत्रांसाठी लागणारे माणूस घडवण्याचे ध्येय शिक्षणाचे आहे. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने समग्र विकासाच्या प्रक्रिया घडवून आणणे शिक्षणातून अपेक्षित आहे. मुलांच्या मस्तकात जे काही दडले आहे, ते बाहेर काढणे म्हणजे शिक्षण आहे असे म्हटले जाते. त्याचवेळी जगप्रसिद्ध बुद्धिशास्त्रज्ञ हॉवर्ड गार्डनर यांनी बहुबुद्धिमत्ता सिद्धांताची मांडणी करून, जगाला शिक्षणाची वाट बदलणे भाग पाडले आहे. जग त्या बहुबुद्धिमत्तेच्या सिद्धांताच्या वाटेने जाऊ पाहात आहे. प्रत्येकातील सुप्त गुणांचा विकास घडवण्यासाठी शिक्षणाचा उपयोग व्हायला हवा, त्यादृष्टीने जगात पाऊले पडत आहेत. कोणत्याही देशातील शिक्षणाचा एकांगी विकास, त्या देशाला परवडणारा नसतो.
 
चीनसारखे राष्ट्रदेखील आपल्या एकाच दिशेचा प्रवास करून, आर्थिक समृद्धता निर्माण करू पाहात होते. त्यांना त्यात यश मिळालेदेखील. पण त्याचे दुष्परिणाम समोर आल्यावर, त्यांना धोऱणातून माघारी फिरत अभ्यासक्रमात बदल करावा लागला आहे. भारतात लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोगाद्वारे घेतल्या जाणार्‍या स्पर्धापरीक्षांमधून किती प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत? त्याचवेळी डॉक्टर, अभियंते यांच्या अभ्यासक्रमाचा विचार केला, तर त्या जागा किती आणि विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट होतात किती? त्यापलीकडे कितीतरी प्रमाणात नोकरी आणि व्यवसायाच्या संधी, बाजारात उपलब्ध आहेत. समाजाचा विकास हा समग्रतेने व्हायला हवा असेल, तर शिक्षणातून समाजाच्या गरजा लक्षात घेऊन, धोरण आणि भूमिका अभ्यासक्रमात प्रतिबिंबित व्हायला हवी. वर्तमानात समाजव्यवस्थेत जे प्रश्न डोके वर काढत आहेत, त्या प्रश्नांवर मात करत, भविष्याचा वेध घेण्यासाठी अभ्यासक्रम विकसित झाले पाहिजेत. समाज व राष्ट्र विकासासाठीचा मार्ग अभ्यासक्रमातून अधोरेखित केला जात असतो. त्यामुळे वर्तमानातील समस्या लक्षात घेऊन, भविष्याच्या संधीचा विचार करून, शिक्षणाने माणूस घडवण्याचा विचार करायला हवा. त्याशिवाय आपल्या प्रगत राष्ट्राच्या दिशेने प्रवास करता येणे शक्य नाही.
 
