मुंबई : भारतामधील सर्वाधिक साक्षर झोपडपट्टीपैकी एक असलेल्या धारावीत शालेय विद्यार्थ्यांची गळती रोखण्याचे आव्हान आहे. राज्य शासन आणि विविध स्वयंसेवी संस्था प्रयत्नशील असताना गरिबी, असुरक्षित वातावरण, खराब आरोग्य आणि शिक्षणाविषयी जागरूकतेचा अभाव यामुळे अनेक मुले वेळेपूर्वीच शिक्षणव्यवस्थेच्या बाहेर पडत आहेत. “या शैक्षणिक वर्षातच, १०० हुन अधिक विद्यार्थ्यांनी विविध वर्गांमधून शाळा सोडली असून, हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे,” असे गांधी मेमोरियल शाळेचे मुख्याध्यापक जे. चेल्लादुराई यांनी सांगितले.
शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या मते, सुमारे ४०% मुले प्राथमिक शिक्षण पूर्ण होण्याआधीच शाळा सोडतात. तर सहावी ते आठवी दरम्यान विद्यार्थी गळतीचे प्रमाण हे तब्बल २० टक्के आहे. याठिकाणी हे रोखण्यासाठी “मिशन झिरो ड्रॉपआउट” सारख्या योजनांद्वारे अशा विद्यार्थ्यांना ओळखून पुन्हा शाळेत दाखल करण्याचा प्रयत्न केला जात असला तरी हे विद्यार्थी गळतीचे प्रमाण थांबलेले नाही.
धारावीत सुमारे ६० शाळा आहेत आणि सुमारे ३३,००० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यातील ३६ शाळा बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे चालवल्या जातात, तर उर्वरित खासगी आहेत. ‘सलाम बॉम्बे फाउंडेशन’ आणि ‘अपनालय’ सारख्या स्वयंसेवी संस्था शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्याधारित अभ्यासक्रम आणि मुलींच्या शिक्षणासाठी मोबाइल लायब्ररी, समुदाय संवाद अशा उपक्रमांद्वारे मदत करत आहेत. मात्र या समस्येचा आणखी एक गंभीर पैलू म्हणजे धारावीतील अनेक लहान प्राथमिक शाळा या अनोंदणीकृत असून शासनाची अधिकृत मान्यता नाही. अलीकडेच राज्य शासनाने गेल्या पाच वर्षांपासून अनधिकृतपणे चालत असलेल्या मॉर्निंग स्टार स्कूलला बंद करण्याचे आदेश दिले. या शाळेत सुमारे ७०० विद्यार्थी शिक्षण घेत होते.
एका पालकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, “शाळांमध्ये मुले अत्यंत लहान वर्गांमध्ये एकमेकांना चिटकून बसतात. हालचाल करण्यासाठी पुरेशी जागा नसते. बहुतेक शाळांमध्ये खेळण्याचे मैदानच नाही. शैक्षणिक आणि मनोरंजनात्मक सुविधा पूर्णपणे मोडकळीस आलेल्या आहेत. या सर्व शाळांना पुनर्बांधणीचा आणि दुरुस्तीची गरज आहे.”
“मी गेली ३० वर्षे धारावीत शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. शाळा सोडण्यामागील सर्वात मोठी कारणं म्हणजे गरिबी, मुलींसाठी असुरक्षित वातावरण आणि पालक स्वतः अशिक्षित असणे. अनेक मुलांना फक्त घरात थोडे उत्पन्न मिळावे म्हणून अर्धवेळ कामावर लावले जाते.”
- एम. स्वामीनाथन, सामाजिक कार्यकर्ते
“माझ्या दोन मुलींनी नववी नंतर शाळा सोडली. इथे सुरक्षितता नाही. त्या बाहेर जातात तेव्हा काळजी वाटते. जर हा परिसर सुधारला, तर आमच्या मुलांचे भवितव्यही उजळेल.”
-रिकी महात बिडलान, रहिवासी, ९० फूट