
मुंबई : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी टी राजा यांचा तेलंगणायेथील आमदारकीचा राजीनामा शुक्रवारी स्वीकारला. त्यानंतर टी राजा यांनी समाजमाध्यमांवर एक भावनिक पोस्ट केली. ते म्हणाले, 'माझा जन्म हिंदुत्वाची सेवा करण्यासाठी झाला असून मी शेवटच्या श्वासापर्यंत हिंदुत्वासाठी तत्पर राहून काम करत राहणार.' ११ वर्षांपूर्वी टी राजा यांनी भाजपचे सदस्यत्व घेतले होते.
आपल्या पोस्टद्वारे टी राजा म्हणाले की, "जनतेची सेवा, देशाची सेवा आणि हिंदुत्वाचे रक्षण करण्याच्या उद्देशाने मी भाजपमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवून तेलंगणा विधानसभा निवडणुकीत सलग तीन वेळा गोशामहलमधून मला आमदारकीचे तिकीट दिले. मात्र तेलंगणामध्ये भाजपचे सरकार स्थापन करण्याचे स्वप्न घेऊन दिवसरात्र काम करणाऱ्या लाखो भाजप कार्यकर्त्यांच्या वेदना मी दिल्लीपर्यंत पोहोचवू शकलो नाही. मी हे स्पष्ट करू इच्छितो की मी हा निर्णय कोणत्याही पदामुळे, सत्तेमुळे किंवा वैयक्तिक स्वार्थामुळे घेतलेला नाही. मी नेहमीच हिंदुत्व, राष्ट्रवाद आणि सनातन धर्माचे रक्षण करण्यासाठी पूर्ण भक्ती आणि प्रामाणिकपणाने काम करत राहीन. शेवटच्या श्वासापर्यंत समाजाच्या सेवेसाठी आणि हिंदू समाजाच्या हक्कांसाठी आवाज उठवत राहीन."