जगभरात सातत्याने विविध क्षेत्रांत नवनवीन संशोधन घडत आहे. नोकरीच्या संधी सातत्याने खुणावत आहेत. माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात क्रांतीने झेप घेतली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातही भरारी घेण्याची पाऊलवाट तयार होते आहे. ज्ञानाच्या क्षेत्रातही मोठी क्रांती होत आहे. अशा परिस्थितीत नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, म्हणून विद्यार्थी संबंधित शाखांच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेत आहेत. त्या अभ्यासक्रमाची पदवी घेऊन बाहेर पडेपर्यंत किंवा अगदीच पाच-दहा वर्षांत तो अभ्यासक्रम, कालबाह्य ठरत आहे. ज्या ज्ञानावर पदवी घेतली आहे, ते ज्ञान नोकरीत येईपर्यंत कालबाह्य झालेले असते. इतक्या वेगाने ज्ञानाच्या क्षेत्रात क्रांती घडत आहे. त्यामुळे उद्याचा वेध घेऊन, अभ्यासक्रम विकसनाची गरज आहे. जग कितीतरी वेगाने प्रगती करत आहे. अनेक क्षेत्रांत काही राष्ट्रांनी आपली मक्तेदारी निर्माण केली आहे. आपल्याला देखील उच्च शिक्षणात अशा गरजाधिष्ठित नवनवीन अभ्यासक्रमांची गरज आहे. मुळात प्राथमिक स्तरावर मूलभूत संकल्पनांचे महत्त्व अधिक आहे. निम्न प्राथमिक स्तरावर लेखन, वाचन, श्रवण, भाषण, संभाषण कौशल्यांबरोबर गणितीय संख्याज्ञान व संख्यांवरील क्रियांवर काम केले जात असते.जसा जसा स्तर उंचावत जाईल, त्याप्रमाणे व्यापक पातळीवर शिक्षण सुरू होते. उच्च शिक्षणात तर स्वतंत्र ज्ञानशाखांचा विचार केला जातो. त्यादृष्टीने शिक्षणाचा समग्र विचार करण्याची गरज आहे. आपल्या पदव्यांच्या अभ्यासक्रमाचा पट विस्तारण्याची गरज आहे. पदवी शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्याची निंतात गरज असताना, अलीकडे संसदेत आपल्या पदवीधरांचे सुमारे ५० टक्के प्रमाण हे, त्यांच्या अभ्यासक्रमाशी संबंधित कौशल्याशी निगडीत असल्याचे सांगण्यात आले आहे. आहे त्यात गुणवत्ता आणण्याचा प्रयत्नांची गरज लक्षात घ्यायला हवी. हे सारे होत असताना आपल्याला उत्तम नागरिक निर्माण करण्याची निंतात गरज अधोरेखित होत आहे.
 
नव्याने अनेक क्षेत्रांत संधी उपलब्ध होत आहेत. त्या दिशेने शिक्षणक्षेत्राचा प्रवास घडत असताना, त्या क्षेत्राच्या संधी खुणावत असताना, आपण केवळ स्पर्धापरीक्षांचा टक्का उंचावण्याचा विचार करून चालणार नाही. हॉवर्ड गार्डनर यांनी दर्शित केलेल्या इतर बुद्धिमत्ता असलेल्या विद्यार्थ्यांच्या विकासाची स्वतंत्र वाट चालण्याचीही गरज आहे. त्यामुळे सर्वच बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांच्या विकासाची जबाबदारी शिक्षणाची आहे. त्यामुळे समाज म्हणून आपल्याला विविध क्षेत्रांतील कर्तबगार, समृद्धतेची वाट चालणारी माणसे हवी आहेत. त्यामुळे एकाच वाटेचा प्रवास करू लागलो, तर समाजाच्या विकासासाठी इतर क्षेत्रांतील माणसे आणणार कोठून? एकाच दिशेचा प्रवास करू लागलो, तर इतर बुद्धिमत्तेचे विद्यार्थी शिक्षणापासून दूर जाण्याची शक्यता अधिक आहे. आपल्या व्यवस्थेत सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, अण्णा हजारे, वसंतदादा पाटील यांच्यासारखी त्यांच्या क्षेत्रात सर्वोच्च स्थानावरील माणसे शिक्षणात यशस्वी होऊ शकली नाहीत. किंबहुना शिक्षण त्यांना सामावून घेण्यात अपयशी ठरले, असेच म्हणावे लागेल. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ लीला पाटील यांनी सुंदर गोष्टीचा दाखला दिला आहे. तो वाचून पालक, शिक्षकांनी बोध घ्यायला हवा आहे. एकदा प्राण्याची जंगलात शाळा सुरू झाली. शाळेत सर्व प्रकारचे प्राणी सहभागी झाले. गुरूजींनी त्यांना शिकवण्यास सुरुवात केली. विद्यार्थी विविध प्रकारची कौशल्ये प्राप्त करतील, अशा पद्धतीने शिकवले जात होते. ज्यांना जसे शक्य होते, त्या त्या प्रमाणात कौशल्ये प्राप्त करत होते. शाळेत उडणे, धावणे, पोहणे, पळणे, उड्या मारणे अशी बरीच कौशल्ये शिकवली जात होती. शिकवत असताना, बराच काळ गेला आणि प्राण्याची परीक्षा घेण्याचे निश्चित करण्यात आले. परीक्षा होणार म्हटल्यावर काही प्राण्यांच्या मनात भीतीचे काहूर निर्माण होऊ लागले.
 
