मुंबई, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांनी सिग्नल व टेलिकॉम प्रशिक्षण संस्था,भायखळा येथे भेट देत प्रशिक्षणार्थींसाठी नव्याने बांधलेल्या जयगड वसतिगृहाचे बुधवार,दि.२३ रोजी उद्घाटन केले. जयगड या वसतिगृहात ३६ सुसज्ज कक्ष/रूम्स, १४४ प्रशिक्षणार्थींच्या निवासाची क्षमता आहे. येथे व्यायामशाळा, मनोरंजन कक्ष, भोजन कक्ष आणि वाय-फाय सुविधा उपलब्ध आहे.
सिग्नल व टेलिकॉम प्रशिक्षण संस्था, भायखळा ही सिग्नल व टेलिकॉम कार्यशाळा भायखळा याचा भाग असून, दरवर्षी मध्य रेल्वे आणि पश्चिम मध्य रेल्वे या दोन झोनमधील सरासरी १५०० प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देते. सदर संस्था १९६८ मध्ये स्थापन करण्यात आली असून येथे दरवर्षी आलेल्या कारागीर व अभियंत्यांसाठी (इंजिनियरसाठी) १०० पेक्षा अधिक प्रशिक्षण अभ्यासक्रम आयोजित केले जातात.
या अभ्यासक्रमांमध्ये प्रारंभिक अप्रेंटिस कोर्स, फाउंडेशन कोर्स, रिफ्रेशर कोर्स, विशेष उपकरण कोर्स आणि कवचप्रशिक्षण यांचा समावेश आहे. या निरीक्षणावेळी मनिंदर उप्पल, प्रधान मुख्य सिग्नल व दूरसंचार अभियंता, अमरेन्द्र सिंग, मुख्य कार्यशाळा व्यवस्थापक, सिग्नल व टेलिकॉम कार्यशाळा, भायखळा, प्रधान विभागप्रमुख, विभागीय रेल्वे व्यवस्थापक (मुंबई विभाग) तसेच मध्य रेल्वेचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.