अखेर परीक्षेचा दिवस उजाडला. परीक्षा सुरू झाली. प्रत्येक कौशल्यात गती मोजली जाऊ लागली. काही प्राणी विविध कौशल्यांच्या परीक्षेत नापास झाले होते. ससा धावण्याच्या स्पर्धेत नापास झाला होता. घोडा धावण्यात पहिला आला होता, पण उड्या मारण्याच्या स्पर्धेत नापास झाला होता. असे अनेक प्राणी विविध कौशल्यांत नापास झाल्याने शिक्षक म्हणाले, पुढील परीक्षेत अधिक चांगले कौशल्य प्राप्त करता येईल असा विचार करा, आणि अभ्यास करा. शिक्षकांच्या या आधाराच्या शब्दांनी प्राण्यांना बरे वाटले, आणि पुन्हा विशिष्ट कालावधीनंतर पुन्हा परीक्षेचे आयोजन करण्यात आले. तेव्हा मात्र मागच्या वेळी ज्या कौशल्यांत प्राणी नापास झाले होते, त्याच कौशल्यांत यावेळीदेखील नापास झाले होते. मात्र, मागील वेळी ते ज्या कौशल्यांत प्रगत होते, त्याही कौशल्यांत प्राण्यांची प्रगती खालावलेली दिसून आली. आता प्रश्न निर्माण झाला होता, काय करायचे? तेव्हा गुरूजींना प्राण्यांना विचारले, हे का घडले? घोडा म्हणाला, मी उड्या मारण्याच्या परीक्षेत नापास झालो. म्हणून मी अधिकाधिक सराव करू लागलो. त्यामुळे धावण्याचा सराव झाला नाही. हळूहळू त्यात माझी गती कमी होत गेली. ससा म्हणाला, मला उड्या मारता येतात, पण धावता कोठे येत होते? मग मी धावण्यात गुण कमी पडले, म्हणून गेले काही महिने धावण्याचा सराव करत आहे. त्यामुळे उड्या मारण्याचे विसरू लागलो आहे. आपल्याकडे ज्याला गणित उत्तम येते, त्याला भाषेत कमी गुण मिळाले, तर त्याला सांगितले जाते गणित येऊन उपयोग नाही, तर भाषादेखील यायला हवी. आपल्याकडे आहे त्या बुद्धिमत्तेच्या दृष्टीने विकासासाठी विशेष लक्ष दिले जात नाही. जे नाही, त्यासाठी मात्र अधिक प्रयत्न करावे लागतात. विद्यार्थी त्या चिंतेत अधिक असतात. त्यामुळे अभ्यासक्रम हा सर्व प्रकारच्या बुद्धीच्या विद्यार्थ्यांच्या विकासाला संधी देणारा असायला हवा. केवळ एका क्षमतेचा विकास करणारा तो असता कामा नये, हे लक्षात घ्यायला हवा. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा, ‘नोट्स ऑफ इंडिया’ हे टिपण माऊंट बॅटन यांनी लिहून ठेवले होते. त्यात शिक्षणविषयक एक महत्त्वाची नोंद लिहिली गेली होती. त्यात लिहिले होते, आजवर आम्ही गुलामीसाठी आम्हाला जसे हवे तसे शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. मात्र, आता स्वातंत्र्य मिळाले आहे, तर स्वातंत्र्याचा विचार करून शिक्षणाची पुनर्रचना करण्याची गरज आहे. आपण त्यांनी निर्माण केलेल्या पाऊलवाटा बदलण्याचा फारसा प्रयत्न केला नाही, असा आक्षेप वर्तमानातही कायम घेतला जातो. त्यामुळे आपल्याला स्वातंत्र्यानंतरही शिक्षणातून अपेक्षित नागरिक घडवता आलेला नाही. त्यामुळे अभ्यासक्रमाचा विचार अधिक गंभीरपणे करण्याची वेळ आली आहे. शिक्षणाच्या समग्र विकासाच्या प्रक्रियेलाच अधिक महत्त्व देत, अभ्यासक्रम निर्मितीची गरज आहे. शिक्षण म्हणजे माणसात सुप्तपणे जे दडले आहे, त्याचा विकास करणे आहे. जे नाही ते लादणे म्हणजे शिक्षण नाही, हे लक्षात घ्यायला हवे. शिक्षणाचा मूलभूतपणे संबंध नोकरीपासून तोडण्याची गरज सातत्याने व्यक्त होत आहे. वर्तमानात शिक्षण कशासाठी, असा प्रश्न विचारला गेला, तर ‘फक्त नोकरीसाठी’ असे उत्तर मिळते. त्यातून नोकरीची मानसिकता निर्माण होते, आणि नोकरी मिळाली नाही की निराशेची वाट सुरू होते. शिक्षणाचा संबंध माणूस घडवण्याशी आहे, हा विचार केंद्रस्थानी ठेऊन शिक्षण पुढे जाण्याची गरज आहे.
 
 
गेल्या काही वर्षांपासून पालकांना ‘केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळा’चे आकर्षण वाढले आहे. देशात शाळांची आणि विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. अर्थात देशाच्या भौगोलिक क्षेत्राचा विचार करता, राज्य मंडळाच्या शाळा आणि ’केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळा’च्या शाळांचा विचार करता, हे प्रमाण फार मोठे आहे असे नाही. मात्र, गेल्या काही वर्षांत केंद्र सरकारने विविध अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेशपरीक्षा सुरू केल्या आहेत. त्यासाठी ’केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळा’च्या अभ्यासक्रमाचा अधिक विचार केला जात आहे. हा अभ्यासक्रम देशपातळीवर असल्याने, राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धापरीक्षाही याच अभ्यासक्रमांवर आधारलेल्या असतात. त्यामुळे या परीक्षांतील यशासाठी ते उपयोगी ठरतात, असा पालकांचा अनुभव आहे. त्यामुळे कदाचित हा निर्णय तर्कसंगत वाटू शकतो. मात्र, खरा मुद्दा अभ्यासक्रमापुरता विचार करून चालणारा नाही, तर शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचा आहे. शाळांमधील सुविधा वाढविण्याचा आहे. राज्यात शिक्षणक्षेत्रात गेली काही वर्षे विविध पदे रिक्त आहेत.
 
आपण केवळ केंद्रीय अभ्यासक्रमाची पाऊलवाट चाललो, म्हणजे गुणवत्ता वाढेल आणि विद्यार्थी स्पर्धापरीक्षांत चमकतील का?, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. मुळात अभ्यासक्रम विकसित करताना स्थानिक परिस्थिती, परंपरा, सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थिती लक्षात घेतली जाते. ‘सीबीएसई’च्या शाळा संपूर्ण देशभराबरोबर देशाबाहेरही आहे. या शाळांमध्ये देश आणि परदेशातील उत्तम आर्थिक परिस्थिती असलेल्या पालकांची पाल्यांचे प्रमाण अधिक आहे. राज्य मंडळांच्या शाळांमध्ये सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. कुटुंबात प्रथमच शिक्षण घेणार्‍या मुलांचे प्रमाण राज्य मंडळांच्या शाळांत अद्यापही लक्षणीय आहे. सुस्थित आणि सुशिक्षित पालक आपल्या पाल्यांच्या शिक्षणाबाबत तुलनेने अधिक जागरूक आहेत. सामाजिक, आर्थिक कमकुवत घटकांत जागरूकता येत असली, तरी त्यांच्याकडे साधने आणि परिस्थिती नसते. ‘सीबीएसई’ आणि ‘एसएससी’ शाळांमधील विद्यार्थ्यांमधील हा सामाजिक फरक दुर्लक्षून चालणार नाही. या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य मंडळांच्या अभ्यासक्रमांकडे पाहणे आवश्यक ठरते. शेवटी बुद्धिमत्ता, अभिरूची, कल, भोवताल भिन्न असल्याने ‘सब घोडे बारा टक्के’ या न्यायाने हा प्रवास आपल्याला करता येणार नाही. प्रत्येक राज्याची वैशिष्ट्ये असतात. त्यांच्या परंपरांचा विचारही केला जायला होतो. आपल्या समाजाच्या अस्मितेच्या गोष्टी अभ्यासक्रमात प्रतिबिंबित होत असतात. त्या वाटांचा विचार करण्याची गरज असते.

लेखक - संदीप वाकचौरे